मनोरंजन

ऑस्कर सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणापूर्वीच यंदा दिले जातील ‘या’ आठ श्रेणीतील पुरस्कार

Trupti Paradkar  |  Feb 24, 2022
ऑस्कर सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणापूर्वीच यंदा दिले जातील ‘या’ आठ श्रेणीतील पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची घोषणा होताच कलाप्रेमी या सोहळ्याची अगदी आतूरतेने वाट पाहू लागतात. कारण ऑस्कर पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील एक सर्वात मोठा पुरस्कार समजला जातो. ऑस्कर पुरस्काराचे खरे नाव हे दी अकेडमी अवॉर्ड ( The Academy Awards) असे आहे. हा पुरस्कार अमेरिकन अकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅंड सायन्स तर्फे दिला जातो. यंदा 94 व्या अकेडमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 27 मार्चला केले जाणार आहे.  टेलीव्हिजनवरून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहणे हा एक प्रेक्षक म्हणून एक रोमांचक अनुभव असतो. कोरोनानंतर अशा मोठ्या सोहळ्याचा भाग होणं ही अनेकांची इच्छा असू शकते. मात्र यंदा या संस्थेने असा निर्णय घेतला आहे की सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यापूर्वीच यातील आठ श्रेणीमधील विजेत्यांना पुरस्कार दिले जातील. 

पुरस्कार सोहळ्यात का करण्यात आला आहे हा बदल 

सर्व श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार नेहमी थेट प्रक्षेपणाद्वारे प्रेक्षकांना पाहता येतात. या सोहळ्याचा प्रेक्षकवर्ग हा संपूर्ण जगभरात असतो. मग यंदाच असा मोठा बदल या सोहळ्यात का करण्यात आला आहे. अॅकेडमीच्या सदस्य आणि समिती सदस्यांनी हा बदल यंदा केला आहे. ऑस्कर पुरस्काराच्या थेट प्रक्षेपणादरम्यान कमी झालेल्या प्रेक्षकांच्या संस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी हा बदल झाला आला आहे. यासाठी थेट प्रक्षेपणाआधी लघु वृत्तपट, चित्रपट संपादन, मेकअप, केशभूषा, गायन, प्रॉडक्ट डिझाईन, एनिमेटेड शॉर्ट, लाईव्ह अॅक्शन शॉर्ट आणि म्युजिकशी निगडीत पुरस्कार आधी देण्यात येतील. ज्यामुळे कार्यक्रमात अधिक मनोरंजक कार्यक्रम दाखवता येतील. कॉमेडी अथवा गाण्यांचे मनोरंजक कार्यक्रम असतील तर सोहळ्याला अधिक शोभा येईल आणि प्रेक्षकांची गर्दी वाढेल असं आयोजकांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते सर्वांनाच हा बदल नक्कीच आवडणार नाही. मात्र कार्यक्रमामध्ये योग्य संतुलन राखण्यासाठी हा बदल गरजेचा आहे.

कलाकार आणि प्रेक्षक झाले नाराज

ऑस्कर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण  वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीम द्वारादेखील केलं जाईल. याशिवाय ट्विटर, फेसबूक आणि युट्यूबसारख्या अनेक सोशल मीडिया माध्यामावरही प्रेक्षक ते पाहू शकतात. प्रत्यक्ष सोहळा लाईव्ह अनुभवणं ही अनेकांच्या बकेट लिस्टमध्ये असू शकतं. मात्र यंदा सोहळ्यात करण्यात आलेला हा मोठा बदल अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळे या बदलावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. वास्तविक यापूर्वीदेखील या सोहळ्यात अनेकदा असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. पण प्रेक्षक आणि कलाकार मात्र यामुळे खूप नाराज झाले आहेत. कारण अनेकांसाठी या विजेत्यांचा गौरव होताना पाहणं आणि त्यानंतर त्यांचे भाषण ऐकणं ही मनोरंजनाची गोष्ट असते. मात्र यंदा आता या आठ श्रेणीतील पुरस्कार विजेत्यांचा आनंद प्रेक्षकांना पाहता येणार नाही.

Read More From मनोरंजन