DIY लाईफ हॅक्स

तुमचेही पराठे फुटतात का? या ट्रिक्स येतील कामी

Leenal Gawade  |  Mar 13, 2022
पराठा बनवताना

 नाश्त्याला  वेगवेगळे पदार्थ खायला सगळ्यांना आवडतात. त्यातल्या त्यात पराठा हा हेवी प्रकार तर खूप जणांच्या आवडीचा. पण पराठे करणे तितकेसे सोपे नाही. म्हणजे पराठ्यांचे  सारण जरी बनवता आले तरी देखील पराठे लाटताना अनेकांचे पराठे फुटतात. पराठे फुटले की, ते तव्याला चिकटणे, त्याचा आकार बिघडणे असे झाले की, पुन्हा कधी  पराठे करावे असेही वाटत नाही. पण पराठ्यांना काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर तुमचे पराठे अजिबात फुटणार नाही. उलट ते छान चपातीप्रमाणे फुलतील आणि चवीला एकदम कमाल लागतील. तुम्ही कधीही ते करुन डब्याला देखील घेऊन जाऊ शकाल.

सारण बनवताना

सारण बनवताना

पराठ्यांचे सारण हे सगळ्यात जास्त महत्वाचे असते. तुम्ही कोणतेही पराठ्यासाठीचे सारण बनवा.त्यामध्ये जर कांदा किंवा भाजी चिरुन घातलेल्या असतील तर त्या भाज्या अगदी बारीक चिरुन घ्या. त्यामुळे त्या लाटताना मध्ये मध्ये येत नाही. खूप वेळा पराठा करताना भाज्या जास्त मोठ्या आकाराच्या चिरल्या गेल्या असतील तर त्या नक्कीच पराठा लाटताना मध्ये मध्ये येतात. विशेषत: कांदा. कांदा बारीक चिरला नसेल तर तो कांदा सतत मध्येमध्ये येत राहतो. त्यामुळेही पराठा फाटत राहतो. पराठा फाटला की, मग तो तव्याला चिकटणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही सारण बनवताना ते चांगले बारीक आहे की नाही हे तपासा

पीठ मळताना

पराठ्यांना खूप पातळ पीठ मळून अजिबात चालत नाही. जर तुम्ही पीठ खूप पातळ मळले की, सारण बाहेर येणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही पीठ थोडे जाड मळा. तसे केले तर पराठे लाटताना त्यातून सारण बाहेर  येणयाची भीती नसते. विशेषत: नव शिख्या व्यक्ती असतात त्यांना पातळ पिठाचे पराठे लाटणे अजिबात शक्य नसते. त्यामुळे तुम्हाला पराठ्यासाठी पीठ मळताना ते खूप पातळ नको. याचा विचार करावा. पराठ्याचे पीठ तुम्ही अगदी नीटच मळायला हवे.

पराठे लाटताना

पराठे लाटणे हे एक स्किल आहे. तो लाटताना तुम्ही नीट सावकाशीने लाटायला हवा. पीठाचा एक गोळा घेऊन त्याची एक छोटी पोळी लाटा. आता त्यामध्ये बेताने सारण घाला. चमच्याने किंवा गोळा करुन सारण भरले तर ते अधिक चांगले. आता सारणाचा गोळी तुम्ही पोळीच्या मधोमध ठेवल्यानंतर मोदकाप्रमाणे तुम्हाला तो बंद करुन घ्यायचा आहे. मोदकासारखे केल्यानंतर वरील जास्तीचे पीठ काढून टाकायचे आहे. आता त्याचा पेठ्यासारखा आकार करुन लाटायला घ्यायचे आहे. पराठे पातळ अजिबात लाटता कामा नये. कारण असे करताना पराठे फुटू शकतात.  पराठे हे थोडे जाडच असायला हवे.  पराठे लाटताना तुम्ही ते मधल्या भागात जोरदार लाटण्यापेक्षा ते कडाकडांनी लाटा. पराठ्यांचा मधला भाग ही खूप जाड होता कामा नये. 

असा शेका पराठा

असा शेका पराठा

पराठा शेकण्याची पद्धत ही जाणून घेणे गरजेचे आहे. पराठा मध्यम आचेवर भाजला की, तो चांगला आतून शेकला जातो. आधी पराठा एका बाजूने थोडासा शेका. त्यानंतर दुसऱ्या बाजूला पूर्ण शेका. त्यामुळे त्याचा पदर निघून ते पराठे फुलायला देखील मदत मिळते. त्यामुळे पराठा शेकण्याची पद्धत ही देखील तुम्ही जाणून घ्यायला हवी. 

आता तुमचेही पराठे फुटत असतील तर तुम्ही या काही टिप्स लक्षात घ्या.

Read More From DIY लाईफ हॅक्स