आरोग्य

व्हिसरल फॅट नियंत्रित करण्यासाठी काही खास टिप्स

Dipali Naphade  |  May 31, 2022
special-tips-to-control-visceral-fat-form-experts-in-marathi

व्हिसरल फॅट (Visceral Fat) म्हणजेच आपल्या महत्त्वाच्या अवयवांना म्हणजे यकृत, हृदय, स्वादुपिंड किंवा मूत्रपिंडाभोवती साठून राहिलेलं फॅट्स. हे फॅट्स खूपच धोकादायक असतं. कारण हार्मान्सच्या कार्यप्रणालीवर त्याचा परिणाम होतो. ही फॅट्स अवयवांना गुदमरून टाकतात. इन्शुलिन पाझरण्याच्या स्वादुपिंडाच्या क्रिया बिघडू शकते किंवा यकृताची शरीराला साखर पुरवण्याची जी ताकद असते तीही कमी होते. त्यामुळे व्हिसरल फॅटकडे दुर्लक्ष न करता त्याकडे विशेष लक्ष देऊन ते नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. कारण रस्त्यावरून चालणारी एखादी व्यक्ती बाहेरून लठ्ठ वाटत नसली तरी ती आतून लठ्ठ असते, याला ऍपल शेप्ड बॉडी किंवा अँड्रॉइड ओबेसिटी असेही म्हणतात. याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली आहे, डॉ. अपर्णा गोविल भास्कर, लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन, सैफी हॉस्पिटल, अपोलो स्पेक्ट्रा आणि नमाहा अस्पताल मुंबई यांच्याकडून. 

व्हिसरल फॅट वाढण्यास कारणीभूत घटक

ओटीपोटात जादा चरबी किंवा व्हिसरल चरबी हा प्रकार 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, डिस्लिपिडेमिया आणि मेटाबॉलिक सिंड्रोम यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरत आहे. नुकत्याच एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य धोके काही आशियाई लोकांमध्ये 22 ते 23 kg/m2 इतके कमी BMI वर आढळून आले आहेत. आशियाई भारतीयांमध्ये सामान्यत: उच्च व्हिसरल चरबीसह मध्यवर्ती लठ्ठपणा असतो. ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात व्हिसरल फॅट हार्मोन्सच्या कार्यामध्ये व्यत्यय आणते आणि दाहक रसायने सोडते ज्यामुळे वर नमूद केलेल्या चयापचय आजारांचा धोका वाढतो.

व्हिसरल फॅट वाढण्यास कारणीभूत असलेल्या काही घटकांमध्ये, बैठी जीवनशैली किंवा शारीरिक हालचालींचा अभाव, उच्च कॅलरी आहार, झोप पूर्ण न होणं, मद्यपान आणि उच्च तणाव पातळी यांचा समावेश होतो. यामुळे वृद्धत्वामुळे चरबीचे प्रमाण वाढते आणि स्नायूंचे प्रमाण कमी होते. कुठलाही आजार झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी काळजी घेणं गरजेचं असते. म्हणून व्हिसरल फँट नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावेत याबद्दल तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत.

व्हिसरल फॅट न होण्यासाठी काय करावे 

Visceral Fat

उत्तम आहाराचे सेवन करा –  रात्री उशीरा जेवायची सवय, मध्यरात्री स्नॅंकिंग करणं, जास्त प्रमाणात खाणं या खाण्याच्या चुकीच्या पद्धती टाळाव्यात. यामुळे शरीरातील कॅलरी वाढून व्हिसरल फॅट वाढण्याची शक्यता अधिक असते.

संतुलित आहार घ्या – नियमित संतुलित आहाराचे सेवन करणं खूप मह्त्त्वाचे आहे. चांगल्या दर्जाचे फायबर समृद्ध कर्बोदके, मध्यम प्रथिने आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करा. केक, मिठाई, बिस्किटे, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक्स, नमकीन, फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि चायनीज यांसारखे कॅलरी जास्त असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावेत.

दररोज व्यायाम करा – दररोज किमान ४५-६० मिनिटे कार्डिओ किंवा एरोबिक व्यायाम करा जसे की वेगवान चालणे, पोहणे, सायकलिंग, जिमिंग, जॉगिंग किंवा कोणताही मैदानी खेळ. तुम्‍हाला आनंद वाटत असलेल्‍या क्रियाकलापाची निवड करा. कारण यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळेल.

झोपेची आणि उठण्याची वेळ निश्चित करा – योग्य झोप होत असल्याने मध्यरात्री भूक लागते. अशावेळी कोणतेही खाद्यपदार्थ खाल्ले जातात. व्हिसरल फँट कमी करण्यासाठी चांगली झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे.

तणावमुक्त रहा – वाढत्या तणावामुळे शरीरात त्या तणावाचा मुकाबला करण्यासाठी अधिक कॉर्टिसॉल (स्ट्रेस हार्मोन) तयार होते. हे ओटीपोटात चरबी धरून ठेवू शकते आणि व्हिसरल चरबी वाढवू शकते. म्हणून हा ताणतणाव दूर करण्यासाठी योगासने, चिंतामुक्त होण्यासाठी योगासने ध्यान, छंद जोपासने किंवा मैदानी खेळ खेळणं आवश्यक आहे.

मद्यपानाचे सेवन करणं टाळावेत – अल्कोहोलमध्ये साधे कार्बोहायड्रेट्स असतात जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास चरबीमध्ये रुपांतर होते आणि पोटात बसते.

साखरेचे सेवन करणं टाळा – जसे अल्कोहोल, टेबल शुगर, साखरयुक्त पेये, वातित पेये, बेकरी खाद्यपदार्थ इत्यादींमध्ये साधे कार्बोहायड्रेट आणि पोषक आणि फायबरचे प्रमाण नगण्य असते. मर्यादित प्रमाणातही या पदार्थांचे वारंवार सेवन केल्याने हळूहळू व्हिसेरल फॅटमध्ये वाढ होते.

स्निग्ध पदार्थांचे सेवन टाळा – चिप्स यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. याशिवाय बिस्टिके, केक, टोस्ट, खारी, समोसे आणि वडापाव या तेलकट खाद्यपदार्थाचे सेवन करू नयेत. यामुळे शरीरातील व्हिसरल चरबी वाढण्याची शक्यता अधिक असते.

ही माहिती सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसंच तज्ज्ञांकडून मिळालेल्या या टिप्सचा तुम्ही नक्की वापर करा आणि व्हिसरल फॅट नियंत्रित करा. 

Read More From आरोग्य