मनोरंजन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल, बघा गर्जतो मराठी हा विशेष कार्यक्रम

Vaidehi Raje  |  Feb 24, 2022
marathi bhasha gaurav din

देववाणी संस्कृत तसेच अभिजात भाषा तामिळ इतकीच मराठी भाषा ही देखील प्राचीन आहे. आपल्या मराठी मातीला फार प्राचीन इतिहास आहे. अनेक वीरांच्या बलिदानाने ही मराठी माती पवित्र झाली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र प्राचीन आहे त्याचप्रमाणे मराठी भाषाही प्राचीन आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाला आपल्या भाषेचा अभिमान आहे. नव्हे, तो असलाच पाहिजे. प्राचीन काळी महाराष्ट्री प्राकृत असे मराठी भाषेचे स्वरूप होते. नर्मदा व गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये ही भाषा बोलली जात असे. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकातील एक शिलालेख नाणेघाटातील एका गुहेत सापडला होता. त्या शिलालेखावरील माहिती ही ब्राम्हीलिपीत लिहिलेली महाराष्ट्री भाषा होती. आपली आजची मराठी भाषा ही महाराष्ट्रीतूनच निर्माण झाली आहे. म्हणजेच आपल्या भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. म्हणूनच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण हा महत्वाचा दिवस साजरा करतो आणि आपले आपल्या मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करतो.

अधिक वाचा – मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा 

दर्जेदार मराठी साहित्य देणारे महान साहित्यिक 

गेली हजारो वर्षे मराठी भाषेत उत्तमोत्तम साहित्य निर्माण होते आहे. संत ज्ञानेश्वर माउलींना मराठी वाङ्मयाचे जनक म्हटले जाते. त्यांच्या अजरामर साहित्यापासून ते आजच्या आधुनिक साहित्याने मराठी भाषा समृद्ध झाली आहे. पुलं, वपु, अत्रे, फडके, रणजित देसाई, ग. दि. माडगूळकर, वि.स. खांडेकर , साने गुरुजी, गडकरी, बहिणाबाई अशी अनेक असंख्य रत्ने मराठी मातीत जन्माला आली आणि त्यांनी त्यांच्या वाङ्मयाची भर घालून मराठी भाषेची आजन्म सेवा केली. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हीच भावना असते की “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.” 

कुसुमाग्रज

याच मराठी मातीत जन्माला आलेले व मराठीची आजन्म सेवा करणारे वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी दर वर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. अशा या वैभवशाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे व यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. मराठीचा प्रसार, प्रचार वृद्धींगत करण्यासाठी प्रत्येक मराठी माणूस  प्रयत्न करतो आहे. दर वर्षी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

अधिक वाचा – मराठी भाषा दिन – दैनंदिन वापरातील हरवलेले काही मराठी शब्द

27 फेब्रुवारी रोजी सादर होणार झी मराठीचा विशेष कार्यक्रम 

या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायालाच हवा यासाठी झी मराठी वाहिनीवरगर्जतो मराठी’ हा विशेष कार्यक्रम  27 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. हा 2 तासांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम असेल ज्यात नृत्य, सदाबहार मराठी कविता आणि गाणी यांचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना बघायला मिळेल.

तसेच या कार्यक्रमातून समृद्ध मराठी साहित्याचं दर्शन प्रेक्षकांना घडेल. हा कार्यक्रम ‘अभिजात मराठी जनाभियान’ला पाठिंबा दर्शवण्यासाठी झी मराठी वाहिनी कडून सादर केला जाणार आहे. तसेच या अभियानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी अभिजात मराठी गौरव गीताची रचना केली आहे जे प्रेक्षकांना या विशेष कार्यक्रमात पाहायला मिळेल. 

या विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री गिरीजा ओक आणि हृषीकेश जोशी करणार असून स्पृहा जोशी, संदीप पाठक, किशोर कदम, विभावरी देशपांडे आणि चंद्रकांत काळे हे कवितावाचन करणार आहेत. तसेच मंगेश बोरगावकर, हृषीकेश रानडे, केतकी भावे आणि धनश्री देशपांडे यांच्याकडून सदाबहार गीते प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. 

मराठी साहित्य, कला व संगीताचा आविष्कार अनुभवण्यासाठी हा कार्यक्रम बघायलाच हवा.

अधिक वाचा – जागतिक मराठी भाषा दिन

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन