नकारात्मक उर्जा ही तुमच्या आयुष्यासाठी खूपच जास्त हानिकारक असते. एकदा का तुम्हाला नाही किंवा नायरी (नाही म्हणण्याची सवय) लागली की ती सवय मोडणं खूपच जास्त कठीण असते. कोणताही विषय सुरु करायच्या आधी काही जण पटकन नाही म्हणून मोकळी होतात. अशी लोकं समोर आली तरीदेखील आपल्याला अगदी नकोसे होते. कारण आता समोरील व्यक्ती आपल्याला सतत नाही म्हणत असेल तर एकवेळ अशी येते की याला आपण विचारायचं कशाला असे होते. तुमचाही स्वभाव असा झाला असेल तर ही नकारात्मक उर्जा तुम्हाला कशी घातली ठरते हे जाणून घेऊया
सतत नकार कशाला?
एखाद्याचे आयुष्य हे खूपच खडतर असते. त्यांनी बरेचदा कठीण आयुष्यातून सावरत आपले दिवस काढलेले असतात. अशावेळी एखादी गोष्ट घेताना त्यांचे मन धजावत नाही. याचे कारण त्यांचा मागचा काही काळ असतो.परिस्थिती सुधारल्यानंतरही काही जणांना एखादी गोष्ट करताना नाही असे म्हणायची सवय लागलेली असते. तुमच्या आजुबाजूला अशी लोक असतील. ज्यांनी त्यांचा काही काळ असा घालवला असेल तर नक्कीच त्यांना यातून बाहेर पडणे लगेच शक्य नसते.
आता सल्ला त्यांच्यासाठी ज्यांना ही सवय लागली आहे. तुम्ही जे काही कमावता ते तुमच्यासाठी कमावता. आयुष्य हे एकदाच मिळते. आज आपण आहोत उद्या नाही अशी परिस्थिती आहे. अशावेळी तुम्हाला जो काळ मिळाला तो आनंदात घालवता यायला हवा. त्यामुळे सगळ्या गोष्टीत नकार देण्यापेक्षा तुम्ही थोडा वेळ घ्या विचार करा. नको असल्यास थोडे सकारात्मक राहून नकार द्या. त्यामुळे लोकांचा तुमच्याबद्दलचा झालेला गैरसमज कमी होण्यास मदत मिळते.
थोडासा बदल करा
आपल्याला नकार देणाऱ्या व्यक्तिचा इतका राग येतो की, त्याने बदलावे असे आपल्याला वाटते. पण बदल हा सहज शक्य नसतो. त्याला बराच वेळ लागतो. वर म्हटल्याप्रमाणे परिस्थितीनुसार आलेला हा नकार असेल तर तो बदलणे कठीणच असते. पण काही जण ही काहीही कारणं नसताना नकारघंटा वाजवणारी असतात. अशांना त्यांच्यात बदल आणणे खूप गरजेचे आहे. कारण तुम्ही जर सतत नकार देत राहाल तर पुढे जाऊन तुमच्या कोणत्याही मदतीसाठी समोरची व्यक्ती नकार देऊ शकते. जे तुम्हाला अजिबात रुचणार नाही. पण जे पेराल ते उगवते या नियमानुसार तुम्ही जसं वागाल तसं लोकं तुमच्याशी वागतात. त्यामुळे थोडासा बदल करा. जसं वयं वाढतं तसं आपल्याला इतरांची गरज लागते. इतरांनी आपल्याशी सलोख्याने राहावे असे वाटत असेल तर आपणही तसे राहायला हवे. तरच आपल्या मदतीला कोणी येतील हा विचार करुन आपल्यात बदल केला तर फारच चांगले
चांगल्या गोष्टीचे आचरण करा
कधी कधी आपल्यातील ही सवय इतकी वर डोकं काढते की एखाद्या गोष्टीला कदाचित नाही म्हणायचं नसतं पण तरीदेखील पटकन स्वभावामुळे नाही असा शब्द येतो. आता ही सवय तुम्हालाही लागली असेल तर त्याचे काहीतरी करावे लागेल. तुम्हाला चांगल्या गोष्टींचे आचरण यासाठी करावे लागेल की, जेणेकरुन तुम्ही होकाराकडे वळाल. चांगली पुस्तके वाचा, चांगल्या सकारात्मक गोष्टी करा. तुमचा थोडासा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.
आता एकदा नकार देताना या सगळ्या गोष्टीचा विचार करा.