एका क्लिकवर व्यवहार करण्याची सवय आता आपल्या सगळ्यांना लागली आहे. कोणतीही कॅश कॅरी न करता एका क्लिकमध्ये पेमेंट करण्यासाठी सध्या युपीआय आणि अनेक ऑनलाईन पेमेंट पर्याय आलेले आहेत. खरंतर आपल्याला व्यवहार करणे सोपे जावे यासाठी या सगळ्या गोष्टी असतात पण तरी देखील यातूनच काही चुकीचे घडण्याची शक्यता देखील हल्ली अधिक आहे. खूप जणांचे तुम्ही अनुभव आतापर्यंत ऐकले असतील. ऑनलाईन फ्रॉड झाला, पैसे गेले या फसवणुकीच्या घटना ऐकल्या की, आपण हे ॲप वापरावे की, नाही असा प्रश्न पडणे देखील साहजिक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? काही गोष्टींची काळजी घेतली की, तुम्हाला या गोष्टींचे टेन्शन अजिबात राहणार नाही. अगदी कोणत्याही वयाच्या व्यक्तींकडे असे ॲप असतील तर घाबरु नका. त्याऐवजी या काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.
आमिषांना बळी पडू नका
आपल्याला फुकट काही मिळाले तर त्याचा आनंद अधिक असतो. युपीआय किंवा अशी माध्यम सोशल नेटवर्किंग साईटशी एवढी जोडलेली असतात की, त्यातून काहीतरी फ्रॉड होण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे तुम्हाला काहीतरी फ्री मिळणे किंवा कुपनचे आमिष देणे यामध्ये सर्वस्वी त्यांचा स्वार्थ असतो. अनेकदा हॅकर्सतर्फे देखील अशा काही लिंक पाठवल्या जातात. ज्या आपल्याला लिंक आहेत असे देखील कळत नाही. त्यामुळे होते असे की, तुमचा फोन स्क्रिन होतो. तुम्ही फोनमध्ये काय करता हे त्यांना कळून येते.त्यामुळे जे तुमच्या परिचयाचे नाही अशा गोष्टींना अजिबात क्लिक करु नका. त्यामुळे तुमचेच सर्वस्वी नुकसान होऊ शकते. त्यामुळे थोडे सावध राहणेच कधीही चांगले
पासवर्ड शेअर करु नका
अगदी बेसिक आणि ओरडून सांगण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे तुमचा पासवर्ड काहीही केल्या तुम्ही तुमचा पासवर्ड कोणासोबतही कधीही शेअर करु नका. याचे कारण असे की, असे केल्यामुळे तुमच्या युपीआय हॅक होण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे तुमच्या पासवर्डचा उपयोग करुन कोणालाही एका क्लिकवर पैसे देता येऊ शकतात. त्यामुळे ही गोष्ट जबाबदारीपूर्वक करा. कोणालाही आपला पासवर्ड देऊ नका. दिला तर तो बदला.
खात्रीशीर ठिकाणीच याचा वापर करा
आता सगळीकडेच स्कॅन आणि पे चा पर्याय आहे. तो सुरक्षित आहे असे सांगितले जाते. तु्म्हाला एखाद्या ठिकाणी पेमेंट करताना स्कॅन करणे असुरक्षित वाटत असेल तर करु नका. अगदी साध्या साध्या गोष्टीसाठी देखील तुम्ही हे पेमेंट नाही केले तर बरेच असते. योग्य आणि गरज असलेल्या ठिकाणीच तुम्ही अशा प्रकारे युपीआय पेमेंट करा.
लिंक क्लिक करणे पडू शकते महागात
कॅशबॅक हे असे आमिष आहे ज्यामुळे अनेकांना आतापर्यंत शेंडी लागलेली आहे. तुम्हाला इतका कॅशबॅक मिळाला आहे. पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा असे अनेक मेसेज हल्ली येत असतात. पण यावर क्लिक केल्यानंतर सगळे अकाऊंट साफ होऊन जाते.अनेकांसोबत असे घडले आहे. या अनुभवातून तुम्ही शहाणे व्हायला हवे. कोणतीही लिंक तुम्हाला पैसे देणे किंवा तत्सम गोष्टीचे आमिष देत असेल तर अशा लिंकवर अजिबात क्लिक करु नका.
आता कोणतीही युपीआय पेमेंट करताना या गोष्टी नक्की वाचा आणि ही इतरांना देखील शेअर करायला विसरु नका.