मनोरंजन

छत्रपती शिवरायांच्या शूर सेनानींवरील चित्रपट घेऊन येणार महेश मांजरेकर

Vaidehi Raje  |  May 2, 2022
veer daudle saat

दिग्दर्शक महेश मांजरेकरांचे नाव महाराष्ट्रातील दिग्गजांपैकी एक म्हणून गणले जाते. नटसम्राट, दे धक्का, आई, वास्तव असे विविध विषयांवरील त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे महेश मांजरेकरांच्या चित्रपटांविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते. आता मांजरेकर कोणता नवा चित्रपट घेऊन येणार आणि कोणता विषय हाताळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कारण महाराष्ट्र दिनी ते एक महत्वाची घोषणा करणार होते. ही कुठली साधीसुधी घोषणा नसून एक महाघोषणा असणार आहे असे ते मागे म्हणाले होते. त्यामुळे ते काय नवी माहिती देतात याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली होती. प्रॉमिस केल्याप्रमाणे काल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महेश मांजरेकरांनी ही महाघोषणा केली आहे. 

सोशल मीडियावर दिले होते संकेत

महेश मांजरेकरांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होतो. त्या पोस्ट मध्ये महाराष्ट्राचा नकाशा असलेले पोस्टर होते आणि त्याबरोबर एक महाघोषणा करणार असल्याचे त्यांनी संकेत दिले होते. त्यामुळे एक मे , महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सकाळपासूनच चाहत्यांचे लक्ष या घोषणेकडे लागून राहिलेले होते. अखेर मांजरेकरांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि त्याबरोबर एक खास कॅप्शन देखील त्यांनी टाकले आहे. “इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा…  मोठ्या पडद्यावर साकारणार… न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम… मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती..  वीर दौडले सात… दिवाळी २०२३..” हे कॅप्शन त्यांनी लिहिले. मांजरेकरांनी हे पोस्टर हिंदीत देखील शेअर केले. हिंदी भाषेतील या पोस्टरला ‘वो सात’ असे नाव देण्यात आले आहे. यावरून आपण असाच अंदाज लावू शकतो ही हा भव्यदिव्य चित्रपट मराठीबरोबरच हिंदीत देखील प्रदर्शित करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य देशभरातील नव्या पिढीला कळावे व त्यांनी आपला सुवर्ण इतिहास जाणून घ्यावा या दृष्टीने मांजरेकरांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. 

पुढच्या दिवाळीत प्रदर्शित होणार ‘वीर दौडले सात’

2023 च्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीत निर्माण होणाऱ्या सर्वात मोठा बिग बजेट चित्रपट असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरु आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान आयुष्यावर अनेक उत्कृष्ट चित्रपट तयार होत आहे. यानिमित्ताने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच महाराजांच्या दैदिप्यमान आयुष्याची , शौर्याची माहिती होते आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून आपला सुवर्ण इतिहास नवी पिढी जाणून घेते आहे हे समाधानकारक आहे. आता या यादीत महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. यापूर्वी मांजरेकरांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात महाराजांची भूमिका केली होती. त्यांच्या या नव्या चित्रपटात महाराजांची भूमिका साकारण्याचे अहोभाग्य कोणत्या अभिनेत्याला मिळतेय हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

प्रतापराव गुर्जर व त्यांचे सहा शिलेदार यांचा इतिहास 

प्रतापराव गुर्जर यांनी उमराणीच्या लढाईत बेहेलोल खानाला अभय दिले होते. परंतु बेहेलोल खान पुन्हा पुन्हा स्वराज्यावर चढाई करून उपद्रव करू लागला. महाराजांचा राज्याभिषेक जवळ येत असतानाच बेहेलोल खानाने परत स्वराज्यावर चढाई केली. “सर्ववत स्वराज्यावर वारंवार चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्याविना आम्हास तोंड दाखवू नका” या आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठवला व प्रतापरावांचे रक्त सळसळू लागले. महाशिवरात्रीच्या दिवशी अवघ्या सहा शिलेदारांना हाताशी घेऊन प्रतापराव गुर्जरांनी  नेसरी खिंडीत बेहेलोल खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला. 24 फेब्रुवारी 1674 रोजी या महाराजांच्या या सात शिलेदारांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच इतिहासावर आधारित ‘वीर दौडले सात’ हा चित्रपट आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन