आरोग्य

हर्नियाकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, अशी घ्यावी काळजी

Vaidehi Raje  |  Jul 18, 2022
Hernia Symptoms

हर्निया ही हल्ली एक सामान्य समस्या झाली आहे. हल्ली आपल्या परिचयातील अनेक लोकांना हर्निया झाल्याचे किंवा हर्नियाचे ऑपरेशन झाल्याचे आपल्याला कळते. हर्निया ही समस्या स्त्री किंवा पुरुष कोणालाही होऊ शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पोटाचे स्नायू कमकुवत होतात किंवा स्नायूंमध्ये दोष निर्माण होतो तेव्हा हर्नियाची समस्या उद्भवते.

हर्नियामध्ये व्यक्तीच्या पोटाचे स्नायू कमकुवत होतात आणि आतडे किंवा अंतर्गत अवयवांपैकी एखादा भाग स्नायूंच्या आवरणातून आतून बाहेर पडतो आणि व्यक्ती आडवी पडल्यावर परत आत जातो. 

हर्नियामुळे होणारा त्रास 

हर्नियामध्ये उभे राहणे, खोकला किंवा इतर कोणतेही काम करताना त्रास होतो. हर्नियाची समस्या उद्भवते जेव्हा पोटातील कोणताही अवयव किंवा स्नायू किंवा ऊती स्नायूंच्या छिद्रातून बाहेर येऊ लागतात. उदाहरणार्थ, पोटाच्या कमकुवत भिंतीच्या छिद्रातून बरेचदा आतडे बाहेर येते. ओटीपोटाचा हर्निया हा सर्वात सामान्य आहे, परंतु वरच्या मांडी, मधल्या ओटीपोटात आणि मांडीच्या भागात (उदर आणि मांडी दरम्यानचा भाग) देखील हर्नियाची समस्या होऊ शकते. हर्नियाची लक्षणे सहसा दिसत नाहीत, परंतु कधीकधी हर्नियामध्ये तीव्र वेदना होतात.  हर्निया हा सहसा जीवघेणा नसतो, परंतु तो आपणहून बरा होत नाही. कधीकधी हर्नियामुळे होणारी इतर धोकादायक गुंतागुंत टाळण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

Hernia Symptoms

जिथे हर्निया विकसित होतो, तिथे फुगवटा येतो आणि वेदना होतात. हर्निया लहान मुले, वृद्ध, महिला आणि पुरुष कोणालाही होऊ शकतो. परंतु पुरुषांमध्ये हर्नियाची प्रकरणे महिलांच्या तुलनेत सुमारे 25 टक्के जास्त आहेत. हर्नियाचे अनेक प्रकार आहेत. ते ज्या भागात होते त्यावरून त्यांची नावे आहेत. इनग्विनल, इन्सिजनल ,फेमोरल, अंबिलीकल आणि हायटल हे हर्नियाचे काही प्रकार आहेत. 

हर्निया होण्याची प्रमुख कारणे व लक्षणे

Hernia Symptoms

लठ्ठपणा, स्नायूंचा कमकुवतपणा आणि तणाव ही हर्निया विकसित होण्याची मुख्य कारणे आहेत. याशिवाय पोटाचे स्नायू स्थिर न करता जड वजन उचलणे, बराच काळ बद्धकोष्ठता असणे, सततचा खोकला,  अनुवांशिक कारण, दुखापत किंवा शस्त्रक्रिया, धूम्रपान ही देखील हर्निया विकसित होण्याची काही कारणे आहेत. हर्निया विकसित झालेल्या ठिकाणी वेदना, जडपणाची भावना आणि ओटीपोटात सूज येणे ही हर्नियाची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. त्याबरोबरच ताप, बद्धकोष्ठता, अचानक आणि तीव्र वेदना, मळमळ आणि उलटी, शरीरावर लाल किंवा काळे-निळे डाग पडणे ही लक्षणे देखील हर्नियामध्ये दिसू शकतात. 

हर्निया न होण्यासाठी काय काळजी घ्यावी 

हर्नियाचा त्रास होऊ नये म्हणून धूम्रपान करू नका, वजन नियंत्रणात ठेवा. तसेच तुमचा खोकला दीर्घकाळ अंगावर काढू नका. खोकला लवकर बरा होत नसल्यास डॉक्टरांना भेटा. तसेच स्वतःच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलू नका, आणि जर कधी एखादी जड वस्तू उचलायची असेलच तर ती गुडघ्यावर भार टाकून उचला. हर्निया झाल्यास त्याचा उपचार त्याच्या आकारावर आणि लक्षणांच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. आहारात बदल करून हायटल हर्नियाची लक्षणे बरी होऊ शकतात. जर हर्नियाचा आकार सतत वाढत असेल किंवा वेदना होत असेल तर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. ही शस्त्रक्रिया पारंपारिक किंवा लॅपरोस्कोपिक तंत्राने केली जाते. लॅप्रोस्कोपिक तंत्र अधिक श्रेयस्कर मानले जाते, कारण त्यात लहान कट देऊन हर्नियावर उपचार करता येतो.. यामुळे आजूबाजूच्या टिश्यूजचे कमी नुकसान होते आणि जखम बरी होण्यासही कमी वेळ लागतो. या पद्धतीमुळे सर्व प्रकारच्या हर्नियावर सहज उपचार होतात आणि फार कमी औषधे घ्यावी लागतात. 

हर्नियाची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही डॉक्टरांना वेळोवेळी भेट द्या आणि सर्व औषधांचा कोर्स पूर्ण करा. शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन दिवस पूर्ण विश्रांती घ्या आणि किमान दोन महिने जड वस्तू उचलू नका. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय व  वैद्यकीय सल्ल्याशिवाय योगा आणि व्यायाम करू नका. हर्निया झाल्यास अशा प्रकारे काळजी घ्या. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य