मनोरंजन

 ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अंतिम टप्प्यात

Aaditi Datar  |  Dec 26, 2018
 ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अंतिम टप्प्यात

महाराष्ट्राला पोटधरुन हसवणा-या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले. दिवसभराचा ताणतणाव विसरुन भन्नाट मनोरंजनाचा हा एक तास म्हणजे मनोरंजनाची गॅरंटी. कारण या शोची टॅगलाइनच ‘तासभर बसा आणि पोटभर हसा’ अशी होती. मात्र काही महिन्यांआधीच सुरु झालेली ही हास्यजत्रा आता अंतिम टप्प्यात आहे. 

महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा प्रवास

कॉमेडी रिऍलिटी शो असणा-या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मध्ये स्पर्धकांच्या चार टीम होत्या. तसंच विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे आणि समीर चौघुले हे चार विनोदवीर त्या चार टीमचे प्रमुख नेमण्यात आले होते. ‘कॉमेडीचा जहागिरदार’ हा किताब मिळवण्यासाठी या चारही टीमने एकापेक्षा एक मजेशीर आणि अफलातून स्कीट्स सादर केले. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे या शोचे जजेस् असून त्यांनी दरवेळी प्रत्येक स्कीटला आणि कलाकारांच्या परफेक्ट कॉमिक पंचला दिलखुलासपणे दाद दिली. जजेस, स्पर्धक आणि प्रेक्षकांना अतिशय गोड पध्दतीने बांधून ठेवणारी या कार्यक्रमाची होस्ट म्हणजे प्राजक्ता माळी.

दुसरं पर्व लवकरच

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’च्या टीमला आणि मनोरंजनाच्या एका तासाला निरोप देण्याची वेळ आली असली तरी या हास्यजत्रेचं दुसरं पर्वही लवकरच येणार आहे. या पर्वातील विजेत्या जोडीला दुस-या पर्वात डायरेक्ट संधी मिळणार असून त्यातील बाकी कलाकार मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

किताब मिळणार कोणाला?

या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा कॉमेडी अॅक्टमध्ये तरबेज आहे, त्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये ‘कॉमेडीचा जहागिरदार’ हा किताब कोण मिळवणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे. या हास्यजत्रेचा फिनाले २७ डिसेंबरला सोनी मराठीवर रंगणार आहे.

 

 

Read More From मनोरंजन