मनोरंजन

‘लकी’ चित्रपटाच्या ‘कोपचा’ गाण्यातून जीतेंद्र-श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट

Aaditi Datar  |  Jan 11, 2019
‘लकी’ चित्रपटाच्या ‘कोपचा’ गाण्यातून जीतेंद्र-श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट

आगामी ‘लकी’ चित्रपटाचं ‘कोपचा’ हे पहिलं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून या गाण्याची खासियत म्हणजे याला दिलेला 80s चा तडका आहे. 

‘लकी’ आणि ‘हिम्मतवाला’ चित्रपटाचं कनेक्शन

हा फोटो बघून तुम्हाला कल्पना आली असेलच की आम्ही काय म्हणतोय ते, लकीमधल्या ‘कोपचा’ या गाण्यात 1983 साली जीतेंद्र-श्रीदेवी स्टारर ‘हिम्मतवाला’ या  सिनेमाला ट्रिब्यूट देण्यात आलं आहे.

हे गाण अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. लकीमधल्या या रंगीबेरंगी गाण्याला खास 80s चा तडका देण्यात आला आहे. या गाण्यात दोघांनीही अगदी हूबेहूब जीतेंद्र आणि श्रीदेवी यांच्या ‘नैनों में सपना’ या गाण्यासारखे कॉस्च्युम्स घातले असून कोरिओग्राफीसुद्धा त्या गाण्याशी मिळतीजुळती करण्यात आली आहे.

या आधीसुद्धा याच गाण्यासारखी कोरिओग्राफी विद्या बालनच्या 2011 साली आलेल्या ‘डर्टी पिक्चर’ आणि 2013 साली अजय देवगण आणि तमन्ना भाटीयाच्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटात दाखवण्यात आली होती. पण मराठीतील ही पहिलीच वेळ आहे.  

गायक बप्पी लाहिरींचं मराठीतलं पहिलं गाणं

संगीतकार अमितराजने संगीत दिलेल्या हे गाणं डिस्को किंग बप्पी लाहिरी आणि पॉप क्वीन वैशाली सामंतने गायले आहे. आपल्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी गायलेलं हे पहिलं मराठी गाणं आहे. 80 चं दशक बप्पीदांनी गाजवलं होतं. या दशकातली संपूर्ण पिढीने बप्पीदादांच्या गाण्यांना डोक्यावर घेतलं होतं. हे गाणंसुद्धा बप्पी लाहिरींच्या इतर गाण्यासारखं श्रवणीय आहे.

बप्पी दा आणि ‘कोपचा’

या गाण्यावर बप्पी लाहिरींनी प्रतिक्रिया दिली की, “सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं, पण मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. 1975 साली आलेल्या राजा ठाकूर यांच्या ‘जख्मी’ सिनेमामूळे माझं करीयर ख-या अर्थाने सुरू झालं आणि मी ‘लकी’ ठरलो. मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सतत बिझी असल्याने मी काम करता आलं नाही.

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ‘लकी’ सिनेमाच्या निमित्ताने मी आता मराठीत गायक म्हणून पदार्पण करतोय.“

बप्पीदांची फॅन ‘ऐका दाजिबा’ गर्ल वैशाली सामंत

गायिका वैशाली सामंत हीनेही या निमित्ताने बप्पी दाबरोबर पहिल्यांदाच काम करण्याचा अनुभव शेअर केला. “लहानपणी मी बप्पीदांची गाणी खूप ऐकायचे. तेव्हा कोणी मला सांगितलं असतं की, मोठी झाल्यावर एक दिवस मी त्यांच्यासोबत एक ड्युएट गाणार आहे. तर कधी विश्वासच बसला नसता. हे खरंच स्वप्नवत आहे. एवढ्या मोठ्या संगीतकार-गायकासोबत गाणं गायला मिळणं, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी स्वत:ला खूप ‘लकी’ समजते की मला संजयदादाच्या सिनेमात मला बप्पीदांसोबत हे एक एनर्जेटिक गाणं गाता आलं.“

अभय महाजन आणि दिप्ती सती स्टारर, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट हा 7 फेब्रुवारी 2019ला  महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

 

Read More From मनोरंजन