मार्चच्या मध्यावरच इतका उकाडा जाणवू लागला आहे की, काहीतरी थंड खाऊन हा उष्मा कमी करावा असे आपल्याला वाटते. इतरवेळी बंद असलेला फ्रिज आता चांगलाच वापरात आलेला आहे.थंड पाणी पिऊन आपल्यातील अनेक जण आपली तहान भागवतात. तर काही जण बर्फाचे पाणी किंवा आईस्क्रिम खाऊन आपल्या पोटाला थंडावा देण्याचे काम करत आहे. पण वरुन थंड भासणाऱ्या आणि लागणाऱ्या गोष्टी या तुमच्या पोटाला किंवा शरीराला थंडावा देऊ शकत नाहीत. त्यामुळे सतत थंड पाणी पिऊन त्रास ओढावून घेऊ नका. शरीराला आतून बाहेरुन थंडावा देणाऱ्या गोष्टीचे सेवन करा. चला जाणून घेऊया अशा गोष्टी ज्यामुळे तुम्हाला मिळू शकतो थंडावा
ताक
दही मोडून त्याचे ताक करुन केले जाते. अनेकांच्या जेवणानंतर जिरवणीसाठी ताक हमखास असते. उन्हाळ्यात विशेष करुन ताक प्यायले जाते. ताक शरीराला आतून थंड करण्याचे काम करते. त्यामुळे तुम्हाला खूप उकडत असेल किंवा थंड काहीतरी प्यावेसे वाटत असेल तर तुम्ही दही मोडून त्याचे ताक प्यायला हवे. ताक पिण्याचे फायदे अन्य देखील आहे. ताकामुळे पचनाचे कार्य चांगले होण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात आधीच पचनक्रिया मंदावलेली असते. ताक प्यायल्यामुळे पचनाचे कार्य सुरळीत होण्यास मदत मिळते.
सब्जाचे पाणी
खूप जणांना उन्हाळ्यात उन्हाळे लागण्याचा त्रास होतो. याचे कारण शरीरात वाढलेली उष्णता. अशावेळी लघवीच्या जागेत दुखू लागते. झोंबल्यासारखे होते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर सब्जा भिजत घाला. माठाच्या पाण्यात सब्जा भिजत घातला तर तो छान गार लागतो. सब्जाचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. त्यामुळे चांगला चमचाभऱ सब्जा पाण्यात घाला आणि ते पाणी थोडे थोडे पित राहा. तुम्हाला नक्कीच थंडावा मिळण्यास मदत मिळेल.
लिंबू पाणी
उन्हाळ्यात खूप जास्त तहान लागते. कितीही पाणी प्यायले तरी देखील तहान भागत नाही. एखाद्या कामाचा पटकन कंटाळा येतो. तुम्हालाही असा सतत थकवा येत असेल तर तुम्ही लिंबाचे पाणी प्या. लिंबाचे पाणी तुमचा थकवा दूर करण्यास मदत करते. शिवाय शरीरही थंड ठेवते. त्यामुळे तुम्ही अगदी नक्कीच लिंबू पाण्याचे सेवन करायला हवे. लिंबू पाण्यामध्ये साखर, लिंबाचा रस असतो. त्यामुळे त्वचा देखील चांगली राखण्यास मदत मिळते.
कोकम सरबत
शरीराला थंडावा देणाऱ्या कोकमाचा रस किंवा कोकम सरबतदेखील तुम्ही या दिवसात पिऊ शकता. कोकम सरबत हे शरीराला थंडावा देण्याचे काम करते. या काळात तुम्ही सोलकढी करुन प्याल तरी देखील तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळत. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास कोकम सरबत करा. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना देखील कोकम सरबत देऊ शकता.
आता उन्हाळ्यात थंडावा हवा असेल तर या गोष्टी करायला अजिबात विसरु नका.