मनोरंजन

सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार,‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला

Dipali Naphade  |  Aug 3, 2022
me-punha-yein-webseries-next-episode-to-release-on-5th-august-in-marathi

प्लॅनेट मराठी निर्मित, अरविंद जगताप (Arvind Jagtap) दिग्दर्शित ‘ मी पुन्हा येईन’ (Me Punha Yein) वेबसीरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकले असून यात सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे एकमेकांवरील आरोप, आमदारांची पळवापळवी, रिसॅार्ट पॅालिटिक्स पाहायला मिळत आहे. पहिल्या तीन एपिसोड्स पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. त्यामुळे लवकरच आता पुढील भागही 5 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी दिवटे व विरोधी पक्षनेते मुरकुटे कशाप्रकारे अपक्ष आमदारांची पळवापळवी करतात, हे येत्या एपिसोड्समध्ये पाहायला मिळणार आहे. वसंतराव मुरकुटेंनी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताक्षणी आमदारांची पळवापळवी सुरू केली. रिसॅार्टवरूनही आमदारांना कसे फोडतात, अपक्ष आमदार विनायक दिवटेंच्या गटात कसे सामील होतात? कोण कोणाच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसणार, कोणता गट सत्तेसाठी ‘पलटी’ मारणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. 

सोशल मीडियावरून सकारात्मक प्रतिक्रिया

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर याबाबत म्हणाले की, “ या बेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरून सकारात्मक प्रतिक्रिया येत असून पुढील भागही लवकर प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. राजकारणामागील सत्य अतिशय व्यंगात्मक स्वरूपात यात दाखवण्यात आले आहे. ‘मी पुन्हा येईन’ हा वेबसीरिज प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे. पहिल्या तीन भागांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता पुढचे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.’’ प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली असून या वेबसीरिज मध्ये सयाजी शिंदे (Sayaji Shinde), उपेंद्र लिमये (Upendra Limaye), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), रुचिता जाधव (Ruchita Jadhav), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

राजकारणावर आधारित सिरीज

राजकारणावर आधारित या वेबसीरिजमध्ये सत्तालोलूपता, कपट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेलं ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ असा सगळा मसाला पाहायला मिळतआहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर आधारित अशी ही वेबसिरीज असल्याने प्रेक्षकांना यामध्ये रस निर्माण झाला आहे यात शंका नाही. महाराष्ट्राचे तापलेले सध्याचे राजकारण आणि या वेबसिरीजमध्ये बऱ्यापैकी साम्य असल्याचे प्रेक्षकांना वाटते आहे. मात्र हे केवळ मनोरंजनासाठी आणि साधारण राजकारणात काय काय चालतं हे लोकांना समजावे यासाठी दाखविण्यात आल्याचे याआधीही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या वेबसिरीजचा विषयच असा असल्यामुळे अनेक जण सध्याच्या परिस्थितीशी याच्या कथेचे साधर्म्य जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून येत आहे. तर कदाचित यामुळेच प्रेक्षकांना ही सिरीज अधिक पाहावीशी वाटत आहे. या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय या सिरीजमध्ये काम करणारे कलाकारही अत्यंत कसलेले असून त्यांच्या अभिनयामुळे या वेबसिरीजला अधिक वेगळेपणा आणि भक्कमपणा आल्याचेही दिसून येत आहे. सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे यांच्यासारख्या कसदार कलाकारांचा अभिनय ही सिरीज पाहण्यास प्रेक्षकांना अधिक उद्युक्त करत आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन