दररोज सकाळी नाश्त्यासाठी काय बनवावं हा प्रत्येक गृहिणीला झोपेतून उठल्यावर पडणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आठवड्याचे सात दिवस सकाळी सर्वांच्या आवडीचा आणि झटपट होईल असा नाश्ता तिला बववावा लागतो. त्यात जर घरातील लोकांच्या आवडी निरनिराळ्या असतील तर मग अनेक पदार्थ एकाच वेळी नाश्त्यासाठी बनवावे लागतात. कांदेपोहेप्रमाणे रव्याचा उपमा हा आपल्याकडे नेहमीच बनवला जातो. मात्र तुम्हाला थोडा हटके नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही एखाद्या दिवशी शेवयांचा उपमा बनवू शकता. वास्तविक शेवयांचा उपमा हा आरोग्यासाठी उत्तम आणि चवीला मस्त लागतो. त्यामुळे घरातील प्रत्येकाला तो नक्कीच आवडतो. यासाठी जाणून घ्या शेवयांचा नाश्ता बनवण्याची बेस्ट रेसिपी यासोबतच वाचा गुढीपाडव्यासाठी पारंपरिक आणि स्पेशल 14 पदार्थ | Gudhi Padwa Special Recipes in Marathi
असा बनवा शेवयांचा उपमा
उपमा बनवण्याचं तंत्र प्रत्येक गृहिणीकडे अथवा कुकिंगची आवड असणाऱ्या प्रत्येकाकडे असतंच. कारण उपमा बनवताना आईला आपण लहानपणापासून बघितलेलं असतं. पण शेवयांचा उपमा खाताना तुम्हाला शेवया आणि उपमा अशा दोन्ही चवींचा आनंद मिळतो.
साहित्य –
- एक कप बारीक शेवया
- फोडणीसाठी तेल
- मोहरी
- जिरे
- कडिपत्ता
- एक कांदा बारीक चिरलेला
- दोन ते चार हिरव्या मिरच्या
- एक चमचा उडीद डाळ
- एक कप मटारचे दाणे, गाजराचे बारीक तुकडे
- एक बारीक चिरलेला टोमॅटो
- अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
- कोथिंबीर
- ओलं खोबरं सोबत वाचा ओल्या नारळाची रेसिपी मराठीत खास तुमच्यासाठी (Olya Naralachi Recipe In Marathi)
- लिंबू
- चिमूटभर हळद
- चवीपुरतं मीठ
शेवयांचा उपमा बनवण्याची पद्धत –
- कढईत शेव पाच मिनीटे खरपूस भाजून घ्या
- शेव कढईतून बाजूला काढून ठेवा आणि कढईत तेल ओता
- फोडणीत उडीदडाळ, मोहरी आणि जीरे तडतडू द्या.
- कडिपत्ता आणि हिरवी मिरची टाकून परतून घ्या
- कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परता
- शेंगदाणे, गाजर आणि मटार टाकून झाकण ठेवून शिजू द्या
- टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्या
- हळद आणि मीठ टाका आणि फोडणीत एक ग्लास गरम पाणी टाका
- पाण्याला चांगली उकळ आली की रोस्ट केलेल्या शेवया त्यात सोडा.
- पाच ते दहा मिनीटांमध्ये शेवया शिजून उपमा तयार होईल, तोपर्यंत कढईवर झाकण ठेवून वाफेवर शेवया शिजवा.
- वरून कोथिंबीर, ओलं खोबरं आणि लिंबाच्या फोडीने सजवा. यासोबतच चमचमीत वेगवेगळ्या चवीच्या नुडल्स बनवा घरच्या घरी (Noodles Recipe In Marathi)
आम्ही शेअर केलेला हा चविष्ट शेवयांचा उपमा तुम्हाला कसा वाटला आणि तो तुम्ही बनवला का हे आम्हाला कंमेटमधून जरूर कळवा.