तसे तर निम्मे आपल्या एन्ट्रीलाच पळून जातात…अशा दमदार संवादानेच ‘माऊली’च्या धमाकेदार ट्रेलरला सुरुवात होते. ‘लय भारी’ च्या यशानंतर पुन्हा एकदा मराठीमध्ये रितेश नवा चित्रपट घेऊन आला आहे. यावेळी रितेशला साथ देत आहे ती संयमी खेर. माऊली सर्जेराव देशमुख ही व्यक्तीरेखा रितेश यावेळी प्रेक्षकांसमोर घेऊन आला आहे आणि २ मिनिट ५० सेकंदाच्या या ट्रेलरने धमाकेदार एन्ट्री केली आहे. रितेश पुन्हा एकदा अॅक्शनपॅक्ड चित्रपट घेऊन रसिकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे ‘लय भारी’नंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच रितेशकडून वाढल्या आहेत. ट्रेलर बघून तरी रितेश प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असं सध्याचं चित्र आहे. इतकंच नाही तर, सलमान खाननेही हे ट्रेलर बघून मराठीमध्ये ट्विट करत रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत.
काय आहे चित्रपटात?
माऊली सर्जेराव देशमुख अशी व्यक्तिरेखा रितेश साकारत असून हा एक धडाकेबाज पोलीस आहे. सुरुवातीलाच गावात गुंडांचा माज दिसून येत आहे. याच गुंडांना धडा माऊली शिकवत आहे. मात्र रितेशला बघताना हिंदी चित्रपट ‘सिंघम’मधील अजय देवगणची आठवण आल्याशिवाय राहात नाही. ‘माझ्यासारखा टेरर नाय…’सारखा संवाददेखील भाव खाऊन जातोय. रितेशला हिंदी चित्रपटांमध्ये बऱ्याचदा कॉमेडी शैलीमध्ये प्रेक्षकांनी पाहिले आहे. मात्र रितेशचा हा अंदाजही भाव खाऊन जातोय.
सलमानचं मजेशीर ट्विट
सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे सलमान खानलाही हे ट्रेलर आवडलं असून रितेशच्या चित्रपटाचं ट्रेलर सलमाननं ट्विट केलं आहे. ट्विट करताना त्याने मराठीमध्येच ट्विट केलं असून रितेशसाठी मजेशीर कॅप्शन लिहिली आहे. ‘सर्वांचा माऊली आणि आपला भाऊ येतोय, एन्ट्रीवर शिट्टी नक्कीच’. सलमानच्या ट्विटलाही ९ हजारपेक्षा जास्त लोकांनी खूपच कमी वेळात ट्विट केलं असून लवकरच १० हजाराचा आकडाही पार करेल. दरम्यान रितेशच्या ‘माऊली’ ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई फिल्म कंपनीने निर्माती केलेला हा चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने दिग्दर्शित केला आहे. यामध्ये संयमी खेरव्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, गिरीजा ओक आणि जितेंद्र जोशी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर याचं संगीत अर्थातच प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय – अतुल यांनीच दिलं आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक पुन्हा एकदा नव्या मराठी गाण्यांची मजा लुटायला नक्कीच तयार असेल. येत्या १४ डिसेंबरला रितेशचा ‘माऊली’ प्रदर्शित होणार असून लवकरच मोठ्या पडद्यावर रितेश पुन्हा एकदा आपली जादू दाखवणार का ? हे दिसेल.
इमेज सोर्स – इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूब
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje