मनोरंजन

Review – आणि कडडड्क काशीनाथ घाणेकर

Dipali Naphade  |  Nov 15, 2018
Review – आणि कडडड्क काशीनाथ घाणेकर

ही कथा आहे ती रंगभूमीच्या पहिल्यावहिल्या सुपरस्टारची अर्थात डॉ. काशीनाथ घाणेकर यांची. काशीनाथच्या निमित्ताने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असा चित्रपट मराठीमध्ये आला आहे असं म्हणावं लागेल. अर्थात मराठीमध्ये नेहमीच वेगळ्या कथा आणि धाटणीचे चित्रपट येत असतात. पण हा चित्रपट अगदीच वेगळा आहे आणि या पात्राला खरा न्याय दिला आहे तो सुबोध भावे या कलाकाराने.


जेव्हा काशीनाथ घाणेकर प्रसिद्धीच्या शिखरावर होते तेव्हा नेमकं काय घडलं? काशीनाथ घाणेकर नक्की कसे होते आणि त्यांची कारकीर्द कशी घडली या सगळ्या गोष्टींचे पदर या चित्रपटांमध्ये उलगडले आहेत. प्रसिध्द दंतशल्यविशारद ते गाजलेल्या नटाचा प्रवास आणि मग उतरत्या काळानंतर शोकांतिकेकडे कशी झाली या नटाची वाटचाल याची संपूर्ण कथा या काही तासांमध्ये अप्रतिमरित्या दिग्दर्शकाने उलगडून दाखवली आहे आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडेला साथ मिळाली आहे ती म्हणजे सुबोध भावे, सुमीत राघवन, प्रसाद ओक यासारख्या कलाकारांची. सुबोध भावेने तर यावर्षी अनेक वेगवेगळ्या पठडीचे चित्रपट केले आहेत आणि प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी सुबोध अक्षरक्षः ‘जगला’ आहे, असंच म्हणावं लागेल. मग अगदी सुबोधची बालवगंधर्वांची व्यक्तिरेखा असो वा डॉ. काशीनाथ घाणेकर.

कदाचित आपल्या पिढीतील प्रेक्षकांना काशीनाथ घाणेकर हे कलाकार म्हणून नावाने माहीत आहेत. मात्र त्यांना प्रत्यक्षात बघण्याची संधी मिळालेले प्रेक्षक हे खरोखरीच भाग्यवान म्हणायला हवेत. चित्रपटात सर्व काही चांगलं दाखवण्यात येतं असं नेहमी म्हटलं जातं. पण इतक्या नावाजलेल्या माणसाचा अगदी त्याला साजेसा माजही अगदी योग्यरित्या या चित्रपटात दाखवण्यात दिग्दर्शक आणि सुबोध भावे या दोघांनाही यश मिळालं आहे.


या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे तो म्हणजे यातील संवाद. उत्कृष्ट पटकथा आणि खिळवून ठेवणारे संवाद यामुळे या चित्रपटाचा दर्जा उंचावला आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. पहिल्या भागात तर चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. काशीनाथ घाणेकर यांची त्याकाळी गाजलेली नाटकं आणि चित्रपट या चित्रटातून पुन्हा जिवंत होऊन मोठ्या पडद्यावर साकारले गेले आहेत. सुबोधची संवादफेक कमाल आहे. सुबोधला पाहिल्यानंतर काशीनाथ घाणेकर हुबेहूब असेच असावेत असंही वाटून जातं आणि हीच त्याच्या अभिनयाची कमाल आहे. बऱ्याचदा नकळत डोळ्यात पाणी येतं. त्यामुळे प्रेक्षकाला ह्या चित्रपटाने प्रत्येक बाबीत जिंकलं आहे, असं म्हणावं लागेल.  


एकूणच आणि काशीनाथ घाणेकर या सुपरस्टारचा प्रवास हा प्रेक्षकाला संपूर्ण खिळवून ठेवतो आणि अचंबित करतो. यातील बरेच असे सीन आहेत जे मनाला चटका लावतात. मात्र हा चित्रपट पाहात असताना एक उत्तम कलाकृती पाहात असल्याचा नक्कीच आनंद प्रेक्षकाला मिळतो. चित्रपटाची लांबी कदाचित काही अंशी जास्त वाटू शकते. कदाचित त्यांचं नाटक आणि चित्रपटाबाहेरचं जगही अजून दाखवता येऊ शकलं असतं असंही मध्ये कुठेतरी वाटून जातं. पण तरीही यामधील प्रत्येक कलाकाराने अगदी जीव ओतून काम केलं आहे. मोहन जोशी, सुहास पळशीकर, प्रसाद ओक, सुमीत राघवन, आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी आणि नंदिता दास यांची ही काम अपेक्षेप्रमाणे छान झाली आहेत. कांचन घाणेकर यांच्या भूमिकेतील वैदेही परशुरामीसुध्दा या दिग्गज नावांच्या यादीत आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाली आहे. चित्रपटात जास्त गाणी नाहीत. पण जी गाणी आहेत, ती कथेचा भाग म्हणून समोर येतात. जी चित्रपटाच्या धाटणीला साजेशी आहेत. एकदंरच भट्टी चांगली जमली असल्यामुळे या चित्रपटाला यश मिळणे साहजिक आहे. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना आणि मराठी चित्रपटसृष्टीला दिवाळीच्या निमित्ताने मिळालेली एक चांगली भेट म्हणता येईल.  

 

 

Read More From मनोरंजन