मनोरंजन

रितेश-जेनेलिया चार वर्षांनी पुन्हा एकत्र

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Dec 4, 2018
रितेश-जेनेलिया चार वर्षांनी पुन्हा एकत्र

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया ‘माऊली’ या मराठी चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चार वर्षांनंतर पुन्हा जेनेलिया सिनेमातून काम करत आहे. जेनेलिया तिचा पती व अभिनेता रितेश देशमुख याच्या आगामी ‘माऊली’ या चित्रपटातील एका गाण्यातून पुनरागमन करते आहे. त्यामुळे चाहत्यांना आता पुन्हा जेनेलिया व रितेश ही जोडी एकत्र पाहता येणार आहे. माऊली चित्रपटातील “सर्फ लावून धुवून टाक” या गाण्याचा नवा व्हिडीओ नुकताच सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या गाण्यातून ते दोघं रंगपंचमीचा आनंद लुटताना दिसत आहेत.

चार वर्षांनंतर जेनेलिया पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला…

जेनेलियाने काही तासांपूर्वीच इन्स्टांवरुन याबाबत माहिती शेअर केली आहे.“ माय गॉड! चित्रपटात काम करुन मला जवळजवळ चार वर्ष झाली…हे माझ्या लक्षात देखील आलं नाही. ‘धुवून टाक’ या गाण्यासाठी मी रितेशची आभारी आहे.खरंच,हे गाणं करताना खूप धमाल आली.”

या दोघांचा हा दुसरा मराठी चित्रपट आहे.यापूर्वी देखील ‘लय भारी’ या रितेश देशमुखच्या पहिल्या मराठी चित्रपटातील एका गाण्यात ही बॉलीवूड जोडी एकत्र पडद्यावर झळकली होती.

‘माऊली’ चित्रपट 14 डिसेंबरला होणार प्रदर्शित

‘माऊली’ चित्रपट ‘लय भारी’ चित्रपटाचा सिक्वल आहे. क्षितीज पटवर्धन लिखीत ‘माऊली’ सिनेमा आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केला आहे. तर खूद्द जेनेलियानेच या सिनेमाची निर्मिती केली आहे.

रितेशने देखील जेनेलियासोबत ‘धुवून टाक’ हे गाणं शूट करताना खूप धमाल आली असं म्हटलं आहे. “मी जेनेलियासोबत काम करण्याची संधी कधीच सोडत नाही. त्यामुळे या गाण्यात काम करण्यासाठी मी जेनेलियाला अक्षरश: भाग पाडलंय. अजय-अतुलने संगीतबद्ध केलेल्या या गाण्यावर जेनेलियासोबत डान्स करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांना देखील हे गाणं नक्कीच आवडेल” असं त्याने सोशल मिडीयावर शेअर केलं आहे.

 

रितेश व जेनेलिया ही जोडी यापूर्वी ‘तेरे नाल लव्ह हो गया’ ‘तुझे मेरी कसम’ ‘मस्ती’ या बॉलीवूड चित्रपटांमधून एकत्र दिसली होती. रितेश व जेनेलिया 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले. या जोडप्याला रियान आणि राहील ही दोन गोंडस मुलं आहेत. मुलांच्या संगोपनासाठी जेनेलिया गेली काही वर्ष चित्रपटांपासून दूर होती.

 

इमेज सोर्स – इन्स्टाग्राम

 

Read More From मनोरंजन