मनोरंजन

ग्रॅमी पुरस्कार 2022: ऑलिव्हिया रॉड्रिगो सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार

Vaidehi Raje  |  Apr 4, 2022
Grammy Awards 2022

संगीतक्षेत्रात ग्रॅमी पुरस्कार खूप मानाचा आणि मोठा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार 1959 पासून दरवर्षी दिला जातोय.  ग्रॅमी पुरस्कार हा सर्वात मोठा वार्षिक संगीत पुरस्कार सोहळा आहे ज्यामध्ये संगीतक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. यावर्षी हा सोहळा लास वेगासमधील MGM ग्रँड गार्डन एरिना येथे आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी हा सोहळा 31 जानेवारीला अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणार असे ठरले होते परंतु ओमिक्रॉनमुळे त्याची तारीख आणि ठिकाण बदलण्यात आले. 

भारतीयांसाठी आनंदाची बातमी 

यावेळी ग्रॅमीमध्ये सुमारे 28 श्रेणींचे पुरस्कार दिले जात आहेत आणि या पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये भारतीयांसाठीही एक आनंदाची बातमी आहे कारण भारतीय गायक रिकी केजला सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला आहे.  रिकी केजने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे कारण रिकी केजने ग्रॅमी अवॉर्ड जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. रिकी केज यांनी ट्विट करून हा आनंद संपूर्ण देशवासीयांबरोबर शेअर केला आहे. 

रिकी केजने ट्विटद्वारे आनंद व्यक्त केला 

रिकी केजने ग्रॅमी हा संगीतक्षेत्रातील सन्मान मानला जाणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल ट्विट करून आनंद व्यक्त केला. त्याने या अविस्मरणीय क्षणाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, “आज आम्ही आमच्या अल्बम Divine Tides साठी ग्रॅमी अवॉर्ड जिंकला. माझ्यासोबत उभ्या असलेल्या  @copelandmusic या दिग्गजाबद्दल मी कृतज्ञ आहे. हा माझा दुसरा आणि स्टीवर्टचा सहावा ग्रॅमी पुरस्कार आहे. ज्यांनी मला सहकार्य केले, मला काम दिले आणि माझे संगीत ऐकले त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.तुमच्यामुळेच माझे अस्तित्व आहे. 

ए.आर.रहमानही सोहळयाला हजर 

संगीतक्षेत्रातील दिग्गज आणि प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान हे देखील ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यासाठी लास वेगासमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे उपस्थित होते. रहमान यांचे प्रेक्षकांमध्ये बसलेले फोटोही व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये फोटोमध्ये रहमान यांची हास्यमुद्रा टिपली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून हा फोटो शेअर केला आहे. 

सर्वोत्कृष्ट नवीन कलाकाराचा पुरस्कार ऑलिव्हिया रॉड्रिगोला 

जे लोक आंतरराष्ट्रीय संगीतप्रेमी आहेत व विविध आंतरराष्ट्रीय भाषांतील गाणी ऐकतात त्या सर्वांचे लक्ष या पुरस्कार सोहळ्याकडे लागलेले होते कारण प्रत्येकालाच आपल्या आवडत्या गायक/संगीतकाराला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळावा असेच वाटत होते. यावर्षी सर्वोत्कृष्ट नवीन कलाकाराचा पुरस्कार प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार  ऑलिव्हिया रॉड्रिगोला देण्यात आला आहे. ऑलिव्हीया रॉड्रिगोची ‘गुड फॉर यू’, ‘ड्रायव्हर्स लायसन्स’ , जेलसी जेलसी, डेजा वू ही व अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत. ही गाणी इंस्टाग्राम रील्स आणि युट्युब शॉर्ट्सवरही ट्रेंडिंग होती त्यामुळे अनेकांनी ऐकली असतीलच. ऑलिव्हिया रॉड्रिगो हिने ड्रायव्हर्स लायसन्ससाठी सर्वोत्कृष्ट पॉप सोलो न्यू आर्टिस्टचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. ऑलिव्हियाने या सोहळ्यात 3 पुरस्कार पटकावले. तिने पॉप व्होकल अल्बमसाठी दुसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. सर्वोत्तम गीताचा पुरस्कार लीव्ह द डोर ओपन या गाण्याने पटकावला आहे. हे गाणे अँडरसन पाक आणि ब्रुनो मार्स यांनी संगीतबद्ध केले आहे. तर फू फायटर्सला सर्वोत्कृष्ट रॉक अल्बमचा पुरस्कार मिळाला. याशिवाय फू फायटर्सने सर्वोत्कृष्ट रॉक गाणे आणि सर्वोत्कृष्ट रॉक परफॉर्मन्सचा पुरस्कारही जिंकला. तसेच अमेरिकन गायक आणि गीतकार ख्रिस स्टॅपलटनच्या स्टार्टिंग ओव्हर या अल्बमला सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. 

खेदाची बाब अशी की ग्रॅमी अवॉर्ड्स 2022 मध्ये इन मेमोरिअम विभागात आंतरराष्ट्रीय संगीतक्षेत्रातही दिग्गज असणाऱ्या लतादीदी आणि बप्पीदा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. ग्रॅमी पुरस्काराच्या या मोठ्या सोहळ्यात आयोजकांना या दिग्गजांचा विसर पडल्याचेच दिसले. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन