“मासा’ हा लघुपट, दोन वेगळ्या वयातल्या स्त्रियांच्या नात्याची कथा आहे, त्याचवेळी ही त्या दोघींच्या वैयक्तिक आयुष्याचाही प्रवास मांडण्याचा प्रयत्न आहे, असं मत, या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि सुप्रसिद्ध नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर (Phulwa Khamkar) यांनी व्यक्त केलं. मुंबईत सुरु असलेल्या 17 व्या मिफ्फच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ‘मिफ्फ संवाद’ मध्ये प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. या चित्रपटात ‘केतकी’ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) देखील यावेळी उपस्थित होत्या.
स्त्री म्हणून त्यातल्या अव्यक्त जाणीवा व्यक्त करणारा चित्रपट
‘मासा’ या लघुपटाची कथा अभिनेते आणि लेखक संदेश कुलकर्णी (Sandesh Kulkarni) यांनी लिहिली आहे. हा सिनेमा सासू आणि सुनेमधलं नातं,आणि स्त्री म्हणून त्यातल्या अव्यक्त जाणीवा व्यक्त करणारा आहे. सिनेमाची मुख्य व्यक्तिरेखा, रखमा यांचा तरुण मुलगा अपघातात गेल्यानंतर त्या, त्यांची सून केतकीसोबत, लहानग्या नातवाला सांभाळत, घरोघरी डबे देऊन चरितार्थ चालवत असतात. मुलगा आणि नवरा गेल्यामुळे, दोघींच्याही आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीतून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला असतो. त्यात केतकीच्या आयुष्यात एक पुरुष येतो. गावातल्या, 75 वर्षांच्या, विधवा सून आणि नातू असलेल्या रखमाबाई या घटनेचा सामना कसा करतात, याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हा सिनेमा बघायला हवा. चित्रपटात रखमाची व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी साकारली आहे. तर, संदेश कुलकर्णी यांचीही यात महत्वाची भूमिका आहे.
सासू सुनेची कथा
‘मासा’ हा लघुपट सासू सुनेची कथा सांगतो, त्याचवेळी आपल्या समाजात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, वारिष्ठांकडून कानिष्ठाचा छळ करण्याची जी मानसिक सहजवृत्ती आहे, त्यावरही हा सिनेमा भाष्य करतो, असे मत, अमृता सुभाष यांनी व्यक्त केले. “सासूला तिच्या तरुणपणी, सून म्हणून जो त्रास भोगावा लागतो, तोच त्रास ती सासूच्या भूमिकेत गेल्यावर आपल्या सुनेला देते. ही प्रत्येक नातेसंबंधांत आपल्याला दिसते. ही मानसिक प्रवृत्ती एखाद्या दुष्टचक्रासारखी सर्व नात्यांत तणाव निर्माण करते. याही नात्यात तो तणाव कायम आहे, की निवळतो, ही आपल्याला सिनेमातून कळेल.” असं अमृता सुभाष यांनी सांगितले.
रायगड जिल्हयातल्या नागाव इथे चित्रीकरण झालेल्या या लघुपटात कोंकणी पार्श्वभूमी दाखवली आहे. नृत्यदिग्दर्शिका म्हणून इतक्या वर्षांचा अनुभव असतांना, सिनेमाचे, लघुपटाचे दिग्दर्शन करणे हा संपूर्ण वेगळा अनुभव होता. मात्र, नृत्याची, विशेषतः तालाची समज असण्याचा फायदा मला या दिग्दर्शनात झाला, अशी माहिती फुलवा खामकर यांनी दिली. उत्तम अभिनेते तर सोबत होतेच त्याशिवाय, छायाचित्रकार म्हणून अमोल गोळे, संकलक क्षिती खंडागळे, संगीतकार नीलेश मोहरीर अशी तगडी टिम माझ्यासोबत होती, त्याचा मला खूप आधार मिळाला, असंही त्या पुढे म्हणाल्या.
मिफ्फ हा लघुपटांना प्रोत्साहन आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा एक उत्तम उपक्रम आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईत फिल्म्स डिव्हिजन च्या परिसरात सुरु असलेल्या सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटात, वेगवेगळ्या विषयांवरील लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशन पट रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा महोत्सव चार जूनपर्यंत प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात सुरु असणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade