बॉलीवूड

Maha Shivratri 2021: भगवान शिव शंकरावर आधारित बॉलीवूड गाणी

Trupti Paradkar  |  Mar 10, 2021
Maha Shivratri 2021: भगवान शिव शंकरावर आधारित बॉलीवूड गाणी

महाराष्ट्रात माघ महिन्याच्या कृष्ण चर्तुदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या वर्षी 11 मार्चला महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. असं म्हणतात की, याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली  होती. शिवाय याच दिवशी भगवान शिव शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता अशीदेखील मान्यता आहे. त्यामुळे वर्षभरातील एकूण बारा महाशिवरात्रीपैकी ही महाशिवरात्र खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान शंकराची भक्तीभावनेने उपासना केली जाते. शंकराला प्रसन्न करण्यासाठी कडक उपवासही केला जातो. महाशिवरात्रीचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाशिवरात्रीचा सण भजन, किर्तन आणि गाण्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यासाठीच या महाशिवरात्रीनिमित्त ऐका ही बॉलीवूडची प्रसिद्ध गाणी. त्याचप्रमाणे सर्वांना द्या महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खास शुभेच्छा आणि जाणून घ्या महाशिवरात्रीची माहिती त्याचप्रमाणे जाणून घ्या 

भगवान शंकरावर आधारित बॉलीवूड गाणी

बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये भगवान शंकरावर आधारित गाणी आहेत. ही बॉलीवूड गाणी तुम्ही महाशिवरात्रीनिमित्त नक्कीच ऐकू शकता.

बोलो हर हर ( चित्रपट – शिवाय)

अजय देवगण भगवान शंकराचा भक्त आहे. त्याने त्याच्या ‘शिवाय’ या चित्रपटात शंकरावर आधारित शीर्षक गीत होतं. हे गाणं एवढं लोकप्रिय झालं की अनेकांची रिंग टोन या गाण्याची असते. या गाण्यात शंकराच्या गुणांचे वर्णन केलेलं आहे. तुम्ही लूपमध्ये ठेवून अखंड हे शीर्षक गीत ऐकू शकता. या गाण्यामुळे तुमच्यामध्ये भगवान शंकराप्रमाणे वीरश्री संचारू शकते. 

संगीतकार – मिथुन

गायक – बादशाह

शंकरा रे शंकरा ( चित्रपट- तानाजी दी अनसंग वॉरिअर)

अजय देवगणच्या ‘तानाजी दी अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातील शंकरा रे शंकरा हे एक गाजलेलं गाणं. या गाण्यातून लढाई करण्यापुर्वी वीर मराठा योद्धा तानाजी  भगवान शंकराचा आर्शीवाद घेतात आणि तेव्हा शंकरासमोर यश देण्यासाठी तांडव नृत्य सादर करतात असे दृश्य दाखवण्यात आले होते. मात्र हे गाणं नंतर अनेक कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सादर केले जाते. महाशिवरात्रीसाठी हे अतिशय उत्तम बॉलीवूड गाणे आहे. 

संगीतकार आणि गायक – मेहुल व्यास

कौन है वो ( चित्रपट – बाहुबली )

बाहुबली हा चित्रपट बॉलीवूडचा एक बिगबजेट भव्य दिव्य चित्रपट होता. या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित करण्यात आले होते. त्यातील पहिल्या भागात अभिनेता प्रभासची एंन्ट्री या गाण्यातून दाखवण्यात आली होती. आईला होणारा त्रास वाचवण्यासाठी नायक या चित्रपटात भलं मोठं शिवलिंग त्याच्या खांद्यावर उचलून आणतो असं दाखवण्यात आलं होतं त्यावेळी हे तांडव प्रकारातील गाणं बॅक ग्राऊंडला वाजत असतं. या गाण्यातून आणि चित्रपटातील भव्य दिव्यतेतून शिव शंकराच्या प्रंचड शक्तीचा अनुभव येतो. 

संगीतकार – एम एम क्रीम
गायक – कैलाश खेर आणि मौनिमा

सत्यम शिवम सुंदरम ( चित्रपट – सत्यम शिवम सुंदरम)

फार पूर्वीपासून चित्रपटांमधील गाण्यांमधून भगवान शंकराची आराधना केली जात आहे. 1978 साली प्रदर्शित झालेल्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाचे शीर्षक गीतही शंकरावर आधारितच होते. या चित्रपटात अभिनेत्री झीनत अमान हे गाणं दाखवत शंकराची पूजा करताना दाखवल्या होत्या. त्यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेता शंसी कपूर मुख्यय भूमिकेत होते. 

संगीतकार – लक्ष्मीकांत प्यारेलाल

गायिका –   लता मंगेशकर

यासोबतच लता मंगेशकर यांची प्रसिद्ध गाणी जरूर ऐका

जय जय शिव शंकर कांटा लगे ना कंकर ( चित्रपट – आप की कसम)

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रिय असलेल्या भांगेचा प्रसादही अनेकजण घेतात. असं म्हणतात की भांग घेतल्यावर काही काळ मेंदूवर परिणाम होतो त्यामुळे माणूस एकच गोष्ट भांगेचा प्रभाव उतरेपर्यंत करत राहतो. आप की कसम या चित्रपटातील जय जय शिव शंकर या गाण्यात अभिनेता राजेश खन्ना आणि अभिनेत्री मुमताज यांच्यावर असंच एक गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. हे गाणं महाशिवरात्रीला आजही नक्कीच ऐकलं जातं. 

संगीतकार – आर डी बर्मन

गायक आणि गायिका –  लता मंगेशकर आणि  किशोर कुमार

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि युट्यूब

Read More From बॉलीवूड