Mental Health

तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय

Aaditi Datar  |  May 14, 2019
तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय

तुमच्या मुलालाही मोबाईलवरचे व्हिडीओ किंवा गेम्स पाहता पाहता जेवण्याची सवय आहे का? तुमच्या मुलालाही स्क्रीन अॅडीक्शन आहे का? आजकाल प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाकडे मोबाईल असतो. त्यामुळे नकळत घरातल्या मुलांनाही मोबाईल पाहायची सवय लागते. त्यामुळे अनेक मुलांमध्ये वजन कमी होणं, वजन वाढणं, कुपोषण यासारख्या समस्या वाढत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्क्रीन अॅडीक्शनच्या कारणानेही मुलांमध्ये वजन वाढणं किंवा वजन कमी होण्याची समस्या दिसून येते. याशिवाय अनेक पालक आपल्या मुलांना मोबाईलवरचे व्हिडीओ दाखवत जेवू घालतात. तसंच आजकालच्या लहान मुलांना खूप कमी वयात व्हिडीओ गेम्सची वाईट सवय लागल्याचं दिसून येतं. या सवयीमुळे मुलांना अटेंशन डेफिसीट डिसॉर्डर, हायपरअॅक्टिव्हीटी आणि स्लीप डिसॉर्डरसारखे आजार होत आहेत.

मोबाईल आणि इतर इलेक्टॉनिक गॅजेट्समुळे होणारे साईडईफेक्ट्स

– स्क्रीन अॅडीक्शनमुळे मुलांना भूक लागलेली कळत नाही

साधारणतः जेव्हा मुलं जेवण जेवत नाहीत तेव्हा त्यांना मोबाईलवरचे कार्टून व्हिडीओ दाखवून जेवू घातलं जातं. पण बालरोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या स्क्रीन अॅडीक्शनमुळे मुलांमध्ये भूक लागण्याची प्रवृत्ती कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. जेव्हा मुलं मोबाईलवर फोकस करतात तेव्हा त्यांची आतून खाण्याची इच्छा कमी होऊ लागते. ज्यामुळे ते कमी खातात किंवा कधीकधी जास्त खातात. परिणामी कुपोषण किंवा जाडेपणा या समस्या दिसून येतात. तर दुसरीकडे ज्या मुलांना खरोखर भूक लागलेली असते पण हातात मिळालेल्या मोबाईल किंवा व्हिडीओ गेममुळे ते सांगू शकत नाहीत की, त्यांचं पोट भरलं आहे आणि पालक त्यांना जास्त खाऊ घालतात. बालरोग तज्ज्ञांनुसार स्क्रिन अॅडीक्शनमुळे मुलांमधील भूक आणि पोट भरलं हे समजण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते.

विकासाशी निगडीत हार्मोन्सवरही होतो याचा परिणाम

अनेकदा असंही दिसून येतं की, रात्री लवकर झोपण्यावरून बऱ्याच मुलांची चिडचिड होताना दिसते. कारण टीव्ही किंवा मोबाईलवरच्या कार्टून बघण्याची मुलांना झोपण्याआधी सवय असते. ज्यामुळे मुलं रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उठतानाही चिडचिड करतात. खरंतर सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून ब्लू लाईट बाहेर पडतो. जो तुमच्या नैसर्गिक स्लीप हार्मोन्स मेलाटोनिनवर दबाव टाकतो. मानवी शरीराच्या विकासाचे जास्तीत जास्त हार्मोन्स हे रात्री अॅक्टीव्ह असतात. पण जेव्हा मुलं रात्री कमी झोपतात तेव्हा त्यांच्या शारिरीक विकासावरही याचा परिणाम दिसून येतो. लवकर झोप न लागण्यामुळे किंवा कमी झोप झाल्यामुळे मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो.

