आरोग्य

तुम्ही जे दूध पिताय ते सिंथेटिक तर नाही ना, असे काढता येईल शोधून 

Vaidehi Raje  |  Jun 3, 2022
milk adulteration

दूध हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे कारण त्यात अत्यावश्यक सूक्ष्म पोषक आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतात. पण, आपण सर्वजण जे दूध पितो ते शुद्ध आणि घातक रसायनांपासून मुक्त आहे याची आपल्याला खात्री आहे का? वरवर पाहता तर दूध चांगलेच दिसते पण देशभरातून दूध भेसळीशी संबंधित बातम्यांचा सुळसुळाट बघता दुधाच्या शुद्धतेबद्दल निश्चितच शंका निर्माण होते. भेसळयुक्त दुधातील डिटर्जंट, सिंथेटिक घटक, युरिया, कॉस्टिक सोडा, फॉर्मेलिन यांसारखे भेसळ करणारे घटक दीर्घकाळ घेतल्यास आरोग्यावर घातक परिणाम होतात कारण त्यामुळे अन्नातून विषबाधा, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकार, हृदयविकार, कर्करोग किंवा अगदी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अगदी दुर्दैवाने मृत्यूदेखील ओढवू शकतो.  प्रामुख्याने, दुधाचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह्ज दुधात भेसळ म्हणून घातले जातात. शिवाय, व्हॉल्यूम आणि प्रमाण वाढवण्यासाठी दुधात पाणी घातले जाते जे पुढे दूषित होते आणि दुहेरी त्रासदायक ठरते.

दुधातील भेसळीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. युरिया, फॉर्मेलिन, डिटर्जंट्स, अमोनियम सल्फेट, बोरिक ऍसिड, कॉस्टिक सोडा, बेंझोइक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड, हायड्रोजन पेरोक्साइड, शर्करा आणि मेलामाइन सारखे घातक पदार्थ नकळत आपल्या पोटात जात आहेत. 

सिंथेटिक दुधाचे दुष्परिणाम 

सिंथेटिक दूध म्हणजेच नकली दूध हे नैसर्गिक दुधात रसायने आणि साबण यांसारख्या गोष्टी मिसळून बनवले जाते. सिंथेटिक दूध केवळ त्याच्या खराब चवीवरूनच ओळखले जाऊ शकते. ते घासल्यावर साबणासारखे वाटते आणि गरम केल्यावर पिवळे होते. युरिया, लाँड्री डिटर्जंट, सोडा, स्टार्च आणि फॉर्मेलिन हे रासायनिक घटक कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरले जातात.  यामुळे विषबाधा होऊ शकते. त्यामुळे उलट्या आणि जुलाबासारखे त्रास होऊ शकतात. याशिवाय किडनी आणि यकृतावरही याचा वाईट परिणाम होतो.

हे पदार्थ दुधात भेसळ करण्यासाठी वापरले जातात 

कार्बोहायड्रेट सामग्री आणि दुधाची घनता वाढवण्यासाठी, टेबल शुगर दुधात घातली जाते ज्यामुळे दुधाची घनता देखील वाढते. आणि दुधात पाणी मिसळले जाते जे लॅक्टोमीटर चाचणीने शोधले जाऊ शकणार नाही. तसेच घन पदार्थ वाढवण्यासाठी दुधात स्टार्चची भेसळ केली जाते. दुधाचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी दुधात बेंझोइक ऍसिड आणि सॅलिसिलिक ऍसिड मिसळले जाते. दूध घट्ट करण्यासाठी दुधात साबण मिसळला जातो ज्यामुळे पोट आणि मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. दूध जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात फॉर्मेलिन मिसळले जाते. हे अत्यंत विषारी आहे आणि यामुळे यकृत व मूत्रपिंडावर हानिकारक प्रभाव होतो. तसेच अमोनियम सल्फेट हे दुधात भेसळ म्हणून वापरले जाते कारण या रसायनात दुधाची घनता राखून लॅक्टोमीटर रीडिंग वाढवण्याची क्षमता असते. दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी पाणी घालणे ही एक सामान्य भेसळ आहे. ते पाणी तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करत नसले तरी दूषित पाण्यामुळे तब्येत नक्कीच बिघडते.

असे ओळखा दूध सिंथेटिक आहे की शुद्ध  

दुधात युरिया घातल्यास दुधाच्या वासात किंवा चवीत कोणताही बदल होत नाही, त्यामुळे ते ओळखणे थोडे अवघड जाते. यासाठी अर्धा टेबलस्पून दूध आणि सोयाबीन पावडर एकत्र करून नीट ढवळून घ्यावे. पाच मिनिटांनंतर, लिटमस पेपर तीस सेकंदांसाठी पाण्यात बुडवा. लिटमस पेपरचा रंग निळा झाला तर दुधात युरिया आहे असे समजावे. तसेच दुधात साबण घातला आहे का हे ओळखण्यासाठी 5 मिली ते 10 मिली दूध घ्या आणि ते समान प्रमाणात पाण्यात मिसळा, हे मिश्रण चांगले ढवळून घ्या. दुधात डिटर्जंट मिसळल्यास दुधात साबणाचा जाड फेस येऊ लागतो. डिटर्जंट मिसळलेल्या दुधात सोडा खूप जास्त असतो ज्यामुळे किडनी, यकृत इत्यादींना हानी पोहोचते आणि हॉर्मोनल असुंतलन देखील होते.

म्हणून दुधातील भेसळ शोधून काढा आणि आपले आरोग्य वाचवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य