मनोरंजन

सचिन पिळगावकर प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे ‘लव्ह यु जिंदगी’

Dipali Naphade  |  Dec 19, 2018
सचिन पिळगावकर प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे ‘लव्ह यु जिंदगी’

आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. पण रडत न बसता आयुष्य कसं मजेनं जगायचं हे फार कमी लोकांना जमतं आणि अशा उत्साहाने जगणाऱ्या व्यक्तीचं आयुष्यावर मनस्वी प्रेम असतं. जो माणूस स्वतःवर प्रेम करू शकतो तोच इतरांवर आणि जीवनावर भरभरून प्रेम करू शकतो. असाच एक चित्रपट प्रेक्षकांसाठी येत आहे तो म्हणजे ‘लव्ह यु जिंदगी’. सचिन पिळगावकर यांची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका असून आयुष्याशी निगडीत असा हा कुटुंबप्रधान चित्रपट आहे. मुलीचं लग्न ठरलं आहे म्हणून स्वतःवर अकाली प्रौढत्व् न लादणाऱ्या अशा अनिरुद्ध दातेची भूमिका सचिन पिळगावकर यांनी साकारली आहे. पण ही कथा फक्त अनिरूद्ध दातेची नाही तर प्रत्येक पालकाची जिंदादिल व्यक्तीमत्त्वाची आहे.

 

मुलांची लग्न झाल्यावर होतो पालकांच्या मानसिकतेत बदल

मुलीचा किंवा मुलाचा विवाह होतो तेव्हा त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मानसिक स्तरावर बदल होत असतो. एक वेगळीच परिपक्वता आणि हुरहूर जाणवू लागते. पण एका वडिलांच्या मुलीचं लग्न ठरतं किंवा होतं तेव्हा त्यांच्यातही एक मानसिक स्तरावर सूक्ष्म बदल होत असतो हेदेखील प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे अशावेळेला आयुष्यात मागे बघत वजाबाकी केली जाते.  काहीतरी सुटलंय मागे, ही जाणीव मनाला होते. काहीजण, कशाला बहुतेकजण, “आयुष्य असंच असतं, चालायचंच म्हणून ते स्वीकारतात. मुलामुलींच्या आयुष्याला आपलं आयुष्य समजून“बॅक फूट” वर येऊन जगू लागतात. आजूबाजूचे लोक, कुटुंबीय, मित्र वय झाल्याची सतत जाणीव करून देत असतात. यानंतर ठराविक आयुष्य जगण्याचे सल्ले देतात. पण क्वचित कोणीतरी मागे राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करायचा विचार करतो. आयुष्य पुन्हा एकदा नव्या पद्धतीने “फ्रंट फूट” येऊन जगायचा निर्णय घेतात आणि तसं जगण्याचा प्रयत्नही करतो. “लव्ह यु जिंदगी” या चित्रपटातुन हाच संदेश देण्याचा एक सकारात्मक प्रयत्न करण्यात आला आहे.

 

कविता लाड आणि प्रार्थना बेहेरे यांच्याही प्रमुख भूमिका

चित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. प्रार्थना बेहरेने ‘रिया’ची भूमिका साकारली आहे. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला “लव्ह यु जिंदगी” ११ जानेवारीला  महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.

Read More From मनोरंजन