भविष्य

24 जानेवारी 2019 चं राशीफळ

Jyotish Bhaskar  |  Jan 23, 2019
24 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष – आशीर्वाद मिळवा

जीवनात थोरमोठ्यांचे आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न नेहमीच केला पाहिजे. कारण ते कधीही वाया जात नाहीत. त्याचे बरेचसे फायदेही होत असतात. याची अनुभूती आज तुम्हाला मिळू शकते. म्हणून आज तुम्ही कुठल्या कार्याचा शुभारंभ करीत असाल किंवा एखादे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असाल तर थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला विसरु नका. त्यामुळे आज तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होण्यास मदत मिळू शकते. सदैव सत्याची कास धरा. असत्य हे एक दिवस तोडांवर पडतंच. त्यामुळे त्याची सोबत आजच सोडलेली बरी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. म्हणून तक्रार, समस्या, टिका यांचा बाऊ करीत बसण्यापेक्षा प्रयत्न केलेले कधीही चांगले. उद्दिष्ट्य साध्य कर­ण्यासाठी पर्यायी साधने तयार करा. एकावरच अवलंबून राहू नका.

कुंभ – वैवाहिक आयुष्यात आनंद

जीवनातील प्रत्येक नाती सांभाळून आपल्याला जगावं लागत असतं. त्यामुळे कधी कधी असे प्रसंग येतात त्या नात्यांना बहर आलेला असतो. वैवाहिक नात्याचंही तसंच असतं. काही वेळेस अगदी छोटी गोष्टसुद्धा मोठा आनंद देऊन जाते. याची अनुभूती आपल्याला करुन देणारा आजचा दिवस आहे. आज आपलं वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास मदत होईल. मात्र कोणतीही कृती करण्यापूर्वी आज तुम्हाला खूप विचार करावा लागणार आहे. जेणे करुन तुमच्या हातून कुठलीच चुक घडता कामा नये. सर्वकाही आपल्यालाच मिळेल हा अट्टहास न धरता सैतानालाही त्याचा वाटा द्यावा लागतो हे विसरु नका. म्हणजे जे मिळतंय त्याचा अधिक चांगल्या प्रकारे आनंद तुम्हाला घेता येईल.

मीन – पथ्य पाळा

जीवनात स्वत:च ठरवून घेतलेले पथ्य पाळणारा मनुष्य आपलं स्वत:चं असं वलय निर्माण करीत असतो. त्यामुळे काही पथ्य पाळली पाहिजेतच. हे पथ्य जर आपल्याला डॉक्टरांनी प्रकृतीच्या कारणास्तव सांगितलेली असतील तर ते कुठल्याही पाळलीच पाहिजेत. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस असेल. विशेष करुन आहाराविषयी जर आपल्याला डॉक्टरांनी कुठली पथ्य सांगितलेली असतील तर ते आज तंतोतंत पाळा. नाही त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कुठल्या गोष्टीचा तणाव जाणवत असेल तर संगीत ऐका. त्यामुळे तणाव कमी होऊ शकतो. फुकटच्या गप्पा – टप्पा किंवा बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असे आज व्हायला नको. प्रत्यक्ष कृती करण्यावर भर द्या. आज वेळ आहे मनसोक्त जगून घ्या.

वृषभ – सांधेदुखीचा त्रास वाढेल

आपल्याला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर आपण आज आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. औषधी किंवा उपचारांकडे आज दुर्लक्ष करुन चालणार नाही. कदाचित दुखणेही वाढू शकतं. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. मनस्वी आनंद देणारा एखादा अविस्मरणीय क्षण आज तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्याचा पुरेपुर आनंद घ्यायला विसरु नका. जीवनात असे क्षण फार कमी मिळत असतात. जीवन जगत असतांना सुखाचा गुणाकार व दु:खांचा भागाकार करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आपल्या आनंदात वाढ कशी होईल यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कुणाच्याही व्यंगावर कधीही हसणं वाईटच असतं. किमान आज तरी हे वाईट काम करु नका. त्यात तुमचे नुकसान होऊ शकतं.

मिथुन – आज अर्थलाभ शक्य

तुम्ही जर कुटुंबवत्सल असाल, कुटुंबाची काळजी घेणारे असाल तर आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त कसा लाभ करुन घेता येईल व मिळालेला आनंद कुटुंबासोबत कसा वाटता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र हे करीत असतांना झटझट पैसे मिळविण्याच्या मागे लागू नका. जेवढं मिळतंय तेवढं पदरात पाडून घ्या. नाहीतर तुमचेच नुकसान होऊ शकतं. टिका व तक्रारींना तोंड दे­ण्यात वेळ दवडू नका तर त्यांच्या आज दुर्लक्ष करा. अनिश्चित जगातमध्ये निश्चितता शोधणं हे चुकीचंच, ही सत्यता लक्षात घेऊन आपले काम किंवा कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करण्यावरच भर द्या. तुम्हाला यश, आनंद सर्वकाही नक्की मिळेल.

कर्क – अतिविचार घातक

कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करणे चांगले असते. मात्र एखाद्या गोष्टीवर गरजेपेक्षा जास्त विचार करणे हे आघत ठरू शकतं. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. म्हणून आज कोणत्याही गोष्टीवर जास्त विचार करीतबसण्यापेक्षा आता पुढे काय यावर विचार करा. त्यातुन तुम्हाला नवीन पर्याय, मार्ग सापडू शकतात. मार्ग नाही, दिशा माहित नाही म्हणून एका जागेवर हतबल होऊन थांबू नका. चालायला सुरुवात करा. भाग्य तुमच्या मागे आपोआप येईल. प्रयत्नांनी परमेश्वर प्राप्ती होत असते. म्हणजे प्रयत्न करुनच यश मिळतं हे ही लक्षात घ्या. स्वत:च्या भरभराटीवर लक्ष द्या. मात्र जास्तीचा हव्यास न धरता थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात घ्या. मुलं आज तुमच्या मनानुसार वागणार नाही. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

सिंह – चिंतन करा, चिंता नको

एखाद्या गोष्टीवर, समस्येवर चिंतन करुन त्यातून मार्ग काढणे कधीही चांगले. ते सुदृढ मनाचे लक्षण आहे. मात्र चिंतनाचे रुपांतर चिंतेत व्हायला नको. चिंता ही चितेला जाळत असते. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. एखाद्या इच्छित कार्याला उशिर होत असेल तर होऊ द्या. त्याने हतबल होऊ नका. प्रयत्न करीत राहा. वरकरणी कनवाळू व आतुन कठिण अशा द्विस्वभावी लोकांपासून सावध राहा. त्यांच्यापासून तुम्हाला नुकसान होऊ शकतं. आज तुमच्यासंततीला यश प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे मनाला आनंद मिळू शकतो. त्यांचं कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका.

कन्या – कागदपत्रे सांभाळा

सर्व कागदपत्रे ही महत्त्वाचीच असतात. मात्र त्यांची कधी तरी गरज पडत असल्याने त्याकडे आपले दुर्लक्ष होत असते. ते कुठेतरी अडगडीत ठेवले जातात. त्यामुळे ज्यावेळी काम पडते त्यावेळी शोधाशोध करावी लागते. याची अनुभूती आज आपल्याला मिळू शकते. म्हणून आपली महत्त्वांची कागदपत्रे सांभाळून व्यवस्थित जागेवर ठेवा. म्हणजे कधीही काम पडल्यावर ते तुम्हाला सापडू शकतील. कर्मचारी वर्गासाठी आजचा दिवस आनंददायी असून आपली पात्रता असल्यास आज आपल्याला बढती मिळू शकते. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत अशी आपली परिस्थिती होऊ शकते. आज आपण आपल्या शब्दांवरही नियंत्रण ठेवले पाहिजे. आपल्या बोलण्याने कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

तूळ – आर्थिक लाभाची शक्यता

तुम्ही जर कुटुंब प्रमुख असाला, कुटुंबवत्सल राहून परिवाराची काळजी घेणारे असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी ठरु शकतो. कारण आज तुम्हाला आथिक लाभ होण्याची शक्यता आहे. सर्वकाही परिवारासोबत वाटण्याचा, देण्याचा तुमचा स्वभाव असेल तर आजचा आनंदही तुम्ही त्यांच्यासोबत वाटून त्याला द्विगुणीत करु शकतात. आरोग्याच्या बाबतीत मात्र आज तुम्हाला जागरुक राहावं लागेल. कारण प्रकृती नरम-गरम राहू शकते. एखाद्या संकटातून आज तुम्ही सुखरुप बाहेर पडू शकता. देव तारी त्याला कोण मारी ही तुमची परिस्थिती राहिल. त्यामुळे आज परमेश्वरावरील तुमचा विश्वास अधिकच दृढ होईल. तुमच्या यशाने शत्रुही पराभूत होणार आहेत.

वृश्चिक – संपत्तीचा वाद मिटेल

तुमच्या घरात जर वडिलोपार्जीत एखाद्या संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आज तुम्ही प्रयत्न करायला हवेत. आज तुम्हाला अचुक संवाद साधावा लागणार आहे. तो साधला गेला नाही तर वाद निर्माण होऊ शकतो ही बाब लक्षात घ्यायला हवी. आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आज भोगावी लागू शकतात. त्यामुळे त्यावर पश्चाताप करीत बसण्यापेक्षा त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधाल. आलीया भोगासी असावे सादर या संतोक्तीनुसार आज प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे. आज सासुरवाडीकडून तुम्हाला लाभ होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदी आनंद असेल.

धनु – जबाबदाऱ्या टाळण्याचा प्रयत्न

जबाबदारीपासून पळ काढण्याचा काही लोकांचा स्वभावच असतो तर काही लोक नाईलाजास्तव जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत असतात. आज तुम्हीही जबाबदा-या टाळण्याचा प्रयत्न कराल. मात्र असे करणे म्हणजे स्वत:लाचफसविण्यासारखे ठरु शकते. जीवनात धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो. त्यामुळे हिम्मत दाखवून आज तुम्हाला धोका, जोखीम ही पत्करावी लागणार आहे. कामे टाळण्याकडे लक्ष राहिल. जे ही चुकीचे आहे. त्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. त्यामुळे कोणतेही काम टाळ्याचा आज प्रयत्न करु नका. स्त्रियांना मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी त्रासदायक ठरतील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलेच हिताचे राहिल. न कत्र्याचा वार शनिवार असे म्हटले जाते. आज तुमची परिस्थिती अशी होऊ नये म्हणून काही तरी करण्याचा आज प्रयत्न करा.

मकर – विसंबून राहू नका

प्रत्येक मनुष्याची एक वाईट सवय म्हणजे विसंबून राहणे होय. या सवयीमुळे ब-याचदा नुकसान होतं किंवा एखाद्याला आपला गैरफायदा घ्यायला संधी मिळत असते. याची अनुभूती आज तुम्हाला मिळू नये म्हणून आज कुणावरही विसंबून राहू नका. जो प्रशंसा करीत नाही किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीला चांगले म्हणत नाही त्याला एखाद्यावर टिका करण्याचाही अधिकार नसतो. तशीही इतरांवर टीका करणे हे वाईटच असतं. म्हणून आज कुणावरही टिका नकोच. वरकरणी कठोर मात्र आतुन जर तुम्ही कनवाळू स्वभावाचे असाल तर अत्यंत सावध राहा. लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. लहान भावंडांची काळजी घ्या. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असू शकते.

लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद

Read More From भविष्य