Festival

अक्षय्य तृतीयेला आहे दान करण्याचं महत्त्व

Aaditi Datar  |  May 10, 2021
अक्षय्य तृतीयेला आहे दान करण्याचं महत्त्व

यंदा अक्षय्य तृतीया 14 मे ला येत आहे. अक्षय्य तृतीयेचं हे पर्व मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही लॉकडाऊनमध्ये येत आहे. अक्षय्य तृतीयेचं पर्व हे दरवर्षी वैशाख मासातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरं केलं जातं. धर्मशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केल्याने तुम्हाला अगणित पुण्यफळासोबत अक्षय धनाची प्राप्ती होते. या दिवशी कोणत्याही प्रकारच मंगल कार्य हे विना पंचांग आणि मुहूर्त न पाहता केलं जातं. अक्षय्य तृतीयेची माहिती आणि तिथी माहीत करून घेणं आवश्यक आहे. अक्षय्य तृतीयेच्या पर्वाला अखातीज आणि वैशाख तीज असंही म्हटलं जातं. या निमित्ताने अक्षय तृतीया शुभेच्छा दिल्या जातात. हा सण भारतभर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी स्नान, दान, जप आणि हवन केल्याने तुम्हाला अक्षय रूपी फळाची प्राप्ती होते.

अक्षय्य तृतीयेला दानाचं महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जी शुभ कार्य केली जातात, त्यांचं फळ अक्षय मिळतं. सतयुग आणि त्रेता युगाचा प्रारंभ या तिथीला झाल्याचं मानलं जातं. भगवान विष्णू नर-नारायणाच्या रूपात तसंच परशुरामाच्या रूपात या दिवशीच अवरतरले होते. या दिवशी विवाहीत आणि अविवाहीत बहिणी विशेष पूजा करतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजाही केली जाते. काही जण या दिवशी महालक्ष्मीच्या देवळात जाऊन धन प्राप्तीच्या इच्छेने चारी दिशेला नाणे टाकतात. आपल्यापैकी अनेक जणांना याबद्दल कदाचित माहिती नसेल की, अक्षय्य तृतीयेला फक्त खरेदीच नाहीतर दान करणंही महत्त्वाचं आहे. धर्मशास्त्रानुसार, या खास दिवशी दान-पुण्य केल्याने धन-वैभवात वृद्धी होते. एका प्राचीन कथेनुसार, आजच्या दिवशी भगवान शंकराकडून कुबेराला धनप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी भगवान शंकराने माता लक्ष्मीला धनाची देवी होण्याचा आशिर्वाद दिला होता. या दिवशी दान केल्याने मृत्यूचं भयही दूर होतं. या दिवशी तुम्ही ज्या गोष्टीचं दान कराल त्याचं फळ तुम्हाला जन्मोजन्मी मिळत राहतं. 

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने करा दान

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने करा या गोष्टींचं दान –

– अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गरीब मुलांना दूध, दही, लोणी, पनीर इत्यादीचं दान केल्याने विद्येची देवी सरस्वतीचा विशेष आशिर्वाद मिळतो. 

– अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तीळ आणि तांदूळाचं दान केल्याने आजन्म अन्नाची कमतरता भासत नाही. 

– अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी गंगा, नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करून सातू खाल्ल्याने आणि ज्वारी व सातूचं दान केल्याने त्या व्यक्तीची अनेक पापांच्या दुष्फळातून मुक्तता होते.   

– कुंकवाचं दान केल्यास तुम्हाला आयुष्यात हवं असलेलं स्थान प्राप्त होतं. तसंच तुमच्या नवऱ्याचे आयुष्यही वाढते. 

– या दिवशी नारळाचं दान केल्यास तुमच्या पुढच्या सात पिढ्यांचा उद्धार होतो, असं म्हटलं जातं.

– कपडे दान केल्याने तुम्हाला झालेल्या रोगापासून तुमची मुक्तता होते. 

– तुम्ही धान्न्याचं दिन अक्षय तृतीयेला केल्यास अवेळी येणाऱ्या मृत्यूपासून तुमचं संरक्षण होईल. 

– पाणी आणि विड्याच्या पानाचं दान ब्राम्हणाला केल्यास तुमच्या धनसमृद्धीची भरभराट निश्चितपणे होईल. 

– दही भाताचं दान अक्षय्य तृतीयेला केल्यास तुमची कोणत्याही नकारात्मक गोष्टीपासून मुक्तता होईल आणि आयुष्यातील ध्येय साध्य करणं सोपं जाईल.

मग अशाप्रकारे येत्या अक्षय्यतृतीयेला फक्त खरेदीच नाहीतर दान करण्याचं महत्त्वही जाणून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या धनाचा दुसऱ्यांच्या कल्याणासाठीही निश्चितपणे वापर करा.

You Might Also Like

Akshaya Tritiya Quotes in English

 

Read More From Festival