मनोरंजन

यावर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये कार्तिक आर्यन एकच चेहरा

Dipali Naphade  |  Jan 21, 2019
यावर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये कार्तिक आर्यन एकच चेहरा

मुंबई मॅरेथॉन म्हटलं की, मुंबईचा सळसळता उत्साह दिसून येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिसते ती कलाकारांची भलीमोठी मंदियाळी. गेले सोळा वर्ष मुंबई मॅरेथॉन चालू आहे. सुरुवातीला मिळणारा प्रतिसाद मात्र यावर्षीच्या मॅरेथॉनमध्ये कमी अनुभवायला मिळाला. दरम्यान सेलिब्रिटीमध्ये केवळ कार्तिक आर्यन हा एकच नवा चेहरा पाहायला मिळाला. बाकीच्या सेलिब्रिटींची फारच कमी वर्णी लागलेली पाहायला मिळाली. दरवर्षी जॉन अब्राहम, जुही चावला यासारखे येणारे कलाकार यावर्षी मात्र कुठेही दिसले नाहीत. तर गुलशन ग्रोव्हर आणि टीना अंबानी हे फ्लॅगऑफसाठी उपस्थित होते. शिवाय धावायलादेखील तारा शर्मा, राहुल बोस आणि मिलिंद सोमण हे तीनच कलाकार दिसले. काजल अग्रवालदेखील यावेळी उपस्थित होती.


कार्तिक आर्यन पहिल्यांदाच सहभागी

कार्तिक आर्यनचा ‘सोनू की टिटू की स्वीटी’ हा चित्रपट आल्यापासून कार्तिक आर्यन हा हार्टथ्रोब ऑफ द नेशन झाला आहे. कार्तिकचा प्रेक्षकांमध्ये चांगला दबदबा आहे. यावर्षी मॅरेथॉनमध्ये कार्तिकला एका संस्थेसाठी पाठिंबा देताना पाहण्यात आले. कार्तिक आर्यन पहिल्यांदाच टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता. 47 हजारांपेक्षा जास्त लोकांनी यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. हेल्थी मुंबई राखण्यासाठी दरवर्षी मुंबई मॅरेथॉन घेण्यात येते. या स्पर्धेमध्ये लोक अतिशय उत्साहाने सहभागी होताना दिसतात. शिवाय दरवर्षी या मॅरेथॉनमध्ये सेलिब्रिटीदेखील उत्साहात सहभागी होताना आजपर्यंत पाहण्यात आले आहे. मात्र यावर्षी सेलिब्रिटीजची संख्या फारच तुरळक होती. असं का याचं कारण मात्र समजू शकलेले नाही. 


तारा शर्मा आणि राहुल बोस धावले

दरवर्षाप्रमाणे ड्रीम रनमध्ये तारा शर्मा आणि राहुल बोस यांनी आपला सहभाग नोंदवत मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. राहुल बोस यासाठी आधीपासूनच तयारी करत असतो तर तारा शर्मादेखील दरवर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये न चुकता सहभागी होत असते. तर मिलिंद सोमण आपली बायको अंकितासह सहभागी झाला होता. मिलिंद सोमण जगभर होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन हेल्थी जीवनशैली बाळगण्याचा नेहमीच सल्ला देत असतो. मिलिंद सोमण स्त्रियांमध्ये जागृती होण्यासाठी पिंकेथॉनमध्ये नेहमीच धावत असतो. शिवाय पिंकेथॉनच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणूनही मिलिंद कार्यरत आहेत. त्यामुळे मिलिंदही या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता.


मराठी सेलिब्रिटीजचा मॅरेथॉनमध्ये अभाव

मुंबई मॅरेथॉनमध्ये मराठी सेलिब्रिटीजदेखील पाहायला मिळाले नाहीत. वास्तविक मराठी सेलिब्रिटीजना मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना फारच कमी वेळा पाहायला मिळालं आहे. ठाण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना काही सेलिब्रिटीज दिसतात मात्र मुंबई मॅरेथॉनमध्ये मराठी सेलिब्रिटीजचा अभावच जाणवतो. कारण मराठी सेलिब्रिटी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना दिसत नाहीत.

सिनिअर सिटीझनचा दिसला जोश

सिनिअर सिटीझन्सचा मात्र जोश यावेळी दिसून आला. अगदी फ्लॅगऑफ झाल्यानंतरही नाचत नाचत बरेच सिनिअर सिटीझन्स सहभागी झाले होते. त्यांच्यातील लहान मूलच जणू प्रत्येकाला पाहायला मिळालं अशी स्थिती होती. शिवाय सिनिअर सिटीझन्सने मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचेही खूप सारे फोटो धावताना काढले असल्याचं पाहायला मिळत होतं. शिवाय कार्तिक आर्यनदेखील सिनिअर सिटीझन्सना खूपच उत्साहाने पाठिंबा देत होता. अगदी उत्साहाने हे सर्व सिनिअर सिटीझन्स धावले.

 

Read More From मनोरंजन