आरोग्य

मधमाशांचा डंख या आजारांवर येतो कामी, जाणून घ्या याविषयी

Leenal Gawade  |  Apr 14, 2022
मधमाशीचा डंख

मधमाशी चावली की, जीव नकोसा होतो. त्याच्या डंखापासून वाचण्यासाठी काय करायला हवे हे आपण सगळ्यांनी वाचले असेल पण तुम्हाला माहीत आहे का? की मधमाशाचा डंख हा अनेक आजारांवर रामबाण असा उपाय आहे. हो… तुम्ही वाचताय ते अगदी खरं आहे. अनेक आजारांवर मधमाशांचा डंख हा कामी येतो. खास यासाठी खूप ठिकाणी मधमाशांचे पालन केले जाते. या मधमाशा चावल्या की, त्यानंतर काही काळ सूज राहते. पण तो आजार कमी होतो. नेमकं कोणत्या आजारावर मधमाशांचा डंख कामी येतो. या बद्दलची माहिती आज घेऊया. शिवाय या ट्रिटमेंटला काय म्हणतात ते देखील आपण जाणून घेऊया.

काय आहे ॲपिथेरपी

मधमाशा चावून घेण्याच्या या थेरपीला ॲपिथेरपी असे म्हटले जाते. फार पूर्वीपासून ही थेेरपी प्रचलित असल्याचे देखील अनेक पुरावे दिसतात. ही थेरपी ॲक्युप्रेशरचाच एक भाग असल्याचे देखील सांगितले जाते. मधमाशांपासून मिळणारे मध, जेली आणि त्यापासून मिळणाऱ्या विषाचा उपयोग करुन अनेक फायदे मिळवले जातात. अनेक ठिकाणी जिवंत माशीचे विष काढले जाते. हे विष वापरुन औषधोपचार केला जातो. खूप ठिकाणी तुम्ही मधमाशीला चिमट्यात घेऊन त्याला चावण्यााठी प्रवृत्त केलेले तुम्ही नक्कीच पाहिले असेल. हीच ती ॲपिथेरपी आहे. 

संधिवातावर करते काम

women Seeing Honeybees Used for Apitherapy

ॲपिथेरपी ही संधिवातावर उत्तम असा इलाज करते, असे अनेक ठिकाणी म्हणतात. संधिवात झालेल्या व्यक्तिला गुडघेदुखी आणि सांधेदुखी होत असते. अशावेळी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मधमाशी घेऊन तिचा डंख हा दोन्ही गुडघ्यांना केला जातो. त्यामुळे काही काळासाठी गुडघे सुन्न होतात. अंग सुजते. पण त्यामुळे संधिवात कमी होतो असे अनेक उदाहरणांमधून समोर आले आहे. आजही देशात अनेक ठिकाणी अशापद्धतीने इलाज केला जातो. ज्यामध्ये अनेकांनी या डंखामुळे फायदे झालेले आहेत असेच दिसून आले आहे. पण तरीदेखील याला अनेक जण अपवाद असल्याचे देखील सांगतात. 

या शिवाय असे म्हणतात की, आपल्याला होणाऱ्या आजारांवर आपल्या प्रतिकारशक्तीने काम केले तर ते अधिक उत्तम असते. म्हणून मधमाशीचा डंख बसल्यावर त्याची जळजळ थांबवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती काम करु लागते. त्यामुळेच या डंखाचा कोणताही त्रास आपल्याला होत नाही असे देखील सांगितले जाते. 

आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

विषाचा सतत प्रयोग करणे हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. मधमाशीचा डंख सतत केल्यामुळे शरीरात विष वाढू शकते. विषाचा विपरित परिणाम शरीरावर होऊ शकतो. उदा. अंग लुळे पडणे वगैरे असे त्रास देखील आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे याचा प्रयोग करताना तुम्ही कितीवेळा करताय हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार या उपचारपद्धतीला अजिबात मान्यता नाही. तरी देखील ही उपचारपद्धती आजही अनेक ठिकाणी केली जाते. 

ही थेरपी अनेकांना चांगली वाटत असली तरी देखील ती करताना तुम्ही विचार करायला हवा. 

Read More From आरोग्य