Family

#MyStory: माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम अशाप्रकारे मिळेल असं वाटलं नव्हतं

Aaditi Datar  |  Jun 6, 2019
#MyStory: माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम अशाप्रकारे मिळेल असं वाटलं नव्हतं

जेव्हा एखादी खरंच प्रेमाच्या शोधात असते तेव्हा तिला प्रेमात यश मिळतंच असं नाही पण अनेकदा काहींना नकळत प्रेम मिळतं आणि तेही जन्मभरासाठी. यावेळी आम्ही #MyStory मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अशी लव्हस्टोरी जिने प्रेमाचा कधी विचारही केला नसताना तिला नकळत मिळालं एक सुंदर प्रेमाचं नातं. वाचा सुमेधाच्या पहिल्या प्रेमाची ही कहाणी….

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न होणं ही एखाद्या स्वप्नासारखं असतं. तिच्या घरच्यांसाठी आणि तिच्यासाठी ही एक आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट असते. कारण त्या दिवशी तिच्या स्वप्नातील राजकुमार तिला खऱ्याखुऱ्या आयुष्यातही आपलंस करणार असतो आणि आपल्यासोबत घेऊन जाणार असतो. पण माझ्यासोबत असं काही झालं नाही. मी रंगाने गव्हाळ असल्याने लहानपणापासून मला अनेकदा बोलणी खावी लागत. माझीच आईच मला अपशकुनी म्हणून अनेकदा दोष लावत असे. ती नेहमी माझ्या बहिणीचं कौतुक करत असे कारण ती दिसायला सुंदर होती. तिच्यासाठी रोज स्थळ येत असत. माझं वय त्यावेळी 24 होतं तर माझ्या ताईचं 26 होतं.  

एक दिवस भोसले काकांनी ताईसाठी एका मोठ्या घरातलं स्थळ आणलं. मुलगा सरकारी ऑफिसर होता आणि त्यांची काहीच मागणीही नव्हती. फक्त त्यांना एक सुंदर आणि मनमिळावू मुलगी हवी होती. तीन दिवसांनंतर ती लोकं आमच्याकडे ताईला बघायला आले. मी पण या बघण्याच्या कार्यक्रमासाठी तयार होत होते. पण मला बाबांनी थांबवलं आणि सांगितंल की, तू समोर येऊ नकोस. मला माहीत होतं की, या शुभ कार्यामध्ये माझ्यासारख्या अपशकुनीला कोणालाच सामील करायचं नव्हतं. त्यामुळे मी तिथून निघून गेले. ताईला तो मुलगा खूपच आवडला आणि त्यांनाही आमची ताई आवडली. एक महिन्यातच हे लग्न होणार होतं कारण त्या मुलाचं पोस्टींग भोपाळला होणार होतं. त्यामुळे त्यांना लग्नाची घाई होती.   

घरात लग्नाची लगबग सुरू झाली. आई आणि बाबा दोघेही लग्नाच्या तयारीमध्ये गुंतून गेले. बाबांनी 5 लाखांचं कर्ज काढलं कारण त्यांना आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नात कोणतीच कसर बाकी ठेवायची नव्हती. मी पण खूष होते. एक दिवस आम्ही सगळेजण अंगणात बसलो होतो आणि अचानक माझ्या ताईला उलट्या होऊ लागल्या. तिची तब्येत अचानक बिघडली. आम्ही सगळेच घाबरलो. कारण लग्नाला फक्त 20 दिवस उरले होते. ताईला घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तिकडे डॉक्टरांनी सांगितलं की, ताईकडे जास्त वेळ नाही. तिच्या आयुष्यात काहीच दिवस उरलेत. हे ऐकून तर आम्हाला धक्काच बसला. आईबाबा पूर्णपणे खचले आणि त्यादिवशी मी पुन्हा एकदा स्वतःच्या नशीबाला दोष लावू लागले.

