मनोरंजन

सचिन खेडेकरांनी केले मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे आवाहन, व्हिडीओ झालाय व्हायरल… 

Vaidehi Raje  |  Jul 28, 2022
Sachin Khedekar

कौन बनेगा करोडपतीचे मराठी रूपांतर असलेला ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम आज महाराष्ट्रातील घराघरांत अगदी आवडीने पाहिला जातो. केवळ आपल्या ज्ञानाच्या भरवशावर इथे सामान्य माणूस सुद्धा करोडपती होऊ शकतो आणि आपली सगळी स्वप्ने साकार करू शकतो. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून कोण होणार करोडपतीच्या प्रत्येक पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळतो. आपल्या चतुरस्त्र अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते सचिन खेडेकर या कार्यक्रमाचे त्यांच्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करतात. ‘आता आलीये आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, हे कोण होणार करोडपातीच्या या पर्वाचे ब्रीदवाक्य आहे. नुकताच सचिन खेडेकर यांचा एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन खेडेकर मराठी भाषेविषयी बोलताना दिसत आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये नोकरी व मराठी भाषा यावर भाष्य केले आहे. 

मराठी एकीकरण समितीने शेअर केला व्हिडीओ 

आजपर्यंत अनेक मराठी कलाकारांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत तसेच महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत त्यांची मते व्यक्त केली आहेत व विविध मुद्दे देखील उपस्थित केले आहेत. मराठी एकीकरण समितीने सचिन खेडेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. हा व्हिडीओ कोण होणार करोडपती या कार्यक्रमातील एका एपिसोडमधला आहे. अवघ्या 47 सेकंदांचा असलेला हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा होते आहे. 

काय म्हणाले सचिन खेडेकर 

मराठी भाषा व नोकरी याबाबत बोलताना सचिन खेडेकर म्हणाले की, ““तुम्ही कॉल सेंटरला फोन लावता तेव्हा  तुमच्याकडे इंग्रजी, हिंदी आणि मराठी असे तीन भाषांचे पर्याय असतात. तुम्ही मराठी हा पर्याय निवडता. तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता. तिथेही मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे तीन भाषांचे पर्याय असतात. त्यावेळीही तुम्ही मराठी पर्याय निवडता. तुम्हाला मार्केटींगवाल्यांचा फोन येतो. तुम्हाला त्यांच्यासोबत हिंदी किंवा इंग्रजीतून बोलायला लागते. त्यावेळी तुम्ही मराठी बोलायचा आग्रह धरा. खरंतर सहसा असे होत नाही. पण व्हायला पाहिजे. कारण हा मराठीचा अतिरेकी अभिमान नाही. हा हजारो लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. मराठीचा आग्रह धरुया. कारण आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी मिळेल. व्यवसाय मिळेल. आपण एक पाऊल पुढे टाकूया. मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल!”

मराठी एकीकरण समितीने सचिन खेडेकरांचे मानले आभार 

Sachin Khedekar

मराठी एकीकरण समितीने सचिन खेडेकर यांचा कोण होणार करोडपतीमधील हा व्हिडीओ शेअर करताच याची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. मराठी एकीकरण समितीने हा व्हिडीओ शेअर करताना “धन्यवाद सचिन खेडेकर साहेब सहकार्य केल्याबद्दल” असे कॅप्शन लिहून सचिन खेडेकर यांचे आभार मानले आहे. यावर अनेक युजर्सने विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “भारी… हे आर्थिक समाजकारण समजणे व सार्वजनिकरित्या यावर चर्चा करणे खूप गरजेचे आहे” अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे तर “महाराष्ट्रात राज्यभाषा मराठीची मागणी म्हणजे मराठीचा अभिमान व कडवटपणा, कट्टरपणा नाही” असे मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले आहे. “भाषेचा व्यावहारिक वापर व व्यावसायिक महत्व वाढले तर भाषा टिकते व वाढते” ,अशीही कमेंट एका युझरने केली आहे. 

थोडक्यात, मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी फक्त शासनाचीच नाही तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसाची देखील आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन