बॉलीवूड

‘पंगा’साठी कंगनाचा कबड्डीशी ‘पंगा’

Trupti Paradkar  |  Dec 10, 2018
‘पंगा’साठी कंगनाचा कबड्डीशी ‘पंगा’

‘मणिकर्णिका’ शूटींगनंतर अभिनेत्री कंगना राणावत आता ‘पंगा’ या सिनेमाच्या शूटींगसाठी सज्ज झालीय. अश्विनी अय्यर तिवारी यांच्या ‘पंगा’साठी कंगना महिनाभर कबड्डी खेळाचं प्रशिक्षण घेत आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील गौरी वाडेकर, विश्वास मोरे, तारक राहुल हे कबड्डीपटू कंगनाला ट्रेनिंग देत आहेत.  “शूटींग सुरु करण्यापूर्वीच या भूमिकेसाठी रितसर प्रशिक्षण घेणं फार आवश्यक होतं. मात्र हे प्रशिक्षण घेण्यासाठी एक महिना हा खूपच कमी कालावधी होता. सर्वांनी त्यासाठी फार मेहनत घेतली. त्यामुळे कंगना आता या भूमिकेसाठी शारीरिकदृष्या नक्कीच तयार झाली आहे.” असं अश्विनी अय्यर तिवारी यांनी याबाबत म्हटलं आहे.

या भूमिकेसाठी कंगनाने घेतली आहे विशेष मेहनत

‘पंगा’ हा सिनेमा कबड्डी खेळावर आधारित असून कंगना यात एका कबड्डीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना नेहमी चाकोरीबाहेरील भूमिकांना प्राधान्य देते. तिच्या भूमिकांसाठी ती विशेष मेहनत देखील घेते. पंगामधील कबड्डीपटू साकारण्यासाठी कंगनाने तिच्या वजनामध्ये बदल करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय ती या भूमिकेसाठी स्पेशल डाएट देखील करत आहे. यापूर्वी मणिकर्णिका या सिनेमाच्या शूटींगसाठीदेखील ती रितसर घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेताना दिसली होती.

कबड्डीप्रेमींमध्ये सिनेमाबाबत उत्सूकता

पंगा सिनेमा 2019 ला प्रदर्शित होणार आहे. कबड्डी हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे. महाराष्ट्रात या खेळाला हुतूतू असंही म्हणतात. प्रो-कबड्डी लीगनंतर महाराष्ट्रात या खेळाला अधिकच लोकप्रियता प्राप्त झाली आहे. त्यामुळे सहाजिकच कबड्डीपटूंमध्ये या सिनेमाबद्दल अधिक उत्सूकता निर्माण झाली आहे.

बॉलीवूडमध्ये खेळांचे वारे

सध्या बॉलीवूडमध्ये खेळांवर आधारित अनेक चित्रपट निर्माण होत असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वीच बिग-बी अमिताभ बच्चन यांनी देखील झुंडमधील ‘फुटबॉल कोच’ च्या भूमिकेसाठी आपण नागपूरमध्ये असल्याचं ट्विट केलं होतं. अमिताभ बच्चन नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ या पहिल्या हिंदी सिनेमामध्ये काम करत आहेत. हा सिनेमा फुटबॉल खेळावर आधारित असून त्यामध्ये महानायक ‘विजय बारसे’ या फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

Read More From बॉलीवूड