पायांवरची सूज म्हणजे एका किंवा दोन्ही पावलांवर सूज येणे. पावलांवर सूज येणे ही सामान्य गोष्ट आहे, खासकरून जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी प्रवास करत असाल तर किंवा गरोदरपणात पाय सुजतात. पावलांच्या आणि पायांच्या पेशींमध्ये जास्त प्रमाणात द्रव जमा झाल्यामुळे पायांवर सूज येते.पेशींमध्ये जसजसे द्रव साचत जाते तशी सूज वाढत जाते.
इतर प्राणी चतुष्पाद आहेत. पण मानव हा द्विपाद असल्याने त्याचे पोस्चर हे इरेक्ट आहे. त्यामुळे पायाच्या नसांमधील रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध हृदयाकडे जाते. रक्ताचा हा प्रवाह शिरांमधील झडपांच्या उपस्थितीमुळे आणि पायाच्या स्नायूंच्या आकुंचनाने सुनिश्चित केला जातो. अशाप्रकारे, हृदयाकडे रक्त परत येण्याच्या कोणत्याही समस्येमुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढू शकतो, परिणामी टिश्यूजमध्ये द्रव जमा होते आणि पायांवर सूज येऊ शकते.
पायांवरची सूज दोन प्रकारांची असते
पायांवरची सूज पिटिंग किंवा नॉन-पिटिंग अशी दोन प्रकारांची असते. दाब दिल्यावर त्वचेमध्ये तात्पुरता खड्डा निर्माण झाल्यास, त्याला पिटिंग एडेमा असे संबोधले जाते. तर त्वचा दाबली जाऊन सुद्धा तिथे खड्डा पडत नसेल तर ती नॉन-पिटिंगप्रकारची सूज असते. पायांवरची सूज जर गंभीर कारणामुळे नसेल तर ती पाय काही वेळासाठी उंच ठेवल्यास कमी होते. दिवसातून 3 ते 4 वेळा आणि झोपेच्या वेळी पाय हृदयाच्या पातळीपेक्षा उंच ठेवले तर सूज लवकर कमी होते. झोपताना किंवा बसताना पाय लांब करून त्याखाली जाड उशी घेतल्यास सूज लवकर उतरण्यास मदत होते. पण जर अनेक दिवस पायांवर सूज राहत असेल तर त्यामागे काही वेगळी गंभीर कारणे असू शकतात.
पावलांवर सूज का येते
जर दोन्ही पावलांवरची सूज अनेक दिवस होऊनही कमी होत नसेल तर त्यामागे पुढील कारणे असू शकतात.
हृदयरोग : हृदयाच्या पंपिंग फंक्शनमध्ये घट झाल्यामुळे लहान रक्तवाहिन्यांमध्ये जास्त दाब निर्माण होतो. याचा परिणाम म्हणून टिश्यूज मध्ये द्रव साचते. गुरुत्वाकर्षणामुळे हे द्रव पावलांवर जमा होते. हार्ट फेल्युअर हे पावलांवर सूज येण्याचे एक सामान्य कारण आहे. दिवसभराच्या परिश्रमानंतर संध्याकाळी सूज अधिक ठळकपणे दिसून येते.
किडनीचे आजार: किडनीचे कार्य जर व्यवस्थित नसेल तर शरीरात जास्त प्रमाणात द्रव जमा होते आणि लघवीतील प्रथिने कमी होतात. यामुळे शरीरावर सूज येऊ लागते. मूत्रपिंडाच्या आजारामुळे येणारी सूज ही सामान्यतः सकाळच्या वेळेला जास्त दिसते. किडनीला काही प्रॉब्लेम असेल तर संपूर्ण शरीरावर विशेषतः चेहऱ्यावर सूज दिसून येते.
यकृत रोग: यकृताच्या रोगामुळे रक्तातील प्रथिनांच्या पातळीत घट होते. तसेच यकृताच्या काही रक्तवाहिन्या संकुचित पावतात. रुग्णाच्या ओटीपोटात देखील द्रव पदार्थ जमा होतो.तसेच पावलांवर अनेक दिवस सूज राहते.
व्हेन्ससंबंधी समस्या: शरीराच्या खालच्या भागातून हृदयापर्यंत रक्त वाहून नेणारी मुख्य रक्तवाहिनी इंफेरियर व्हेन कॅव्हाच्या रक्तप्रवाहात जेव्हा अडथळा येतो तेव्हा पायांमध्ये रक्त साचते आणि सूज येते.
हायपोथायरॉईडीझम: थायरॉईड संप्रेरक अत्यंत कमी प्रमाणात स्रवल्यामुळे चेहरा, हात आणि पाय सुजलेले दिसू शकतात. रुग्णाला सुस्ती वाटणे , वजन वाढणे, बद्धकोष्ठता, आवाजात बदल होणे आणि कोरडी आणि खडबडीत त्वचा हा इतर त्रासही होऊ शकतो.
अनेक दिवस पायांवर सूज दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही गंभीर नसल्याची खात्री करून घ्यावी.
Photo Credit- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक