DIY लाईफ हॅक्स

जुने मेकअप ब्रश टाकून देऊ नका, असा करता येईल त्यांचा वापर

Vaidehi Raje  |  Apr 8, 2022
Reusing Old Makeup Brushes

जेव्हा मेकअप ऍक्सेसरीज जुन्या होतात तेव्हा त्या त्वचेवर वापरणे हानिकारक असू शकते. वस्तूंचा भरपूर वापर झाल्यावर काही काळाने या वस्तू खराब होऊ लागतात. अशा जुन्या झालेल्या वस्तूंचा वापर आपल्या त्वचेवर केल्यास ऍलर्जी आणि संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच जेव्हा मेकअप उत्पादनांची एक्स्पायरी डेट उलटून जाते तेव्हा त्यांचा वापर करू नये. आपल्याला मेकअपसाठी सौंदर्य उत्पादनांप्रमाणेच काही वस्तूही लागतात. मेकअपसाठी बाजारात विविध प्रकारचे ब्रशेस येतात, ज्याच्या मदतीने मेकअप करणे आपल्याला सोपे जाते. पण जेव्हा हे मेकअप ब्रश किट्स जुने होतात, तेव्हा आपण ते अगदी सहजपणे फेकून देतो. 

आजकाल युझ अँड थ्रो वस्तूंमुळेच आपली पृथ्वी व पर्यावरण धोक्यात आले आहे. इतका टन कचरा साठलाय की त्याचे काय करायचे हा यक्षप्रश्न आपल्यापुढे उभा राहिला आहे. प्लॅस्टिकचे तर इतके भयंकर प्रदूषण झाले आहे की 77 टक्के लोकांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. त्यामुळे कुठलीही वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की याचा पुनर्वापर होऊ शकेल का?आपण ठरवले तर बहुतांश वस्तूंचा वेगळ्याप्रकारे वापर करू शकतो. रिड्यूस रियूझ रिसायकल हे नुसते म्हणायला सोपे असले तरी ते अंगीकारणे ही काळाची गरज आहे. इतर गोष्टींप्रमाणे आपण जुन्या व खराब झालेल्या मेकअप ब्रशेसचा विविध प्रकारे वापर करू शकतो. मेकअप ब्रशच्या साईज आणि शेपनुसार तुम्ही तुमचा जुना ब्रश वेगवेगळ्या कारणांसाठी वापरू शकता.

आर्ट आणि क्राफ्ट 

ज्या लहान मुलांना आणि मोठ्यांनाही पेंटिंग किंवा हस्तकलेची आवड आहे ते जुने फ्लॅट, मिडीयम किंवा मोठे मेकअप ब्रश पेंटिंगसाठी, गोंद लावण्यासाठी किंवा लाकूड पेंट करण्यासाठी वापरू शकतात. आर्ट ब्रशेसमध्ये सहसा असे ब्रश मिळत नाहीत. या जुन्या मेकअप ब्रशच्या मदतीने तुम्ही वेगवेगळे डिझाइन्स आणि स्ट्रोक्स पेंट करू शकता. बर्‍याच वेळा जेव्हा आपण खूप मोठ्या पानावर चित्र काढतो, तेव्हा मोठ्या पेंट ब्रशची आवश्यकता असते, म्हणून जर तुमच्याकडे घरामध्ये मोठ्या आकाराचा पेंट ब्रश नसेल तर तुम्ही जुन्या मेकअप ब्रशने पेंटिंग बनवू शकता.

स्पा थेरपीसाठी उपयुक्त

तुमच्याकडे जर स्पा किट नसेल तर तुम्ही तुमचे फेस मास्क आणि लोशन सहजतेने लावण्यासाठी जुने फाउंडेशन ब्रश वापरू शकता.

Reusing Old Makeup Brushes

डस्टिंग 

डोमच्या आकाराचे मिडीयम किंवा लहान ब्रशेस फर्निचर आणि सपाट पृष्ठभागांवरची धूळ स्वच्छ करण्यासाठी उत्तम आहेत. फक्त धूळ स्वच्छ केल्यावर हे ब्रश साबणाने धुवून ठेवा जेणे करून त्यामध्ये बॅक्टेरियांची वाढ होणार नाही. 

बागकाम आणि स्वच्छता

डोमच्या आकाराचे मिडीयम किंवा लहान ब्रशेस तुमच्या घरातील झाडांवरची धूळ स्वच्छ करण्यासाठी देखील वापरता येऊ शकतात. पावडर ब्रशने तुम्ही तुमच्या इनडोअर प्लांट्सची पाने स्वच्छ करून तुमचे झाड निरोगी ठेवू शकता. तसेच गळलेली पाने मुळांपासून दूर ठेवण्यासाठी लहान ब्रश वापरून तुम्ही ती पाने काढून टाकू शकता. तसेच लहान आकाराचे ब्लश आणि आयब्रश तुम्ही तुमचा कंप्युटरचा कीबोर्ड, फोन आणि इतर उपकरणे स्वच्छ ठेवण्यासाठी वापरू शकता. तुमच्या स्वयंपाकघरातील उपकरणेही तुम्ही या ब्रशने सहजतेने स्वच्छ करू शकता. तुम्ही तुमच्या जुन्या मेकअप ब्रशच्या मदतीने कॅमेर्‍याची लेन्स बारकाईने साफ करू शकता. पण लेन्स स्वच्छ करण्यापूर्वी मेकअप ब्रश पूर्णपणे स्वच्छ असला पाहिजे, जेणेकरून ब्रशमधील कण कॅमेरा लेन्सवर पडणार नाहीत.

Reusing Old Makeup Brushes

नेल आर्ट 

लाइनर ब्रश आणि स्पंजचा उपयोग करून तुम्ही उत्कृष्ट असे नेल डिझाईन्स काढू शकता. तसेच  Ombre नेल्सचे डिझाईन हवे असेल तर त्यासाठी स्पंज उत्तम आहेत.हे दोन्हींही वापरून तुम्ही सुंदर नेल आर्ट करू शकता. 

खिडक्या स्वच्छ करा

तुम्ही खिडक्या स्वच्छ करण्यासाठीही तुमचे जुने मेकअप ब्रश वापरू शकता. यासाठी जुन्या ब्रशवर व्हिनेगर स्प्रे करून घराच्या खिडक्या स्वच्छ करा. जर तुमचा मेकअप ब्रश मोठा असेल तर त्याने तुम्ही विंडो फ्रेम देखील साफ करू शकता.

अशा प्रकारे तुम्ही जुन्या मेकअप ब्रशचा पुनर्वापर करू शकता. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स