#MyStory: आजही साखरपुड्याचा तो क्षण आठवला की…

3-4 दिवसांनी हॉस्पिटलमधून ताईला डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी आली. ती घरी येताच तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला फोनवर सगळं खरंखरं सांगून टाकलं. मुलाकडचे दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या घरी आले. मी त्या दिवशी घरी नव्हते. मी ताईची औषधं आणण्यासाठी शहरात गेले होते. संध्याकाळी जेव्हा मी घरी आले तेव्हा मला बघताच आईने मला घट्ट मिठी मारली. सगळ्यांना मला बघून आनंद झाला. मला काहीच कळत नव्हतं. तेव्हा माझ्या ताईने मला सांगितलं की, लग्न 21 एप्रिललाच होईल पण तिचं नाही माझं. तिची शेवटची इच्छा होती मला वधूच्या वेषात पाहण्याची. आश्चर्य म्हणजे मुलाकडच्यांनीही याला गोष्टीसाठी होकार दिला होता. माझा तर विश्वासच बसत नव्हता की, माझं लग्न ठरलं आहे.

बघता बघता लग्नाचा दिवस आला आणि माझं लग्नही झालं. माझ्या पाठवणीच्या वेळेस आईबाबांना पाहून मला असं वाटलं की, चला या गोष्टीसाठी तरी मी त्यांच्या कामी आले. ताई मला जाताना पाहात होती. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. देवानेही काय खेळी खेळली होती आमच्यासोबत. पसंती एकीला आणि लग्न दुसरीशी. अशोक… हो त्यांचं नाव होतं अशोक. मी तर त्यांना तोपर्यंत नीट पाहिलंही नव्हतं आणि कदाचित त्यांनीही मला पाहिलं नव्हतं. असो. काही वेळातच आम्ही तिथून रवाना झालो.  

#MyStory: तो माझ्या आयुष्यातून निघून गेला पण….

जेव्हा मी सासरी पोचले तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता की, सगळेजण माझ्या स्वागतासाठी उभे आहेत. सर्व विधी पार पडल्यावर घरातील एकेक पाहुणेमंडळी जाऊ लागली आणि घर रिकामं झालं. त्या घरात फक्त दोनच जण राहत होती. अशोक आणि त्यांची आई. जेव्हा मी आमच्या खोलीत गेले तेव्हा मी पाहिलं की, अशोक बेडवर झोपले होते. मला खूपच भीती वाटत होती. मी जशी खोलीत आले तशी त्यांना जाग आली आणि ते उठून उभे राहिले. तेव्हाच कदाचित पहिल्यांदा आम्ही एकमेंकाना इतक्या जवळून पाहिलं.  

अशोक दिसायला एकदम अकुंश चौधरींसारखे होते पण माझ्या सावळ्या रंगामुळे मला त्यांच्या नजरेला नजर द्यावीशा वाटत नव्हती. त्याचवेळी ते अचानक माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले की, घाबरू नकोस मी काही तुला खाणार नाहीयं. मान्य आहे की, आपलं लग्न खूपच घाईघाईत झालं. पण हळूहळू प्रेमही होईल. आधी आपण एकमेंकाचे चांगले मित्र बनूया, मग प्रेमी आणि मग जोडीदार. तुम्हाला हे वाचून विश्वास बसत नसेल ना पण हे खरं आहे. प्रेम हा शब्द पहिल्यांदाच मी कोणाकडून तरी माझ्यासाठी ऐकला होता.  

#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली….

अनेक दिवस, आठवडे आणि महिने अशोकसोबत कसे गेले कळलंच नाही. आमच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ लागलो. तेव्हा मला कळलं की, लग्नाआधी प्रेम होणं गरजेचं नाही. लग्नानंतरही प्रेम होऊ शकतं आणि आपलं आयुष्य बदलू शकतं.

तुमच्याकडेही अशी एखादी #MyStory असल्यास आम्हाला नक्की पाठवा. 

हेही वाचा –

नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात

वैवाहिक जीवनात सुखी राहायचं असेल तर, करू नका या ‘7’ चुका

#Breakup नंतरच कळते नात्याची खरी किंमत, पण वागू नका असे

Read More From Family