अनेक वर्षांपासून देशभक्तीवर आधारित चित्रपट निर्माण होत आहेत. तिरंगा, बॉर्डर, एलओसी, दी लिजंड ऑफ भगतसिंग, लक्ष्य, मंगल पांडेः दी रायजिंग असे अनेक चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. बॉलीवूड चित्रपटसृष्टीचं या चित्रपटांच्या निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान आहे. कारण अशा प्रकारच्या चित्रपटातून भारतीयांच्या मनातील देशप्रेम पुन्हा जागृत व्हायला आणि सतत तेवत राहायला मदत होते. आता तर थिएटरमध्ये कोणत्याही चित्रपटाची राष्ट्रगीतानेच सुरूवात केली जाते. मागील वर्षी देशप्रेमावर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले ज्यांना प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. 2019 मध्येही देशप्रेमावर आधारित काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. जाणून घेऊयात 2018 आणि 2019 मधील असे काही चित्रपट जे पाहून आपल्या मनातील देशप्रेम द्विगुणित होईल.
भारत
बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानच्या ‘भारत’ची चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतचं टिझर रिलीज झालं. या टिझरमधील सलमानची दमदार एंट्री आणि जबरदस्त डायलॉगमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारत जूनमध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सलमान खानच्या यामध्ये वीस वर्षापासून साठ वर्षांपर्यंतच्या पाच विविध भूमिका असणार आहेत. भारतमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ, तब्बू, कतरीना कैफ आणि दिशा पटनी अशी स्टारकास्ट असणार आहे.दे शप्रेमावर आधारित या चित्रपटाचं कथानक सत्तरच्या दशकातील असण्याची शक्यता आहे. शिवाय या चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची कहाणी दाखवली जाणार आहे. सलमानच्या जबरदस्त संवादाने आणि एंट्रीने या टीझरमधून चित्रपटाची कल्पना येत आहे. पुन्हा एकदा अली अब्बास जाफर, कतरिता आणि सलमान खान हे त्रिकूट या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आतापर्यंत या त्रिकूटाने केलेल सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. त्यामुळे या चित्रपटकडूनही प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत.
‘मणिकर्णिकाः दी क्वीन ऑफ झांसी’
अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ 25 जानेवारी 2019 ला प्रदर्शित झाला. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट भारतासोबतच एकूण पन्नास देशात प्रदर्शित झाला. हिंदीसोबतच मणिकर्णिका तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्येदेखील प्रदर्शित झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला. झाशीची राणीची शौर्यगाथा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे या चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री कंगना रणौतने या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेने या चित्रपटात ‘झलकारी बाई’ची भूमिका साकारली आहे. मराठी कलाकार वैभव तत्ववादी ‘पूरणसिंग’ यांची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी ‘तात्या टोपे’ यांची भूमिका तर सुरेश ओबेरॉय ‘बाजीराव’,डॅनी ‘नानासाहेबां’ची भूमिका तर जिशू सेनगुप्ता ‘गंगाधररावां’ची भूमिका साकारली आहे.
उरीः दी सर्जिकल स्टाईक
विक्की कौशलची प्रमुख भूमिका असलेला उरी चित्रपट नववर्षांतील सर्वात हिट चित्रपट ठरला. उरी चित्रपट भारताच्या सर्जिकल स्टाईकवर आधारित आहे. सप्टेंबर 2016 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील ‘उरी’ या भागातील भारतीय सेनेच्या मुख्यालयावर पाकिस्तानने आतंकवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारतीय सेनेचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानमध्ये शिरुन ‘सर्जिकल स्टाईक’ केलं. उरी चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने नक्कीच पाहिला पाहिजे.
राझी
आलिया भटची प्रमुख भूमिका असेलेला राझी चित्रपटदेखील देशभक्ती आणि समर्पण यावर आधारित होता. या चित्रपटाची कथा हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या कांदबरीवर आधारित होती. शिवाय या चित्रपटामधून एका सामान्य मुलीचे शौर्य आणि असाधारण देशप्रेम दाखवण्यात आलं आहे. ‘देशाची सुरक्षा आणि त्यासाठी करण्यात येणारी गुप्तचर योजना’ या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. आलिया भट, विक्की कौशल यांच्या सक्षम अभिनयामुळे या चित्रपटाचं कथानक काल्पनिक असूनही सत्य वाटू लागतं. सहाजिकच चित्रपट पाहताना कथा आणि देशप्रेम अंगावर रोमांच उभं करतं.
जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘परमाणू – दी स्टोरी ऑफ पोखरण’ हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारताच्या न्यूक्लिअर पॉवर सक्षमीकरणावर आधारित आहे. 1998 मध्ये भारतात केलेल्या अण्वस्त्र चाचणी या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट होता. या विषयावरील सखोल अभ्यास आणि देशभक्तीने ओतप्रोत भरलेला विषय यासाठी हा चित्रपट पाहणे खरंच गरजेचं आहे.
रोमियो अकबर वॉल्टर
बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमचा नवीन चित्रपट चित्रपट रोमियो अकबर वॉल्टर 12 एप्रिल 2019 मध्ये प्रदर्शित होत आहे. ‘रोमियो अकबर वॉल्टर’चं पोस्टर नुकतच रिलीज झालं आहे. पोस्टरसोबत ‘वन मॅन मेनी फेसेस.वन मिशन- टू प्रोटेक्ट हिज कंट्री’ अर्थात ‘एक माणूस अनेक चेहरे. एक मिशन – देशाच्या सुरक्षेसाठी. ‘रोमियो अकबर वॉल्टर’ एका देशभक्ताच्या जीवनावर आधारित सत्य घटना आहे. या चित्रपटात जॉन एका गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. शिवाय पोस्टरवरुन तो या चित्रपटात विविध लुकमध्ये दिसण्याची शक्यतादेखील व्यक्त होत आहे.
तानाजी- दी अनसंग वॉरीयर
बॉलीवूड अभिनेता अजय देवगनच्या तानाजी चित्रपटाचीदेखील सध्या जोरदार चर्चा आहे. तानाजी- दी अनसंग वॉरीयर चित्रपट नोव्हेंबर 2019 मध्ये प्रदर्शित होत आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तानाजी मालुसरे हे सुभेदार होते. त्यामुळे या चित्रपटातून मराठ्यांचा इतिहास जगासमोर येणार आहे. शिवाय या चित्रपटात अनेक बॉलीवूड कलाकार ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. औरंगजेबच्या सेनापतीची भूमिका अभिनेता सैफ अली खान साकारणार आहे तर अभिनेत्री काजोल राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नाही तर अभिनेता सुनील शेट्टी मिर्झा राजा जयसिंगची भूमिका साकारणार आहे. सलमान खानचीदेखील या चित्रपटामध्ये एक महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
देशभक्तीवर आधारित चित्रपट पाहणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. देशावरील प्रेमाचं प्रतिक असलेले असे चित्रपट सतत निर्माण होणं फार गरजेचं आहे. ज्यामुळे भविष्यात प्रत्येक पिढीला देशाचा इतिहास आणि देशाच्या सुरक्षेबाबत धडे मिळू शकतात.
फोटोसौैजन्य- इन्स्टाग्राम
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje