मनोरंजन

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Dipali Naphade  |  Jul 6, 2022
marathi-movie-vitthala-tuch-will-be-release-soon-in-marathi

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणाऱ्या या विठ्ठलाचे करावे तितके कौतुकच. विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेचा खडतर प्रवास ‘विठ्ठला तूच’ या नव्या कोऱ्या प्रेममय कथेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. विठ्ठला तूच असे आपण जेव्हा आपल्या भगवान विठ्ठलाला म्हणतो तसे या चित्रपटातील नायकाला ही कथेने विठ्ठला तूच असे म्हणायला भाग पाडले आहे. तूच माझा प्राण सखा..तूच माझा पाठीराखा..! अशी टॅगलाईन असलेल्या   चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून चित्रपटाचे पोस्टर पाहता पोस्टरवरील व्यक्ती नेमकी कोण आहे हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असेल, तर पोस्टरवरील व्यक्ती ही नवोदित अभिनेता योगेश जम्मा असून त्याचा ‘विठ्ठला तूच’ हा पहिलाच चित्रपट आहे. 

विठ्ठलाचा प्रवास चित्रपटातून दर्शविणार

विठ्ठला तूच – मराठी चित्रपट

‘वाय.जे. प्रॉडक्शन’ निर्मित आणि दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित ‘विठ्ठला तूच’ (Vitthala Tuch) या चित्रपटाची कथा रोमँटिक असून चित्रपटात विठ्ठला म्हणजेच योगेशचा एकंदरीत प्रवास, आणि त्या दरम्यान जुळून आलेलं त्याच प्रेम आणि त्यानंतर जुळलेल्या प्रेमाचा प्रवास पाहायला मिळणार आहे. तसेच  नुकतेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे पोस्टर पाहता पोस्टरवर योगेशचा रावडी लूक पाहायला मिळत आहे. गावाकडील वातावरणात चित्रित झालेला हा चित्रपट गावरान प्रेमाचा माहोल नक्कीच करेल यांत शंकाच नाही, त्यात योगेशचा रावडी लूक आणि त्याने मांडलेली प्रेमाची परिभाषा पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. या चित्रपटात योगेशसह आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा हर्षित अभिराज यांनी पेलली असून दमदार गाणी प्रेक्षकांना पाहणे या चित्रपटात रंजक ठरेल. तर चित्रपटातील सुंदर क्षण झिंगाडे ब्रदर्स यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. रोमँटिक चित्रपटाची चलती थोडीशी कमी झालेली असताना पुन्हा एकदा ‘विठ्ठला तूच’ हा चित्रपट प्रेममय भावना मोठ्या पडद्यावर व्यक्त करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास लवकरच सज्ज होत आहे. तसेच चित्रपटात आणखी कोणते कलाकार प्रेमाचे रंग दाखवणार हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.

आषाढी एकादशीचे निमित्त 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने या चित्रपटाची याच आठवड्यात घोषणा करण्यात आल्याचा अंदाज लावला जात आहे. तर चित्रपटाच्या नावावरून आधी विठ्ठलाबाबत हा चित्रपट आहे का असा कयास लावला जाऊ शकतो. मात्र हा थोडा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. यातील गावरान प्रेमाचा माहोल हा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तर चित्रपटातील इतर कलाकार नक्की कोण आहेत, याचीही आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र या चित्रपटाची तारीख अजून घोषित करण्यात आलेली नाही. पोस्टरवरून नक्की याचा विषय काय असणार याचाही आता अंदाज लावला जात आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर येईल अशी अपेक्षा आता प्रेक्षक करत आहेत. तोपर्यंत नक्कीच वाट पाहावी लागणार आहे!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन