मनोरंजन

जयडीची नवी सुरुवात, बाबांच्या अनोख्या राजकन्येचा प्रवास होतोय सुरू

Dipali Naphade  |  Mar 5, 2019
जयडीची नवी सुरुवात, बाबांच्या अनोख्या राजकन्येचा प्रवास होतोय सुरू

मराठी मालिकेतील जयडी ही सर्वांच्या आवडती होती. मात्र त्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर किरण ढाणे आता वेगळ्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. खरं तर राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील ‘ती’ राजकन्या. मात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गीय मुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येते. तिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कविता, त्यांच्या साठी ती राजकन्याच आहे, हे स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी बाबांच्या या राजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेत. डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहे. खाकी वर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य 11 मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

कोठारे यांची निर्मिती

महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. या मालिकेची निर्मितीदेखील कोठारे व्हिजन यांनीच केली असून यावेळी असा वेगळा आणि चांगला विषय हाताळण्याची संधी मिळाल्याचं यावेळी महेश कोठारे यांनी सांगितलं. प्रत्येक निर्माता मी काहीतरी वेगळं करेन असं म्हणत असतो पण आम्ही आतापर्यंत खरंच वेगळं देत आलो आहोत असं म्हणून पत्रकार परिषदेमध्ये महेश कोठारेंनी उपस्थितांची दादही मिळवली. शिवाय मालिकेचं टायटल हे आदिनाथ कोठारेने सुचवलं आहे. शिवाय साधारण 200 च्या आसपास या पात्रासाठी ऑडिशन्स घेतल्यानंतर अभिनेत्री किरण ढाणेला यासाठी निवडण्यात आल्याचंही यावेळी आदिनाथनं सांगितलं. या मालिकेचे दिग्दर्शक गौतम कोळी यांनीही ही मालिका वेगळी असून यामध्ये पोलिसांच्या आयुष्याविषयी दर्शवण्यात आल्याचं सांगितलं आहे. यावेळी अभिनेत्री किरणने सांगितलं की, ती स्वतः साताऱ्याची असून इथे अजूनही मुंबईमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मालिकेतील अवनी आणि प्रत्यक्षातील किरण यांच्यामध्ये बरंच साम्य आहे. 

किरण ढाणेची नवी भूमिका अवनी

21 व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेहीअपुरी पडत नाही. बाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे हळूहळू मालिकेतून उलगडत जाणारआहे. या मालिकेचं कथानक आणि विषयाबरोबरच शीर्षकगीत हे या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य आहे. हे शीर्षकगीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं असून त्याला देवकी पंडित आणि अजय पुरकर यांनी हे गीत गायलं आहे.

आव्हानांना घाबरू नका – किरण ढाणे

महिला दिनाच्या शुभेच्छाही यावेळी किरण ढाणेने दिल्या आणि महिला या सक्षम असून त्यांनी अधिक सक्षम बनण्यासाठी आव्हानांना घाबरून न जाता त्यांना सामोरं जायला हवं असं म्हटलं. शिवाय संकटांना घाबरू नका तर संकटांच्या मागे तुम्हा हात धुवून लागा म्हणजे संकट पळून जाईल आणि प्रत्येक गोष्टीला धीराने सामोरं जा असंही यावेळी किरणने सांगितलं.

हेदेखील वाचा – 

‘सावट’मधल्या इन्व्हेस्टीगेटीव्ह ऑफिसरच्या भूमिकेसाठी स्मिता तांबेने कापले केस

…आणि कुंभ मेळ्यात उजळून निघाले ‘ब्रम्हास्त्र’, पाहा फोटो

जॉनच्या RAW चा ट्रेलर पाहून तुम्हाला नक्कीच आठवेल आलिया

 

 

Read More From मनोरंजन