पाच इंद्रियावरही होतो परिणाम

आजकाल मुलांना खूप कमी वयात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा डिजीटल मीडियाची ओळख करून दिली जाते. वयाच्या पहिल्या पाच वर्षात मुलांच्या पाच इंद्रियांचा विकास होणं गरजेचं असतं. ज्यामध्ये बघणं, ऐकणं, स्पर्शज्ञान, वास घेणं आणि चव घेणं यांचा समावेश होतो. पण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि मोबाईलमुळे मुलांच्या बघण्याच्या आणि ऐकण्याच्या इंद्रियांचं नुकसान होतं. याचा परिणाम मुलांच्या सध्याच्या आणि भविष्याच्या आयुष्यावरही दिसून येतो. लगेच दिसणाऱ्या परिणांमध्ये झोप कमी होणं आणि चिडचिडेपणा यांचा समावेश आहे तर भविष्यात होणाऱ्या परिणामांमध्ये लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता, दैनंदिन व्यवहार, शाळेतील अभ्यास आणि मुलांच्या स्थिरतेवर याचा परिणाम होताना दिसून येतो.

मुलांच्या स्वभाववरही होतो परिणाम

अनेक संशोधनानुसार हे स्पष्ट झालं आहे की, मुलांनी जर जेवताना मोबाईलचा वापर केल्यास त्यांना जाडेपणा, हट्टीपणा आणि स्वभावाशी निगडीत अनेक समस्या जाणवू शकतात. मोबाईल फोनच्या जास्त वापराने त्यांच्या एकाग्रता आणि विकासाला आळा बसतो. ज्यामुळे मुलांमध्ये हायपरअॅक्टीव्ह स्वभाल, डिप्रेशन आणि आत्महत्त्येचे विचारही येऊ शकतात.

लहान वयातच लागत आहेत चष्मे

व्हिडीओ गेम आणि मोबाईलमुळे जरी मुलांचं मनोरंजन होत असलं तरी त्यांच्या डोळ्यांसाठी हे फारच नुकसानदायक आहे. जास्त वेळ मोबाईल किंवा व्हिडीओ गेम पाहिल्याने मुलांच्या रेटीनावर परिणाम होत आहे. यामुळे अगदी लहान वयातही आजकाल मुलांना चष्मा लागल्याचं चित्र दिसत आहे.

मुलांना किती वेळ द्यावा मोबाईल?

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओनुसार एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना इलेक्ट्रॉनिक स्क्रीनची अजिबात ओळख असता कामा नये. तसंच पाच वर्षापुढच्या मुलांनाही जास्तीत जास्त एक तास कोणतंही इलेक्ट्रीक गॅजेट हाताळण्यास द्याव. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या वापराने मुलांचा सामाजिक घडामोडी किंवा घरातल्या एखाद्या क्रार्यक्रमात भाग घेण्याकडेही कल कमी होतो. डिजीटल मीडियामुळे मुलं सोशल होऊ पाहत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याची प्रक्रियाही उशिराने सुरू होते. अशा मुलांमध्ये मोठं झाल्यावर संवाद साधण्यामध्ये समस्या जाणवतात, यावर उपाय काय? पाच वर्षापेक्षा जास्त लहान मुलांना जास्तीत जास्त एकच तास मोबाईल द्या. जर तुमचं मुल पाच वर्षापेक्षा मोठ असेल तर जास्तीत जास्त दोन तास. गॅजेट्सचा जास्त वापर करत असल्यास मुलांना काउंन्सिलरकडे न्या किंवा त्यांना जास्तीत जास्त शारिरीक अॅक्टीव्हिटीजमध्ये बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा.

फिजीकल अॅक्टीव्हिटीमुळे चांगली वाढ

आजकाल मैदानात खेळताना दिसणारी मुलं हे एक दुर्मिळ चित्र झालं आहे. आधीसारखी मुलं आता एकत्र खेळताना दिसतच नाहीत. मोबाईलच्या सवयीमुळे मुलांच्या मैदानात जाऊन खेळणाच्या सवयीलाही विराम लागला आहे. डॉक्टर्सचं म्हणणं आहे की, मुलांच्या विकासासाठी फिजीकल अॅक्टीव्हिटी आणि बाहेर जाऊन खेळणं आवश्यक आहे. आयुष्याच्या सुरूवातीच्या वयात मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. फिजीकल अॅक्टीव्हीटीमुळे मुलांच्या मेंदूच्या विकासाची गती आणि सीमा वाढते. बाहेर खेळण्यामुळे मुलांची आकलनक्षमता आणि शारिरीक क्षमताही चांगली होते. ज्या मुलांना गॅजेट्सची सवय लागलेली असते ते विकासाच्या प्रक्रियेत मागे पडतात. ज्यामुळे मुलांमध्ये हायपर अॅक्टीव्हीटी आणि लक्षकेंद्रित न होण्याची समस्या निर्माण होते.

