पावसाळा खरंतर खूप आनंद घेऊन येत असतो. या दिवसात झाडांना फुटलेली पालवी, हवेतील मस्त गारवा हा हवाहवासा असतो. पण येणारा कुबट वास हा कोणालाही नकोच असतो. पावसात घराबाहेर आणि घरात एक विचित्र कुबट अशी दुर्गंधी येते जी कोणालाही आवडत नाही. ही दुर्गंधी अनेकदा कशातून येते तेही कळायला काही मार्ग नसतो. पण चपलांचे स्टँड, बेडरुमचा कोपरा, डोअर मॅट अशा ठिकाणी एक वेगळाच वास येतो. असा हा वास घालवायचा असेल तर काही सोप्या टिप्स तुम्हाला नक्कीच कामी येतील. या टिप्स फार सोप्या आहेत. ज्यासाठी तुमच्या खिशाला फार काही ताण येईल असे नाही. पण सातत्याने तुम्हाला या गोष्टी कराव्या लागणार आहेत.
सेंटेड कँडेल
मेणबत्या केवळ लाईट गेल्यानंतरच वापरण्याचा ट्रेंड आता राहिला नाही. बेडरुममध्ये किंवा बाथरुममध्ये लावण्यासाठी सेंटेंड कँडल्स मिळतात. त्या आणून तुम्ही घरात लावून ठेवा. या दिसायला तर सुंदर दिसतातच. पण त्याचबरोबर चांगला सुवास देतात. त्यामुळे तुम्ही घरात अशा कँडल्स आणा. इतकेच नाही तर तुम्हाला घरी आणूनही हे कँडल्स बनवताही येतात. त्यामुळे पैसाही वाचण्यास मदत मिळेल.
सुवासिक कापूर
कापराचा वास हा देखील खूप जणांना आवडतो. हल्ली कापरालाही चांगलेच कर्मशिअल लुक देण्यात आलेले आहे. कापूरमध्ये जॅस्मिन, सँडलवूड किंवा अन्य काही सेंट घालून मग ते तयार केले जातात. सुवासिक कापराचा कोन जर घराच्या एखाद्या कुबट कोपऱ्यात किंवा चपलांच्या स्टँडटच्या जवळ ठेवला तर त्याचा मंद सुवास दरवळत राहतो. सुवासिक कापूराचा वास खोलीमध्ये जास्त काळ भरुन राहतो. कापूर जास्त काळ टिकतोही. त्यामुळे पावसाच्या या दिवसात कापूर जास्तीत जास्त घरात आणा आणि तो रुममध्ये ठेवा.
( ज्यांना कापराचा वास आवडत नसेल तर त्यांनी कापूर टाळावा)
ओल्या कपड्यांची काळजी
पावसात ओले कपडे सुकायला थोडा वेळच लागतो. असे ओले कपडे घरात असतील तर त्याचा कुबट वास येऊ लागतो. हा वास इतका भरुन राहतो की, जायचे नाव घेत नाही. अशावेळी ओल्या कपड्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही ते मोकळे वाळत घाला. कपडे धुतल्यानंतर त्यामध्ये सुंगधी फॅब्रिक लिक्विड घाला. त्यामुळे तो वास येत नाही. शिवाय अशावेळी तुम्ही जरा घरात कापूर किंवा एअर फ्रेशनर मारा. त्यामुळे हा कपड्यांचा जास्त वास येत नाही.
चपला ठेवताना
चपलांच्या रॅकवर ओल्या चपला ठेवल्यामुळे त्या ठिकाणी खूप घाणेरडा, कुबट आणि ओला दमट असा वास येतो. त्यामुळे चपला बाहेरुन आणताना त्या वाळल्याशिवाय त्या अजिबात आत ठेवू नका. शिवाय खूप जण पावसाळी चपला घालत नाहीत. तर ही चूक करु नका. लेदरचे बूट किंवा इतर मटेरिअलमध्ये असलेले शूज वापरु नका. चपलांच्या स्टँडमध्ये तुम्ही डांबराची गोळी ठेवा. त्यामुळे दमट असा वास येत नाही.
एअर डिफ्युजर
हल्ली एअर डिफ्युजर मिळतात. यामध्ये सुगंधी लिक्वीड टाकून त्याचा सुवास घरभर राहण्यास मदत मिळते. त्यामुळे घरात असे डिफ्युजर आणून ठेवा. ते बाथरुम आणि बेडरुममध्ये आणून ठेवा. इलेक्ट्रिसिटीवर चालणारे हे डिफ्युजर आणा. याचा वास अधिक काळासाठी टिकून राहतो
आता घरात दुर्गंधी येत असेल तर तुम्ही हे सगळे पर्याय आणि ट्रिक्स नक्की ट्राय करा.