Fitness

नंदिता पालशेतकरांच्या ‘या’ हेल्थ टीप्सने प्रत्येक स्त्री होईल निरोगी

Leenal Gawade  |  Mar 7, 2019
नंदिता पालशेतकरांच्या ‘या’ हेल्थ टीप्सने प्रत्येक स्त्री होईल निरोगी

२०१९ च्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण असामान्य स्त्रियांची माहिती घेत आहोत. अर्थात निमित्त जागतिक महिला दिनाचे असले तरी अशा काही असामान्य स्त्रिया आहेत ज्यांनी स्त्रियांसाठी समाजासाठी वेगळी अशी कामे केली आहेत. त्यापैकीच एक असामान्य स्त्री म्हणजे डॉ. नंदिता पालशेतकर. स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या नंदिता यांनी कित्येक स्त्रियांना आई होण्याचा आनंद दिलेला आहे. IUY,IVF या उपचारपद्धततींमध्ये त्या तज्ज्ञ असून त्यांनी गर्भधारणेशी निगडीत अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. आई होण्यापेक्षाही महिलांना आई होण्यासाठी सक्षम असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी त्यांच्या उपचाराच्यामाध्यमातून दिला आहे. पण आजही महिला त्यांच्या आरोग्याविषयी सजग नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला आरोग्याविषयीच आम्ही जाणून घेतले आहे. जाणून घ्या नंदिता पालशेतकरांनी दिलेल्या या आरोग्यदायी टीप्स

महिला आरोग्याच्या अनेक तक्रारी घेऊन येतात. सध्या प्रामुख्याने येणाऱ्या तक्रारी कोणत्या?

महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात हे नव्याने सांगायला नको. पण बदलत्या काळानुसार महिलांच्या समस्याही बदलत गेल्या आहे. काम, कामाचा वाढणारा ताण  हे सगळे सांभाळताना महिलांची तारेवरची कसरत होते. पण ही कसरत करत त्या सगळ्या गोष्टी छान निभावून नेत असतात. पण त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे हे मात्र त्या विसरतात. डॉक्टर म्हणून महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी ऐकताना सध्या काही ठराविक तक्रारी प्रामुख्याने दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने PCOS, इन्फर्टिलिटी, रक्ताची करतरता, मोनोपॉझ, फायब्रॉईड्स, योनी संसर्ग यांसारख्या तक्रारी घेऊन महिला येत असतात. गेल्या काही वर्षात महिलांच्या आरोग्यासंदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत.

 महिलांचे आरोग्य बिघडण्याची प्रमुख कारणे

इतर प्रगतशील देशांच्या खांद्याला खांदा लावून देश प्रगती करत असला तरी भारतात मात्र अद्यापही स्त्रियांसाठी परिस्थिती फार काही बदलली आहे असे वाटत नाही. त्यामुळे देशातील महिलांना समान अधिकार मिळत असण्याचा हा काळ असला तरी गेल्या दोन दशकांपासून महिला आरोग्यामध्ये फार काही बदल झाला आहे असे वाटत नाही. आजही आपल्या देशातील शहरे वगळता महिला आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. त्याला काही कारणेसुद्धा आहेत. शिक्षण, कुटुंबाचा घरातील मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, लग्नासाठी मुलीवर असलेला ताण, लग्नानंतर मूलं होण्यासाठी केलेली घाई या सगळ्याचा अप्रत्यक्ष परीणाम हा महिलांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय या सगळ्या ताणामुळे महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना महिलांच्या इतर आजारांविषयी लवकर कळत नाही. उदाहरणादाखल द्यायचे झाले तर कॅन्सर हा असा आजार आहे. जो महिलांमध्ये वाढत चालला आहे. पण त्या संदर्भात महिलांना अधिक माहिती नाही

महिला आरोग्यासंदरर्भातील कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात?

महिलांमध्ये सहनशक्ती अधिक असते. काही दुखले तरी त्या सगळे सहन करुन काम करत राहतात. महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. पण आरोग्य तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करतात. कॅन्सरसारख्या आजारांची लक्षणे ही आधी दिसत असतात. त्यासाठी अगदी सर्वसामान्य अशा चाचणी करायच्या असतात. पण महिला त्या चाचण्या करत नाहीत.

उत्तम आहार प्रत्येक सुदृढ शरीरासाठी आवश्यक असतो. महिलांना सोसाव्या लागणाऱ्या गोष्टी पाहता त्यांचा आहार हा वयपरत्वे चांगला असायलाच हवा. पण तसे होत नाही. महिला त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात. ज्याचे दूरगामी परिणाम त्यांना भोगावे लागतात. 

यासोबत महिलांना जर घरी समान वागणूक मिळत नसेल तर त्यांना त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी घरी सांगणे आवडत नाही. त्यांच्या मनात त्यांच्याविषयी कमीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळेही त्या त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.

त्या त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम करतात?

एखादी गोष्ट दुर्लक्षित केल्यानंतर त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होणे स्वाभाविक आहे. थकवा, रक्ताची कमतरता. सतत चीडचीड,ताण-तणाव, अवलंबून राहण्याची वृत्ती वाढते. साहजिकच अन्य आजारांना देखील अशा गोष्टी आमंत्रण देतात.

