आरोग्य

अर्धांगवायू लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार (Paralysis Symptoms In Marathi)

Trupti Paradkar  |  Jun 8, 2021
Paralysis Symptoms In Marathi

अर्धांगवायू म्हणजेच पक्षाघात या आजारात माणसाच्या शरीरातील स्नायूंची हालचाल बंद झाल्यामुळे त्याचे अर्धे शरीर लुळे पडते अथवा निकामी होते. आपल्या शरीरातील हालचालींच्या संवेदना या परिघीय आणि मध्यवर्ती मज्जासंस्था या मज्जातंतूच्या सहकार्याच्या माध्यमातून नियंत्रित केल्या जातात. मज्जासंस्था ही शरीरातील एक महत्त्वाची यंत्रणा असून ती मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये असते. मात्र अर्धांगवायू झाल्यास मज्जासंस्था आणि मेंदूच्या कार्यात अडचणी येतात आणि शरीराचा अर्धा भाग अनियंत्रित होतो. स्नायू कमकुवत झाल्यामुळे अर्धांगवायूचा आजार बळावतो आणि शरीराच्या हालचाल करण्यासाठी स्नायूंची क्षमता पूर्ण कमी होते. 

अर्धांगवायूची लक्षणे शरीरातील कोणत्याही भागावर जाणवू शकतात. बऱ्याचदा यामध्ये शरीराचा एक भाग निकामी होतो मात्र काही वेळा दोन्हीकडीला भागावरही याचा परिणाम दिसून येतो. काही लोकांना कंबरेखालील भागावर अर्धांगवायूचा परिणाम दिसून येतो. ज्याला पॅराप्लेजिआ असं म्हणतात. तर क्वाड्रिप्लेजिया अर्धांगवायूमध्ये माणसाचे दोन हात आणि दोन पाय निकामी होतात. अपघात, मानसिक धक्का अथवा पाठीच्या कण्यातील दुखापतीमुळे अर्धांगवायू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अर्धांगवायूचा  झटका अचानक येतो यासाठीच प्रत्येकाला अर्धांगवायू लक्षणे (paralysis symptoms in marathi) आणि अर्धांगवायू घरगुती उपचार (paralysis treatment in marathi) याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. 

अर्धांगवायू लक्षणे (Paralysis Symptoms In Marathi)

अर्धांगवायू म्हणजे पक्षाघात, ज्यामध्ये शरीरातील काही ठराविक भागातील स्नायूंची हालचाल अचानक मंदावते अथवा बंद होते. यासाठीच जाणून घेऊ या अर्धांगवायूची लक्षणे

संवेदना अथवा जाणीव कमी होणे

अर्धांगवायूचा संबध हा मेंदू आणि मज्जासंस्थेशी असल्यामुळे या आजारातील प्रमुख लक्षण हेच की संवेदना अथवा जाणीव अचानक कमी होते. ज्या भागावर पक्षाघात झाला आहे त्या भागामधील स्नायूंची संवेदना अचानक बंद होते. बऱ्याचदा या आजारात एखाद्याचे अर्धे अथवा संपूर्ण शरीर, हात अथवा पाय असे अवयव निकामी होतात. मात्र जर मेंदूचा अर्धांगवायू म्हणजेच स्ट्रोक झाल्यास ह्रदयातून मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात अथवा फुटतात. ज्यामुळे ती व्यक्ती  कोमात जाण्याची अथवा बेशुद्ध होते. मेंदूला लकवा मारल्यामुळे त्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीराची हालचाल बंद होते. अशा व्यक्तीची जगण्याची शक्यता खूपच कमी असते. योग्य  आणि वेळेवर उपचार मिळाल्यास त्या व्यक्तीला जीवदान मिळू शकते. हात, पाय, अर्धे शरीर अशा भागावर अर्धांगवायू झाल्यास उपचार करून त्या व्यक्तीला बरे करता येते. मात्र त्यासाठी शरीरामध्ये होणारे हे बदल पटकन समजणे गरजेचे आहे. 

Pixels

मानसिक अवस्था बिघडणे

अर्धांग वायूचा झटका येण्याआधी त्या व्यक्तीची मानसिक स्थिती हळूहळू बदलू लागते. जसं की त्या व्यक्ती क्षणात विचित्र वागते आणि क्षणात पुन्हा नीट वागू लागते. दैनंदिन कामे करताना त्या व्यक्तीचा गोंधळ उडतो. चक्कर येते अथवा काम करण्याचा कंटाळा येतो. एखादी गोष्ट डबल दिसते अथवा नसलेल्या गोष्टी असल्याचा भ्रम होतो. थोडक्यात अशी मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तीला अर्धांगवायू होण्याचा धोका जास्त असतो. अर्धांगवायू होण्याचे एक कारण मानसिक ताण असू शकते यासाठीच जाणून घ्या मानसिक आजाराची लक्षणे, मानसिक आजार उपाय मराठीत.

स्मरणात ठेवणे कठीण जाणे

अर्धांगवायू होण्याआधीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्मरणशक्तीवर परिणाम होणे. जर एखाद्याला सतत कोणतीही गोष्ट आठवण ठेवणं कठीण जात असेल, विचार करणं जमत नसेल, बोलताना अडथळा येत असेल, समोरच्या व्यक्तीचे बोलणे समजत नसेल, उच्चार करताना, वाचताना अथवा लिहिताना त्रास होत असेल, स्नायूंची हालचाल योग्य पद्धतीने होत नसेल तर ही लक्षणे अर्धांगवायूची असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे आढल्यास त्या व्यक्तीला त्वरीत वैद्यकीय मदतीची गरज आहे हे ओळखावे.

श्वसनाचा त्रास होणे अथवा धाप लागणे

मज्जासंस्था मुळे शरीतातील सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवले जाते. मात्र जेव्हा या कार्यात बिघाड होतो तेव्हा त्याचा परिणाम इतर अवयवांवर दिसू लागतो. जसं की श्वसन क्रियेत अडथळे अथवा श्वास घेण्यास त्रास जाणवतो. धाप लागणे, श्वास घेता न येणे, तोंडावाटे श्वास घ्यावा लागणे, श्वास घेताना मोठ्याने आवाज येणे, घरघर लागणे, घशात श्वास अडकणे अशी लक्षणे (paralysis symptoms in marathi) असतील तर त्या व्यक्तीला अर्धांगवायू होण्याची शक्यता असू शकते.

तीव्र डोकेदुखी

शारीरिक कार्य उत्तम रितीने होण्यासाठी मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा व्हायला हवा. मात्र जेव्हा मेंदू अथवा मज्जासंस्थेला रक्तपुरवठा होत नाही तेव्हा शारिरीक कार्यात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी प्रमाणात मिळाल्यास मेदूला पेशींना कार्य करणे कठीण जाते. ज्यामुळे तीव्र डोकेदुखीचा त्रास रुग्णाला जाणवतो. अतिदाबामुळे रक्तवाहिनी फुटल्यास अथवा बंद झाल्यास स्ट्रोक येतो आणि त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत द्यावी लागते. मात्र हा त्रास तात्पुरत्या स्वरुपाचा असेल तर डोकेदुखीनंतर तो पूर्ववत करता येतो. यासाठीच तीव्र डोकेदुखी जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी. यासोबतच वाचा मायग्रेनची लक्षणे व घरगुती उपाय.

अचानक मूड अथवा व्यक्तिमत्त्व बदलणे

मानसिक स्थितीवर मेंदू आणि मज्जा संस्थेद्वारा नियंत्रण ठेवले जाते. मात्र अर्धांगवायूमध्ये मज्जासंस्थे वरील नियंत्रण सुटल्यामुळे सर्व शारीरिक आणि मानसिक क्रिया बिघडतात. ज्यामुळे माणसाच्या वागण्या बोलण्यावरचा ताबा जाताे. म्हणूनच अर्धांगवायूचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण हे की त्या व्यक्तीचा अचानक मूड बदलतो आणि ती व्यक्ती एखादी वेगळं व्यक्तिमत्त्व असल्याप्रमाणे वागू लागते. बोलताना नियंत्रण सुटल्यामुळे अशी व्यक्ती भूतकाळ, भविष्यकाळातील कोणत्याही घटना अथवा संदर्भ नसलेल्या गोष्टी बोलू लागते. यासाठीच तुम्ही तणावाखाली तर नाही ना… जाणून घ्या नैराश्य लक्षणे.

शरीरावरील नियंत्रण जाणे

मेंदूवरील अनियंत्रणामुळे शारिरिक हालचाली वर ताबा ठेवणे कठीण जाते. ज्यामुळे त्या व्यक्तीचे हात, पाय, शरीर अनियंत्रित होते. अंग थरथरणे, हात अथवा पाय लुळे पडणे, अंगाचा तोल जाणे, बसणे अथवा उभे राहता न येणे, चेहरा वाकडा होणे, बोलताना अडथळे येणे, हालचाल करता न येणे अशी लक्षणे (paralysis symptoms in marathi) जाणवत असतील तर त्या व्यक्तीला अर्धांगवायू झाला असून त्वरीत वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करावा.

Pixels

सतत तोंडातून लाळ गळणे

जीभेतून सतत लाळ निर्माण केली जात असते. कारण तोंडात लाळग्रंथी असतात जे लाळेची निर्मिती करत असतात. तोंडावाटे निर्माण झालेल्या लाळेमुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत असते. तोंडातील आणि जीभेच्या स्नायूंमुळे तोंडात निर्माण होणारी लाळ नियंत्रित ठेवली जाते. शिवाय जेव्हा गरज असते तेव्हाच या लाळेची निर्मिती होत असते. मात्र अर्धांगवायूमुळे तोंड आणि जीभेचे स्नायू निकामी होतात. ज्यामुळे तोंडाचा आकार बदलतो आणि तोंडातून सतत लाळ गळू लागते. यासाठीच अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीच्या तोंडातून लाळ गळत असते.

अंगाला बधीरपणा येणे

शरीरातील स्नायूंची संवेदना कमी झाल्यामुळे अर्धांगवायूत व्यक्तीचे शरीर लुळे पडते. लकवा आलेल्या अथवा पक्षाघात झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील काही ठराविक अवयवांच्या स्वायूंमध्ये संवेदना नसल्यामुळे त्या भागावर बधीरपणा येतो. अशा व्यक्तीच्या लुळ्या पडलेल्या अवयवाला स्पर्श केल्यास त्याला कोणत्याही संवेदना जाणवत नाहीत. त्यामुळे एखाद्या अवयवाच्या  संवेदना कमी झाल्या असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अर्धांगवायू घरगुती उपचार (Paralysis Treatment In Marathi At Home)

अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला सर्वप्रथम वैद्यकीय उपचार घ्यावेत. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीचे लुळे पडलेले शरीर मानसिक आधार आणि घरगुती उपचारांनी बरे करता येऊ शकते.

मोहरीच्या तेलाने मालिश

लकवा मारलेल्या शरीराला तेलाने मालिश केल्यास काही दिवसांमध्ये त्यामध्ये  सुधारणा दिसून येते. यासाठी अर्ध्या लीटर मोहरीच्या तेलात पन्नास ग्रॅम लसूण टाकून लोखंडी कढईत ते गरम करावे. थंड झाल्यावर तेल गाळून एखाद्या काचेच्या बाटलीत अथवा बरणीत ठेवावे. मोहरीचे तेल आणि लसणाचे मिश्रण अंगाला लावून मालिश केल्यामुळे अर्धांगवायू मध्ये  चांगला आराम मिळतो. 

गरम पाणी आणि तुळशीच्या पानांची वाफ

लकवा मारलेल्या व्यक्तीला अर्धांगवायू झालेल्या शरीराला शेक देणं गरजेचं असतं. यासाठी तुम्ही गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून त्याची वाफ अथवा शेक त्या भागाला देऊ शकता. या वाफेमुळे अंगातील स्नायूंना प्रोत्साहन मिळू शकते. ज्यामुळे पुन्हा त्या व्यक्तीचे अवयव नीट होऊ शकतात. मात्र हा उपचार इतर वैदकीय उपचारांसोबत घ्यावा ज्यामुळे करत असलेल्या उपचारांना प्रोत्साहन मिळू शकते. 

दूध आणि खजूर

दूध आणि खजूर या दोन्हीमध्ये अशक्तपणा दूर करणारे गुणधर्म असतात. हे दोन पदार्थ एकत्र करून रूग्णाला खाण्यास दिल्यामुळे त्याच्या अंगात ताकद येते. लोहाचे प्रमाण वाढण्यासाठी, हाडे मजबूत होण्यासाठी, स्नायूंना बळकटी येण्यासाठी दूध आणि खजूर फायदेशीर ठरतात. यासाठी दररोज दूधात काही खजूर भिजवून त्या व्यक्तीला खाण्यास द्यावे. 

काळी मिरी आणि तूपाचा लेप

अर्धांगवायू बरा करण्यासाठी अनेक वेळा आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार प्रभावी ठरतात. अशा रुग्णांना अर्धांगवायू झालेल्या भागावर लेप लावण्याची पद्धत आहे. यासाठी एक चमचा काळी मिरी वाटून घ्यावी आणि तीन तीन चमचे शूद्ध तूपात मिसळून त्याचा लेप रुग्णाच्या अंगाला लावावा. असा लेप लावून मालिश केल्यामुळे हळू हळू त्या रूग्णाच्या शरीरात प्रगती झालेली दिसून येऊ शकते.

हळदीचे दूध अथवा काढा

अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला हळदीचा काढा अथवा दूध देणे फायदेशीर ठरेल. कारण प्राचीन काळापासून हाडे मजबूत होण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी हळदीचे दूध देण्याची पद्धत आहे. हळद ही पूर्वीपासून औषध अथवा मसालाच्या स्वरूपात वापरली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हळदीचे दूध दिले जाते. अर्धांगवायू झालेल्या लोकांच्या आहारात हळदीचा वापर केल्यामुळे ही त्यांना या त्रासातून बाहेर पडण्याची शक्ती मिळू शकते.

अर्धांगवायूबाबत महत्त्वाचे प्रश्न – FAQ’s

1. अर्धांगवायूचा झटका आल्यास कोणते उपचार करावे ?

अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला प्रथमोपचार देण्यासाठी आधी त्या व्यक्तीला कुशीवर झोपवावे आणि पुढे वैद्यकीय मदत घ्यावी. त्यामुळे त्या व्यक्तीची श्वसन क्रिया सुरळीत सुरू राहते. लक्षणे तपासून कोणत्या प्रकाराचा अर्धांगवायू झाला आहे याचे निदान करून डॉक्टर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार देतात.

2. अर्धांगवायू कशामुळे होतो ?

अर्धांगवायू होण्याची कारणे अनेक आहेत. मेंदूंचे गंभीर आजार, ऑटोइम्यून विकार, स्ट्रोक, ह्रदयविकार, विषबाधा अशा कारणांमुळेही अर्धांगवायू होण्याची शक्यता असते. गंभीर स्वरूपाच्या म्हणजेच स्ट्रोक अथवा मानेच्या मणक्याच्या दुखापतीमुळे होणाऱ्या अर्धांगवायूची लक्षणे त्वरीत जाणवतात. अशा परिस्थितीत रुग्णाला ताबडतोब वैद्यकीय मदतीची गरज असते.

3. अर्धांगवायूचा धोका कसा कमी करावा ?

अर्धांगवायू होऊ नये यासाठी नियमित रक्तदाब, रक्तातील साखर, वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा. हृदयविकार असणाऱ्या लोकांनी नियमित तपासणी करावी. योग्य आहार, विहार आणि व्यायामाची सवय स्वतःला लावावी.

फोटोसौजन्य – pixels

Read More From आरोग्य