DIY लाईफ हॅक्स

तुमच्या झाडांना फुले किंवा फळे येत नसतील तर हे घरगुती लिक्विड फर्टीलायझर वापरा

Vaidehi Raje  |  Mar 31, 2022
homemade liquid fertilizerr

आजकाल बऱ्याच लोकांना बागकामाची आवड लागली आहे. बरेच लोक त्यांच्या घरात रोपे लावतात. कारण झाडांमुळे घरातली हवा शुद्ध राहण्यास मदत होते आणि ते तुमच्या घराला सुंदर लुक देखील देतात. तसेच झाडे लावल्यामुळे वातावरणात सकारात्मक लहरी पसरतात. म्हणूनच लोक त्यांच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गच्चीत किंवा बाल्कनीत तुळस, आलं, गवती चहा अशा औषधी रोपांपासून तर लव्हेंडर, चमेली अशी सुगंधी व शोभेची झाडे लावतात. झाडे लावताना त्यांची काळजी कशी घ्यावी हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे. अनेकजण झाडाच्या वाढीसाठी घन खत, द्रव खत घालतात आणि विविध प्रकारे झाडांची काळजी घेतात. 

घन खतांपेक्षा लिक्विड फर्टिलायझर घालणे अधिक सोपे 

Homemade Liquid Fertilizer

आता वसंत ऋतूची चाहूल लागली आहे. या ऋतूमध्ये झाडांना नवीन मोहोर येतो. नवीन पालवी फुटते. अशावेळी जर झाडांना खत घातले तर त्याचा झाडांना फायदाच होतो कारण पुढे येणारा कडक उन्हाळा झाडांसाठी फारसा अनुकूल नसतो. याच दिवसांत झाडांना दिलेला खताचा एक डोस झाडांची निरोगी वाढ होण्यात फायदेशीर ठरू शकतो. खत म्हटले की आपल्यापुढे मातीत मिक्स करायचे घन स्वरूपातीलच खत डोळ्यांपुढे येते. पण  घन खतांपेक्षा द्रव खतांमुळे तुमच्या झाडांना पोषक द्रव्ये त्वरीत मिळतात, त्यामुळे जेव्हा त्यांना सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांना पोषक घटक देऊ शकता.  बागेत घन खत वापरताना ते जास्त प्रमाणात घालणे आपल्याला झाडाच्या जलद वाढीसाठी आवश्यक वाटू शकते पण ते आपल्या झाडांसाठी हानिकारक ठरू शकते. याउलट द्रव स्वरूपातील खत झाडांना योग्य डोसमध्ये देणे सोपे आहे व त्याचा झाडांना चांगलाच फायदा होतो. आपण घरीही नैसर्गिक घटक वापरून ऑरगॅनिक द्रव खत बनवू शकतो. 

द्रव शेणखत

शेणखत हा नायट्रोजनचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. शेणखतापासून लिक्विड खत बनवण्यासाठी 1 भाग चांगले जुने शेणखत आणि 5 भाग पाणी व एक पोतं या साहित्याची आवश्यकता आहे. लिक्विड खत बनवण्यासाठी एका तागाच्या पोत्यामध्ये शेणखत भरा आणि हे पोतं एका बादलीत ठेवा. बादलीत पाणी भरा आणि ती झाकून ठेवा. आपण टी-बॅग वापरून चहा बनवतो तसे शेणखताचा अर्क एक ते दोन आठवड्यात या पाण्यात उतरेल आणि मग तुम्ही हे द्रव खत झाडांना देऊ शकता. झाडांना घालताना हे खत 1:16 च्या प्रमाणात डायल्युट करून मगच घाला. 

Homemade Liquid Fertilizer

द्रव कंपोस्ट खत 

हे खत बनवण्यासाठीही आपण वरचेच प्रमाण घेणार आहोत. 1 भाग सेंद्रिय पदार्थ ते 5 भाग पाणी असे प्रमाण घ्या. फक्त यावेळी आपण  शेणखताच्या ऐवजी घरगुती कंपोस्ट घेणार आहोत. घरगुती कंपोस्ट हे ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखले जाते त्यामुळे या लिक्विड खताचा झाडाला खूप फायदा होतो.  एका बादलीमध्ये 1 भाग घरगुती कंपोस्ट भरा आणि त्यात  5 भाग पाणी  घालून ते ढवळा आणि चार दिवस हे मिश्रण झाकून ठेवा. जेव्हा ते वापरण्यासाठी तयार असेल, तेव्हा ते एखाद्या जुन्या कापडाने गाळून घ्या. 1:10 या प्रमाणात डायल्युट करून हे खत ताबडतोब झाडांना घाला. या खतामुळे झाडाची चांगली वाढ झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. 

केळ्याच्या सालीचे द्रव खत 

केळीचे साल हे वनस्पतींसाठी, विशेषत: गुलाबांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. केळ्याच्या सालीत पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम ही खनीजे असतात. दोन ते तीन केळ्यांची साले घेऊन साधारण अर्धा लिटर पाण्यात काही दिवस भिजत ठेवा. त्यातील अर्क पाण्यात उतरला की मग तुम्ही हे खत तुमच्या झाडांसाठी वापरु शकता. हे खत डायल्युट करण्याची गरज नाही. 

फोटो क्रेडिट- istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स