मनोरंजन

‘कौन बनेगा करोडपती’चे 14 वे पर्व लवकरच सुरू

Dipali Naphade  |  Aug 4, 2022
kaun-banega-crorepati-season-14-to-starts-from-7-th-august-in-marathi

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चाललेल्या ज्ञान-आधारित गेम शो, कौन बनेगा करोडपतीचे नवीन पर्व लवकरच सुरू होत आहे. या शोचे 14वे पर्व केवळ हॉटसीटपर्यंत पोहोचणार्‍या स्पर्धकांसाठीच नाही, तर प्रेक्षकांसाठीही अधिक आकर्षक आणि समाधान देणारे असणार आहे असं सांगण्यात येत आहे. स्टुडिओ नेक्स्ट द्वारा निर्मित या शोचा शुभारंभ रविवारी 7 ऑगस्ट रोजी होणार असून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता हा शो प्रसारित करण्यात येईल. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून हा शो ‘आझादी के गर्व का महापर्व’ या धमाकेदार रूपात सुरू होणार आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या या विशेष भागात कारगिल युद्धातील वीर मेजर डी. पी. सिंह, सेना पदक विजेती कर्नल मिताली मधुमिता तसेच जगप्रसिद्ध भारतीय खेळाडू पद्मविभूषण एम सी मेरी कॉम (Merry Com) आणि पद्मश्री सुनील छेत्री (Sunil Chhetri) तसेच पद्मभूषण अभिनेता आमीर खान (Amir Khan) हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.

धन – अमृत पडाव ठरणार विशेष

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद द्विगुणित करत या शोमध्ये 15व्या प्रश्नावर एक पडाव दाखल करण्यात आला आहे. ‘धन अमृत’ (Dhan Amrut) नामक हा पडाव पार केल्यास स्पर्धकाला 75 लाख रु. बक्षीस रक्कम मिळण्याची हमी असेल! शिवाय, यापूर्वीच दाखल केलेल्या जॅकपॉट प्रश्नाची बक्षिसाची रक्कम देखील वाढवून आता 7.5 कोटी रु. करण्यात आली आहे. प्ले अलॉन्ग मार्फत या खेळात सहभागी होणार्‍या प्रेक्षकांना दर शुक्रवारी थेट हॉटसीटपर्यंत पोहोचण्याची संधी देखील या सत्रात मिळणार आहे. 

अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सज्ज 

या खेळासाठी अमितभ बच्चन यांच्याशिवाय दुसरे नाव शोधणेही कठीण आहे. या नव्या पर्वासाठी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन सज्ज झाले असून त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले आहे, ‘देशासाठी हे वर्ष विशेष लक्षणीय आहे, कारण आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. भारतीय सैन्य, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील देशातील दिग्गजांच्या सोबतीने या पर्वाची सुरुवात करताना मी गौरव अनुभवतो आहे. देशाच्या वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि नव्या युगाच्या भारताचे खरेखुरे प्रतिबिंब दाखवणार्‍या स्पर्धकांचे स्वागत करण्यास मी उत्सुक आहे.’ असे अमिताभ यांनी सांगितले. दरम्यान एन. पी. सिंह, MD आणि CEO, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया यांनी सांगितले की, ‘आमच्या सर्वात आयकॉनिक आणि प्रीमियम ब्रॅंड असलेल्या कौन बनेगा करोडपतीवर आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात करत आहोत. गेल्या 75 वर्षातील सिद्धी साजरी करण्याची, देशातील दिग्गजांचा सन्मान करण्याची ही आमची पद्धत आहे. भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीविषयीचे प्रेक्षकांचे ज्ञान वाढविण्याचा आमचा हा विनम्र प्रयास आहे.’ आणि दानिश खान, प्रमुख – चॅनल SET, डिजिटल बिझनेसिस अँड स्टुडिओनेक्स्ट यांनी सांगितले की, ‘यावर्षीच्या KBC मध्ये 4 प्रमुख घटक आहेत- भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा आनंदसोहळा, रोमांचक गेम, तत्काळ मोबदला आणि अधिक मोठी बक्षिसे. आम्हाला खात्री वाटते की, यामुळे KBC चा अनुभव स्पर्धकांसाठी, प्रेक्षकांसाठी आणि प्ले अलॉन्ग खेळणार्‍यांसाठी अधिक आकर्षक आणि सुंदर असेल.’

प्रेक्षकांनाही या नव्या पर्वाची नक्कीच उत्सुकता लागून राहिली आहे. लवकरच हा शो भेटीला येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन