नातीगोती

लग्नासाठी मुलाला भेटताना प्रत्येक मुलीच्या मनात एकदा तरी येतात ‘या’ गोष्टी

Dipali Naphade  |  Dec 24, 2018
लग्नासाठी मुलाला भेटताना प्रत्येक मुलीच्या मनात एकदा तरी येतात ‘या’ गोष्टी

विचार करा, तुमचे पालक एखाद्या अनोळखी मुलाशी तुमची भेटगाठ घालून देतात आणि काही मिनिटातच तुमच्या पूर्ण आयुष्याचा निर्णय घेतला जातो. तेव्हा तुमच्या भावना नक्की काय असतात बरं? ऐकायला हे खूपच विचित्र वाटतं. पण आजही लग्नं ही अशीच जुळवली जातात. ज्या मुलाला तुम्ही कधीही भेटलेले नसता, त्याच्याबरोबर लग्नासारखा आयुष्यभराचा निर्णय काही मिनिटांमध्ये घेण्यात येतो. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुलगा तुमच्या समोर बसलेला असतो तेव्हा मनामध्ये असे बरेच विचार येत जात असतात.

इथे आम्ही तुम्हाला अशाच काही विचारांविषयी सांगणार आहोत, जेव्हा नातं जोडायच्या अशा मीटिंगमध्ये मुलगी असते तेव्हा तिला नक्की काय वाटत असतं. तुमच्याबरोबरदेखील असंच काही झालं आहे का ?

उफ्फ… मी साडी का नेसले आहे?
मी साडीशिवाय इतरही काही कपडे नक्कीच घालू शकले असते ना…पंजाबी घालू शकले असते. एकदम बहनजी टाईप वाटत आहे या साडीमध्ये. या मुलासमोर मला खरंच अगदी आदर्श सून दिसणं गरजेचं आहे का?

“जेवण बनवता येतं की नाही” हा प्रश्न नाही विचारणार अशी आशा करूया
मला जेवण बनवता येत नाही हे मला यांना सांगायला हवं का? कोणाच्या घरी जाऊन जेवण बनवण्यसाठी मी नक्कीच लग्न करत नाहीये ना. हा खूपच जुना आणि बुरसट विचारांचा प्रश्न आहे.

कोणाला असं पहिल्यांदाच भेटणं किती विचित्र आहे
मला इतकं नटवून एका अनोळखी मुलासमोर बसवण्यात आलं आहे..किती विचित्र आहे. माझ्यासाठी जितकं हे विचित्र आहे तितकंच विचित्र या मुलालाही वाटत असेल का?

मी याला काय विचारू बरं पहिला प्रश्न
कळतच नाहीये की, मी याच्याशी कसं बोलायला सुरुवात करू. हा पण मला काही विचारत नाही. मीच पहिला प्रश्न विचारू का? पण नक्की काय विचारू पहिला प्रश्न?

Also Read Wedding Planning Tips In Marathi

हा रोज जिममध्ये जात असेल असं याला बघून तरी वाटत आहे
याचे मसल्स तर एकदम मस्त आहेत. वाटतं हा रोज जिममध्ये जातो. मला नाही वाटत की, मी याच्याबरोबर माझं पूर्ण आयुष्य काढू शकेन.

मला बघून हा काय विचार करत असेल ?

उफ्फ… हा तर मला सारखा बघतोच आहे. काय चालू आहे याच्या मनामध्ये? काय विचार करतोय हा माझ्याबद्दल? मी याला आवडले आहे की नाही नक्की..मला नकार तर नाही ना देणार हा?

स्नॅक्ससाठी याला विचारू का?
आमच्यासमोर सर्व स्नॅक्स तर ठेऊन गेले आहेत. पण यावेळी मला हे खायला हवं की नको. मी स्वतः आधी खाऊ की पहिल्यांदा याला विचारू खायला हवं की नको?

याच्याबरोबर मला माझ्या करिअरबद्दल चर्चा करायला हवी की नाही
मी लग्नानंतर गृहिणी नाही राहू शकत. मी लग्नानंतरही नोकरी करत राहणार आहे…हे याला मी आता सांगू की नको सांगू?

मी जर नकार दिला तर…
एका भेटीत मी माझ्या आयुष्याचा निर्णय नक्कीच नाही घेऊ शकत. मला आताच नकार दिला पाहिजे का किंवा जर पुढे जायचंच असेल तर अजून काहीवेळा भेटलं पाहिजे?

पहिल्याच भेटीनंतर मी होकार देणार आहे का ?
नक्कीच हे खरं नाही. हे फक्त हिंदी चित्रपटांमध्ये होत असतं. पहिल्याच भेटीत कसं काय आमचं नातं जुळू शकतं?

मी आता हसणं थांबवू शकते का ?
उफ्फ्फ… किती वेळ हे खोटं – खोटं हसत राहायचं आहे. माझे गाल दुखायला लागले आता. देवा आता तरी मी थोडं हसायचं थांबू शकते का?

या मुलाने मला नकार दिला तर…
हा मुलगा मला नकार तर नाही ना देणार. असं झालं तर मी माझ्या मित्र – मैत्रिणींना काय सांगणार. देवा…आता मला अजून एका मुलाला नाही भेटायचं रे बाबा प्लीज…

फोटो सौजन्य – Giphy 

 

Read More From नातीगोती