मूल व्हावे म्हणून महिला वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेण्यासाठी तयार असतात? अशा महिलांना काय सल्ला द्याल?

प्रत्येक स्त्रीला आई व्हायचे असते. त्यासाठी त्या सगळे काही करायला तयार असतात. पण तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य वेळी काळजी घ्यायला हवी हे मात्र त्या विसरतात. महिलांनी  आई होण्याच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, मूल न होण्यामागे नेहमी त्याच जबाबदार नसतात. कमतरता ही कायम स्त्रियांमध्येच नसते.त्यामुळे सगळ्यात आधी मनातून ही गो्ष्ट काढून टाका.

सध्या अनेक चांगल्या ट्रिटमेंट आल्या आहेत ज्या तुम्हाला आई होण्यासाठी मदत करु शकतात. महिला बीजांड साठवून ठेवण्याची नवी पद्धत आता आली आहे. लग्नाआधी देखील तुम्ही तुमचे बीजांड साठवू शकता.(नंदिता पालशेतकर यांनी मिस वर्ल्ड डायना हेडन हिला मातृत्वाचा आनंद याच पद्धतीने मिळवून दिलेला आहे. तब्बल ८ वर्षे तिची बीजांडे साठवून ठेवण्यात आली. आठ वर्षानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.)

 अनेक नव्या उपचारपद्धती आहेत. काही उपचारपद्धती या माफक दरात आहेत. त्यामुळे उपचारपद्धतींसंदर्भात असलेल्या भितीने उपचार घेणे टाळू नका.

डॉक्टर म्हणून महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करता पण रुग्णांना वेळ देताना स्वत:चे दिवसभराचे रुटीन कसे सेट करता? /  नंदिताचे दिवसभराचे रुटीन काय?

मी रोज सकाळी साधारण ६ वाजता उठते. सकाळी उठल्यानंतर दिवसभर मला ताजेतवाने वाटावे म्हणून योगा करते. त्यानंतर दिवसभर माझ्या मिटींग्स.कामे. पेशंटस हे सगळे सुरुच असते. पण मी यासगळ्यातून माझ्या कुटुंबासाठीही वेळ काढते. कारण प्रत्येक स्त्रीसाठी तिचे कुटुंब तिचा कणा असते. त्यामुळे किमान रात्री तरी एकत्र जेवत दिवसभराचा ताण मी हलका करते. या व्यतिरिक्त माझे पेशंटस मला खूष ठेवत असतात. त्यामुळे माझा दिवस चांगला जातो. मुळात चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही आनंदी राहणे गरजेचे असते तसे राहण्याचा मी पूर्ण प्रयत्न करते.

महिला दिनानिमित्त महिलांना, मुलींना, तरुणींना कोणता आरोग्यदायी सल्ला द्याल?

 २०१९ महिला दिनानिमित्त मला सगळ्या महिलांना WE FOR STREE असा सल्ला द्यायचा आहे.  भारतातील महिलांना अधिक सक्षम झालेले मला पाहायचे आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये तिच्या समोर उभ्या ठाकलेल्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद आलेली मला पाहायची आहे.

आरोग्यबाबत सांगायचे झाले तर मला सगळ्याच तरुणींना, महिलावर्गाला काही गोष्टी आवर्जून सांगायला आवडतील.

हेल्दी डाएटविषयी हल्ली अधिक बोलले जाते. कारण स्त्रियांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. खाण्याच्या वेळा, अरबटचरबट खाणे यामुळे शारिरीक स्वास्थ्य लवकर बिघडते त्यामुळे महिलांनी चांगल्या गोष्टी खायला हव्यात.तुमच्या उंचीनुसार आणि वयानुसार तुमचे वजन असायला हवे. वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपाशी राहू नका पण डॉक्टरांचा सल्ला घेऊन चांगल्या गोष्टी खा.

 कोणतेही व्यसन हे शरीरासाठी वाईटच असते. महिलांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये. कामाचा ताण म्हणून सिगरेट फुंकणे, दारु पिणे या गोष्टी चांगल्या नाहीत.ज्या तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम करत असतात.

प्रत्येक प्रवासात तुम्ही ज्या प्रमाणे सेफ्टी किटसोबत बाळगत असता अगदी त्याचप्रमाणे महिलांनी त्यांची एक वेगळी सेफ्टी किट बनवायला हवी. ज्यामध्ये त्यांना आरोग्याच्या दृष्टिने महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी त्यांनी ठेवायला हव्यात.

मोनोपॉझनंतर काही महिला निश्चिंत होतात. पण त्यानंतर शरीरात होणारे बदल तुम्हाला वेगळे वाटत असतील तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांकडे जा

स्त्रियांनी केवळ गर्भधारणेच्या वयापर्यंतच नाही तर त्यानंतरही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. विशेषत: ज्या महिला वयाच्या चाळिशीनंतरही सेक्श्युअली अॅक्ट्िव्ह आहेत. अशांनी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या लसी घेणे गरजेचे आहे.

Read More From Fitness