बॉलीवूड

या कारणासाठी ‘गंगूबाई काठियावाडी’ होणार ओटीटीवर प्रदर्शित

Trupti Paradkar  |  Apr 18, 2021
या कारणासाठी ‘गंगूबाई काठियावाडी’ होणार ओटीटीवर प्रदर्शित

संजय लीला भन्सालीचा गंगूबाई काठियावाडीचं टीझर प्रदर्शित झालं आणि या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली. यात गंगूबाईची भूमिका अभिनेत्री आलिया भट साकारत आहे. गंगूबाई काठियावाडी एक गॅंगस्टर ड्रामा असून टीझरमधील गंगूबाईचा जबरदस्त अवतार पाहून तिच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता  चाहत्यांना नक्कीच लागली आहे. वास्तविक गंगूबाई काठियावाडीचं शूटिंग पूर्ण झालं असून तो ३० जुलैला सिनेमाघरात प्रदर्शित होणार होता. आता मात्र निर्माता संजय लीला भन्सालीने हा चित्रपट चक्क ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्याचा घाट घातला आहे. यासाठी संजयला मोठी रक्कम ऑफर झाल्याची चर्चा आहे.

कोरोनामुळे बदलावा लागला निर्णय

सध्या देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच कोरोना केसेसचे प्रमाण वाढू लागल्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मुंबईप्रमाणेच इतर शहरांमध्येही लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चित्रपटांचे शूटिंग आणि सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित करणं नक्कीच शक्य नाही. ज्यामुळे संजय लीला भन्सालीने त्याचा हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट थेट डिजिटल माध्यमावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्य म्हणजे यासाठी संजयला एक मोठी रक्कम ऑफर झाली आहे अशी सध्या चर्चा आहे. ज्यामुळेच संजय हा चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यास सहज तयार झाला आहे. 

चित्रपटातील आलियाच्या लुकवर चाहते फिदा

गंगूबाई काठियावाडीचा टीझर २४ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला होता. संजय लीला भन्सालीच्या वाढदिवसाच्या निमित्त या दिवशी टीझर प्रदर्शित करण्यात आला. मात्र या टीझरमधील आलियाची भूमिका आणि अभिनय पाहून चाहते थक्क झाले. टीझर आणि ट्रेलरमधील आलियाचा गंगूबाई अवतार पाहिल्यावर आता चाहत्यांना गंगूबाई काठियावाडी पाहण्याची घाई झाली आहे. खरंतर संजयने हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्याच्या उद्देशानेच तयार केला होता. हा त्याचा एक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट होता. ज्यामध्ये आलियाने तिच्या अभिनयाने चार चॉंद लावले आहेत. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडू नये यासाठी संजयने तो चक्क ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे लवकरच चाहत्यांना आता ओटीटीवर आलियाच्या गंगूबाईच्या रूपातील दर्शन घडणार आहे. 

कोण आहे गंगूबाई काठियावाडी

आलिया या चित्रपटात एका महिला माफिया डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट एस. हुसैन जैदी यांच्या माफिया क्विन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित असणार आहे. या चित्रपटातील गंगूबाई यांना कामाठीपूराची राणी असंही म्हटलं जायचं. गंगूबाई सेक्स वर्कर्स साठी गॉडमदर होती. ज्यांना या व्यवसायातील महिला गंगू मॉं या नावाने ओळखत असत. गंगूबाईची ओळख मुंबईतील सर्व माफिया आणि राजकीय नेत्यांसोबत होती. ज्यामुळे तिची दहशत सर्वत्र पसरली होती. वास्तविक गंगूबाई परिस्थितीमुळे या व्यवसायात अडकली होती. तिचं मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. ती पूर्वी गुजरातच्या काठियावाडी येथे राहत असे. एका मोठ्या आणि संपन्न घरातील मुलगी होती. मात्र गंगाला मुंबईत येऊन चित्रपटात काम करण्याची हौस होती. ज्यामुळे ती मुंबईत आली आणि त्यानंतर तिला परिस्थितीमुळे या व्यवसायात जावं लागलं होतं. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

कोरोनापेक्षाही देशाला लागलेली ‘कीड’ म्हणजे कोरोना, अभिनेत्रीने व्यक्त केला राग

कोरोनाचा फटका सोसत आहेत हे बिग बजेट चित्रपट

मलायका अरोराने हिऱ्याची अंगठी दाखवल्यामुळे साखरपुडा झाल्याच्या बातम्यांना ऊत

Read More From बॉलीवूड