मुलांपासून मोबाईल कसा दूर करावा

जर तुमच्या मुलाची सतत मोबाईल किंवा टीव्ही बघण्याची सवय तुम्हाला सोडवायची असल्यास फॉलो करा या टीप्स

– मुलांसमोर ठेवा उदाहरण

मुलं ही नेहमी आईबाबांचं अनुकरण असतात. जसं वातावरण घरात असेल त्याचप्रमाणे मुलंही वागत असतात.   जर तुम्ही न्यूजपेपर किंवा पुस्तक त्यांना वाचताना दिसलात तर त्यांनाही वाचनाची गोडी लागेल. तुम्हीच जर त्यांच्यासमोर सतत टीव्ही किंवा मोबाईल पाहताना दिसलात तर त्यांना नक्कीच सवय लागेल.

मुलांशी संवाद साधा

मुलांना विचारा की, त्यांना कोणते प्रोग्राम्स आवडतात. त्यांच्यासोबत बसून ते प्रोग्राम तुम्हीही पाहा आणि जर योग्य वाटले तरच ते मुलांना पाहू द्या. तेही ठराविक वेळेसाठीच. जेवताना मुलांना अजिबात मोबाईल वापरू देऊ नका. या वेळात मुलांशी संवाद साधा. त्यांच्याशी दिवसभरातल्या गोष्टींविषयी गप्पा मारा.

टीव्ही पाहण्याची वेळ ठरवा

टीव्ही पूर्णतः बॅन न करता मुलांची टीव्ही पाहण्याची वेळ ठरवा. जर त्यांना शाळेतून आल्यावर टीव्ही पाहायचा असले तर तसं करा. पण एका मागोमाग एक प्रोग्राम पाहू देऊ नका. मुलांसाठी नियम लागू करा आणि स्वतः ते नियम नक्की फॉलो करा. लक्षात ठेवा बरेचदा मुलं आईबाबाचं अनुकरण करतात. कधीतरीच त्यांना या नियमातून सूट द्या.

मुलांसोबत खेळा

मुलांसोबत इनडोर आणि आऊटडोर गेम्स खेळा. यामुळे तुमचं आणि मुलांचं बाँडीग चांगल होईल. मुलांना स्टोरी टेलिंग, बोर्ड गेम्स, आऊटडोर एक्टिविटीजमध्ये बिझी करा. स्वीमिंग, कराटे किंवा क्रिकेटसारख्या मैदानी खेळात त्यांना व्यस्त करा. एखादी हॉबी त्यांना डेव्हलप करू द्या. मुलांचा राग किंवा रडणं थांबवण्यासाठी कधीही खेळणी किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं लालूच देऊ नका.

झोपण्याआधी पाहू नका टीव्ही किंवा मोबाईल

झोपण्याआधी टीव्ही किंवा मोबाईल पाहिल्याने तुमच्या डोळ्यावर वाईट परिणाम होतो. शक्यतो झोपण्याआधी टीव्ही किंवा मोबाईलवर काहीही पाहू नका. सगळ्यात चांगला उपाय म्हणजे मोबाईल आणि टीव्हीला बेडरूममध्ये प्रवेशच नसावा.

फोटो सौजन्य – Instagram

हेही वाचा –

लहानपणीचा हा खाऊ तुमच्या आठवणी करेल ताज्या

म्हणून संक्रांतीच्या काळात लहान मुलांना घातले जाते ‘बोरन्हाण’

‘या’ रंगांच्या सणाला अशी घ्या मुलांची काळजी

Read More From Mental Health