मनोरंजन

“डोंबिवली रिटर्न”मध्ये संदीप कुलकर्णी-राजेश्वरी सचदेव पहिल्यांदाच एकत्र

Dipali Naphade  |  Jan 7, 2019
“डोंबिवली रिटर्न”मध्ये संदीप कुलकर्णी-राजेश्वरी सचदेव पहिल्यांदाच एकत्र

‘डोंबिवली फास्ट’ हा चित्रपट आजही सर्व प्रेक्षकांच्या लक्षात आहे. संदीप कुलकर्णीचं भन्नाट काम आणि अप्रतिम कथेमुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आता लवकरच अर्थात 22 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात ‘डोंबिवली रिटर्न’ प्रदर्शित होणार आहे. ‘डोंबिवली रिटर्न’ जे जातं…तेच परत येतं?  या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. या चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव पहिल्यांदाच एकत्र आले असून सध्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. पहिल्यांदाच आलेली ही जोडी आणि त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पुढच्या महिन्यात अनुभवता येणार आहे.

पोस्टरवरील चेहऱ्यावरचे भाव महत्त्वाचे

पहिल्यांदाच संदीप कुलकर्णी निर्माता म्हणून या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. शिवाय महत्त्वाची भूमिकादेखील या चित्रपटामध्ये संदीप साकारत आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अत्यंत लक्षवेधी आहे. कारण, कथानकाचा नायक त्याची पत्नी आणि मुलीसह उभा असल्याचं या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्या तिघांच्याही चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थतेचे आहेत. स्वाभाविकच त्यांच्या बाबतीत काय घडलं असेल याचं कुतूहल या पोस्टरमधून निर्माण होतं. त्यामुळे आता या चित्रपटातून नक्की काय वेगळेपणा दाखवण्यात येणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

पैसा सगळ्या दुःखाचं मूळ

‘ Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मूळ आहे.’ ही म्हण आपल्या मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे ह्याचं चित्रं उभं करणारा हा चित्रपट आहे. ही कथा मला सुचली मुलुंड – सीएसटीच्या एका प्रवासात… संदीप कुलकर्णीला ती आवडली असं महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितलं. ‘आपला पहिला चित्रपट कसा असावा ह्या बाबतीत मी आग्रही होतो. निर्माता म्हणून संदीपने तो आग्रह पूर्ण केला. तो नट म्हणून जितका प्रगल्भ आहे, तितकाच निर्माता म्हणूनही आहे. खरंतर तो माझा काॅलेजपासूनचा दोस्त. आम्ही एकत्र नाटकातून कामं केली होती. निर्माता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाचे (प्रेमसूत्र) मी संवादही लिहिले होते. सुरुवातीला हा चित्रपट करताना मला जराही ताण नव्हता. पण जेव्हा तो बाय-लिंग्वल (हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांत) करायचा ठरला तेव्हा थोडं दडपण आलं. कारण ह्या चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. नावामुळे हा ‘डोंबिवली फास्ट’चा सिक्वेल आहे असं वाटेलही… पण ह्या पेक्षा समर्पक दुसरं नाव सुचलंच नाही. उद्या झालीच त्याच्याशी तुलना तरीही बरंच आहे. एका चांगल्या चित्रपटाशी तुलना होणं केव्हाही चांगलंच,’ असं लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितलं.

‘डोंबिवली रिटर्न’ आजच्या काळातील गोष्ट

‘डोंबिवली रिटर्न’ ही आजच्या काळातली गोष्ट असून एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. ‘डोंबिवली रिटर्न’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील चित्रपट असून त्याचा पट खूपच मोठा आहे, असं संदीपनं चित्रपटाच्याबाबत सांगितलं आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.तसंच संदीप आणि त्याचे मित्र महेंद्र अटोले यांनी ‘कंरबोला क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. दोघांची आवड सारखीच असल्यानं दोघांनी एकत्र येऊन निर्मिती संस्था सुरू केली असल्याचंही संदीपनं यावेळी स्पष्ट केलं. आता ‘डोंबिवली फास्ट’ प्रमाणेच ‘डोंबिवली रिटर्न’लादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हे लवकरच कळेल.

 

 

Read More From मनोरंजन