Uncategorized

परीला यश बाबा म्हणून नको, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत येणार ट्विस्ट

Vaidehi Raje  |  Feb 28, 2022
माझी तुझी रेशीमगाठ

झी मराठी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील सगळ्याच पात्रांना प्रेक्षकांचे प्रेम मिळते आहे. गोड गोंडस परी असो की यश- नेहाची केमिस्ट्री असो, बंडू काका-काकूंची गंमत असो की समीर-यशची जिवलग मैत्री असो, आजोबा-समीरचे अनोखे मैत्रीचे नाते असो की शेफालीचा क्युट धांदरटपणा हे सगळेच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे. खास करून परी व यशचे जे निर्मळ निरागस नाते आहे ते तर प्रेक्षकांना फारच आवडते आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मालिकेचे निर्माते व कथालेखक मालिकेच्या कथेत वेगवेगळे ट्विस्ट आणत असतात. नुकतीच मालिकेत जेसिका या नव्या पात्राची एंट्री व त्या निमित्ताने कथेला एक ट्विस्ट मिळाला होता. आता नेहा व यशचे नाते थोडे पुढे सरकत नाही तोवर कथेत आणखी एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. 

जेसिकाच्या येण्याने आला होता ट्विस्ट 

मागच्याच आठवड्यात आपण बघितले की जेसिका आल्यापासून नेहाला तिच्या मनात यशाविषयी असलेल्या भावनांची नव्याने जाणीव झाली. तरीही यशच्या प्रेमाखातर त्याच्या सुखासाठी तिने आपणहून बाजूला होऊन यश व जेसिका यांच्या लग्नासाठी प्रयत्न केले. पण समीरच्या प्लॅनप्रमाणे सगळे घडले आणि जेसिका यशला फसवतेय हे लक्षात येऊन नेहाने यश व जेसिकाची एंगेजमेंट थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घडलेल्या नाट्यात नेहाने यशाविषयी तिच्या मनात प्रेमाची भावना असल्याचे यशसमोर मान्य केले. आता प्रश्न असणार आहे परीचा! 

परी यशला बाबा म्हणून स्वीकारणार का 

आता नेहाने यशावर असणारे तिचे प्रेम व्यक्त केल्यावर त्यांच्या प्रेमातील बरेचसे अडथळे दूर झाले असे प्रेक्षकांना वाटत असणार. कारण परीला तर यश आवडतोच. तिने त्याला कधीच तिच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारले आहे. तसेच काका काकूंनाही यश आवडला आहे. त्यामुळे आता नेहा व यशचे नाते पुढे जाणार अशी प्रेक्षकांची अपेक्षा असताना एक नवा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. यश व नेहाच्या प्रेमकहाणीत परी एक नवा अडथळा निर्माण करणार का असा प्रश्न मालिकेचा नवा प्रोमो बघून प्रेक्षकांच्या मनात उभा राहिला आहे. प्रोमोमध्ये असे दाखवले आहे की परीने यशला बाबा म्हणून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मालिकेच्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

प्रोमोमध्ये परीने दिली अनपेक्षित प्रतिक्रिया 

नेहाला आईवडिलांच्याच ठिकाणी असणारे शेजारचे बंडूकाका व काकू परीची आजी आजोबांप्रमाणेच काळजी घेतात. परीला ते दिवसभर सांभाळतात. प्रोमोमध्ये बंडूकाका व काकू हे गप्पा मारत असताना बंडूकाका परीला सांगतात की आता यशच परीचा बाबा होणार आहे. त्यावेळी परी त्यांचा विचारते की, “कोण माझे बाबा?” तेव्हा परीच्या प्रश्नाचे उत्तर देताना बंडू काका यशाकडे इशारा करून म्हणतात की ,”आता परीने मस्ती केली की मी तिच्या बाबांना येऊन सांगणार.” पण बंडू काका अचानक यशला बाबा का म्हणत आहेत असा प्रश्न परीच्या मनात येतो आणि ती म्हणते की ,”यश हा माझा बाबा नाही. यश माझा फ्रेंड आहे. बाबा लवकर निघून जातात, मला बाबा नको आहे.” असे म्हणून परी रागारागात तिथून निघून जाते. 

यश व नेहाची प्रेमकहाणीचा शेवट दुःखी न होता त्यांची जोडी लग्नाच्या बंधनात बांधली जावी तसेच परीला प्रेम करणाऱ्या आईबरोबरच यशच्या रूपात तितकेच प्रेम करणारे बाबाही मिळावेत अशीच प्रेक्षकांची इच्छा आहे. आता परीने यशला बाबा म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्यावर यश व नेहा काय करतील? त्यांचे नाते पुढे जाणार की नाही? ते परीचे मन वळवण्यात यशस्वी होतील का, की ते परीसाठी त्यांच्या प्रेमाचा बळी देतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना येणाऱ्या काही भागांमध्ये मिळतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Uncategorized