Women's Day

महिला दिनाच्या निमित्ताने हे महिलाप्रधान चित्रपट बघायलाच हवेत

Vaidehi Raje  |  Mar 7, 2022
महिला दिनाच्या निमित्ताने हे महिलाप्रधान चित्रपट बघायलाच हवेत

गेली अनेक दशके केवळ पुरुषप्रधान चित्रपट दाखवल्यानंतर, नायकाला लार्जर दॅन लाईफ दाखवल्यानंतर आणि नायिकेला केवळ नायकाच्या अवतीभवती बागडणारी, त्याच्या मनोरंजनासाठी असलेली वस्तू दाखवल्यानंतर अखेर बॉलीवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मला गेल्या काही वर्षांत जाग आली आहे.  शेवटी स्त्रीवाद आणि मोठ्या पडद्यावर त्याबद्दल बोलण्याचे महत्त्व जागृत झाले आहे. पण महिलांना पडद्यावर योग्य स्थान देण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करत आहोत का हा मुख्य प्रश्न आहे. अलीकडच्या काळात, दिग्दर्शकांनी स्त्रियांबद्दल वेधक आणि प्रेरणादायी कथा आणल्या आहेत. या कथा खरं तर महिलांना केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या होत्या त्यामुळे पारंपरिक पुरुषप्रधान समाजाला खाड्कन जाग्या करणाऱ्या आणि हादरवून सोडवणाऱ्या होत्या. म्हणूनच आज जागतिक महिला दिनी यापैकी कमीतकमी एक चित्रपट बघायलाच हवा. 

क्वीन (2014)

2014 साली आलेला  कंगना रणौतचा क्वीन हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. ऐनवेळी होणाऱ्या नवऱ्याने लग्नच कॅन्सल केल्यावर राणी एकटीच परदेशात सोलो हनीमून साजरा करण्यासाठी जाते. चित्रपटात, तिच्या व्यक्तिरेखेचा प्रवास एका शांत स्त्रीपासून एक आत्मविश्वासू, खंबीर स्त्री असा होतो. हा चित्रपट केवळ खळखळून हसण्यासाठीच नाही तर जीवनातील असंख्य धड्यांसाठीही नक्कीच बघायला हवा. 

इंग्लिश विंग्लिश (2012)

इंग्लिश विंग्लिश हा श्रीदेवीचा कमबॅक चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या तर चांगलाच यशस्वी ठरला तसेच समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे खूप कौतुक केले होते. या चित्रपटात श्रीदेवीने एका साध्या मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका केली होती जी न्यूयॉर्कमध्ये इंग्रजी भाषेच्या क्लासला जाऊन तिचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला कधी तुमच्या कुटुंबियांच्या वागण्यामुळे किंवा मैत्रिणींच्या वागण्यामुळे नैराश्य आले असेल तर हा चित्रपट पुन्हा एकदा नक्की बघा. 

मेरी कोम (2014)

भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात प्रियांका चोप्रा जोनास मुख्य भूमिकेत होती. स्थानिक जिममध्ये प्रशिक्षण घेण्यापासून ते राष्ट्रीय चॅम्पियन बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मुळातच मेरी कोमचा प्रवास प्रेरणादायी आहे. हा प्रेरणादायी प्रवास पडद्यावर नक्कीच बघायला हवा. 

पिंक (2016)

2016 साली आलेला पिंक हा चित्रपट ‘नो मीन्स नो’ मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जबाबदार होता. या कोर्टरूम ड्रामामध्ये संमती आणि लैंगिक अत्याचारावर भाष्य केले आहे. विशेषत: MeToo च्या युगात हा एक नक्की बघण्यासारखा चित्रपट आहे.

तुम्हारी सुलू (2017)

तुम्हारी सुलू या चित्रपटात विद्या बालनने सुलू या मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका केली आहे. सुलु बोलण्यात एकदम पटाईत असते आणि म्हणूनच तिला जी रेडिओ जॉकी होण्याची संधी मिळते. तिच्या बॉस आणि सहकाऱ्यांच्या मदतीने, ती तिच्या कामात यशस्वी होते परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही समस्या उभ्या राहतात. त्यातून ती कशी मार्ग काढते हे नक्कीच बघण्यासारखे आहे. घर आणि काम दोन्हीही तितक्याच समर्थपणे सांभाळणाऱ्या स्त्रीशक्तीला हा चित्रपट समर्पित आहे.

सोनी (2018)

सोनी हा एक अंडररेटेड चित्रपट आहे. नवी दिल्लीतील दोन महिला पोलीस लैंगिक छळ आणि नोकरीच्या सततच्या दबावामुळे होणारी दमछाक यांच्या विरोधात आवाज उठवतात. पोलिस दलातील महिला आणि भारतीय समाजातील नोकरदार महिला असणे म्हणजे काय असते, त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच व्यावसायिक आणि वैयक्तिक आघाड्यांवरची त्यांची लढाई या कथेत दाखवली आहे. त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो परंतु त्या त्यातून मार्ग कसा काढतात हे नक्की बघा. 

हे चित्रपट केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनीच बघायला हवेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Women's Day