मनोरंजन

भारतात चित्रीत ‘पीरियड. एंड ऑफ सेंटेंस’चं ऑस्करसाठी नॉमिनेशन

Aaditi Datar  |  Jan 24, 2019
भारतात चित्रीत ‘पीरियड. एंड ऑफ सेंटेंस’चं ऑस्करसाठी नॉमिनेशन

मासिक पाळी विषयावरील भारतीय पार्श्वभूमीची ‘पीरियड. एंड ऑफ सेंटेंस’ ही डॉक्युमेंटरी ऑस्करसाठी नॉमिनेट झाली आहे.

यंदाच्या 91व्या अकादमी अवार्ड्ससाठी ‘डॉक्यूमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट’ कॅटेगरीमध्ये या डॉक्युमेंटरीला नॉमिनेशन मिळालं आहे. या डॉक्युमेंटरीचं दिग्दर्शन रायका जेहताबची यांनी केलं असून गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेंनमेंटने याची सहनिर्मिती केली आहे. या आधीही 2010 साली मोंगा यांची कवी ही शॉर्टफिल्म ऑस्करसाठी नॉमिनेट झाली होती. गुनीत यांनी आत्तापर्यंत 30 फिल्म्सची निर्मिती केली असून यामध्ये द लंचबॉक्स, गँग्स ऑफ वासेपूर आणि मसान यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. 

26 मिनटांच्या या डॉक्युमेंटरीमध्ये उत्तर भारतातील हापुरमधील महिला आणि त्यांच्या गावात लावण्यात आलेल्या एका पॅड मशीनबाबतच्या अनुभवांचं चित्रिकरण करण्यात आलं आहे. या डॉक्युमेंटरीच्या ट्रेलरमध्ये दिल्लीजवळील एक गाव दाखवण्यात आलं आहे. जिथे मासिक पाळीबाबत कोणतीही जागरूकता नाही. स्थानिक महिला याबाबत बोलायला लाजत आहेत. तर काहींना सॅनिटरी नॅपकीन माहीतच नाही. काहीजणी फक्त कापड वापरत असल्याचं मान्य करतात. अशा गावात सॅनिटर नॅपकिनची निर्मिती करणार मशीन लावल्यावर काय घडतं ते दाखवण्यात आलंय.

भारतात आजही मासिकपाळी संदर्भात हवी तेवढी जागरुकता नाही. आजही भारतातील जवळजवळ 90% स्त्रिया मासिकपाळीत कापडाचाच वापर करतात. तसंच बऱ्याचश्या घरात याबाबत आजही खुलेपणाने चर्चाही होत नाही. मग ग्रामीण भागातील स्थितीचा विचार न केलेलाच बरा.

या डॉक्युमेंटरीमध्ये पॅडमॅन अरुणाचलम मुरूगनाथन यांच्या कामावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित अभिनेता अक्षयकुमार आणि सोनम कपूर यांचा पॅडमॅन हा चित्रपट आला होता. त्यामुळे या दोन्ही फिल्म्स खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण आज या विषयावर मोठ्या प्रमाणात जागृतीची आणि खुलेपणाने चर्चा होण्याची गरज आहे.   

या डॉक्युमेंटरीचं निर्माण ‘द पॅड प्रोजेक्ट’ नामक संस्थेने केलं आहे. या संस्थेची सुरूवात लॉस एंजिलिसमधील ओकवूड स्कूलच्या स्टूडेंट ग्रुप आणि त्यांची टीचर मेलिसा बर्टनने केलं आहे.

ऑस्करमध्ये यंदा भारताचं कनेक्शन असलेली ही एकमेव डॉक्युमेंटरी आहे. 24 फेब्रुवारीला लॉस एंजिलिस येथे ऑस्कर पुरस्काराचा सोहळा रंगणार आहे.  

Read More From मनोरंजन