3 जानेवारी 2022 पासून कोविड लसीकरण कार्यक्रमामध्ये 15 ते 18 वर्षे वयोगातील मुलांनाही सामावून घेण्याची घोषणा सरकारने केली आहे. शाळा आणि कॉलेजात जाऊ इच्छिणाऱ्या पण कोविड संसर्गाच्या भीतीमुळे अद्याप तसे करू न शकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर जून-जुलै 2021 मध्ये भारतात करण्यात आलेल्या एका सेरो सर्वेक्षणात आढळून आले होते की, 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील सेरो पॉझिटिव्हिटी ही वयस्क वयोगटासारखीच आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की, सर्व वयोगातील मुलांना संसर्ग होऊ शकतो आणि ती मुले देखील संसर्ग इतरत्र पसरवू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, लहान मुलांपेक्षा किशोरवयीन मुलांचे कोविड पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आधी किशोरवयीन मुलांना संरक्षण देणे गरजेचे आहे. त्याबाबत डॉ. हरिप्रसाद के, प्रेसिडेंट, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांच्याशी केलेली बातचीत.
अधिक वाचा – संसर्ग टाळण्यासाठी सहा महिन्यावरील प्रत्येकाने फ्लु शॉट्स घेणं गरजेचं
भारतात मुलांसाठी उपलब्ध असलेल्या कोविड लस कितपत सुरक्षित आहेत?
आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डिसीजीआय) मुलांसाठी वापरण्यासाठी कोवॅक्सीन आणि झायकोव्ह-डी यांना इमर्जन्सी यूज मंजुरी दिली आहे. या दोन्ही लसी देण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोवॅक्सीन ही लस शरीरात टोचली जाते, याचे दोन डोस घ्यावे लागतात आणि त्यामध्ये 28 दिवसांचे अंतर असावे लागते. झायकोव्ह-डी मध्ये सुईचा वापर होत नाही, ही लस त्वचेच्या थरांमध्ये दिली जाते. 28 दिवसांच्या अंतराने या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अतिशय काटेकोर मूल्यांकन प्रक्रियेचे पालन करत या दोन्ही लसींची सुरक्षितता आणि प्रभाव यांची तपासणी करूनच त्यांच्या वापराला मंजुरी दिली आहे.
अधिक वाचा – दीर्घकालीन कोविडमधून बरे होण्यासाठी टिप्स
प्लास्मिड डीएनए लस सुरक्षित आहे?
झायकोव्ह-डी ही लस अनोखी आहे कारण ही जगातील पहिली प्लास्मिड डीएनए लस आहे जिची चाचणी घेऊन ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. डीएनए हा जीवनाचा पाया मानला जातो आणि प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी ज्यावर अँटिजेन्स एनकोड करण्यात आले आहेत असे डीएनए प्लास्मिड्स वापरले जाणे हे एक नवे तंत्रज्ञान आहे आणि ते सुरक्षित आहे.
मुलांच्या लसीची सुरक्षितता सिद्ध झाली आहे का?
2021 च्या सुरुवातीला जेव्हा लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासून कोवॅक्सीनचा वापर केला जात असून त्यामध्ये या लसीची सुरक्षितता सिद्ध झाली आहे. 2 ते 18 वर्षे वयोगटामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या चाचणीच्या निष्कर्षानुसार ही लस सुरक्षित, योग्य प्रकारे सहन केली जाण्यायोग्य आणि रोगप्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. म्हणजेच ही लस मुलांसाठी सुरक्षित आहे. झायकोव्ह-डी आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसींना 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी वापरण्यासाठी डीसीजीआयने इमर्जन्सी यूज मंजुरी दिली आहे. पण सध्या सरकारने फक्त 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
अधिक वाचा – ओमिक्रॉनपासून कसे सुरक्षित रहाल?
कशा प्रकारे मुलांच्या शिक्षणाची बाधा दूर होईल?
संपूर्ण जगभरात असे आढळून आले आहे की, मुलांसाठी वापरण्यासाठी अनेक लसींना परवानगी दिली जात आहे. मुलांना स्वतःला तर लसीकरणाचे लाभ मिळतातच शिवाय त्याचे इतरही अनेक फायदे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने देखील अधोरेखित केले आहे. लसीकरणामुळे आपापसात आणि मुलांकडून मोठ्यांना कोविड संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. यामुळे मुले पुन्हा शाळेत जाऊ लागण्याची शक्यता वाढेल, अशाप्रकारे त्यांच्या शिक्षणात येत असलेल्या बाधा दूर होईल.
तर सारांश असा की, दोन्ही लसी सुरक्षित आहेत आणि आपण आपल्या मुलांचे लसीकरण करवून घेतले पाहिजे जेणेकरून ती सुरक्षित आणि निरोगी राहू शकतील.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक