नातीगोती

वैवाहिक जीवनात सुखी राहायचं असेल तर, करू नका या ‘7’ चुका

Trupti Paradkar  |  Apr 12, 2019
वैवाहिक जीवनात सुखी राहायचं असेल तर, करू नका या ‘7’ चुका

प्रेम आणि लग्नाचा काळ हा अगदी सुखावह असतो. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी एकमेकांचे गुण-दोष दिसू लागतात. त्यामुळे ज्याच्यावर आपलं जीवापाड प्रेम असतं त्याच्यासोबत अचानक खटके उडू लागतात. छोट्या छोट्या गोष्टी भांडणांचे कारण होतात. कधी कधी तर अगदी शुल्लक कारणावरून घटस्फोट घेतला जातो. तज्ञांच्या मते आजकाल लग्नानंतर लगेच एक ते दोन वर्षांत घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे सतत होणारी भांडणे, एकमेंकांबद्दल अविश्वास आणि अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. कधी कधी अशा जोडप्यांच्या समस्या अगदी छोट्या असतात. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलून अथवा घरातील मोठ्या व्यक्तीची मदत घेऊन त्या नक्कीच सोडवता येऊ शकतात. यासाठीच आम्ही तुम्हाला अशा काही चुका सांगत आहोत ज्या टाळून तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन सुखी करू शकता.

लपवा-छपवी करणे-

लग्नामुळे एकमेंकांमधील प्रेमाची भावना अधिक मजबूत होते. प्रेम म्हणजे एकमेकांबद्दल नितांत विश्वास आणि एकमेकांना सुखी करण्याची भावना. मात्र जर तुमच्या नात्यात विश्वासच नसेल तर ते नातं लवकर कमजोर पडू शकते. एखादी गोष्ट लपविणे म्हणजे जोडीदारासोबत अविश्वास दाखविणे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारापासून एखादी गोष्ट लपविता तेव्हा इतर लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात. शिवाय काही कारणांनी ती गोष्ट तुमच्या जोडीदारासमोर आली तर ते तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणं फार कठीण होऊ शकतं. यासाठी एकमेकांपासून कोणतीच गोष्ट लपवू नका.

वाचा – सुखी वैवाहिक जीवन टिप्स

लहान-सहान गोष्टींवरून वाद घालणे-

अनेक लग्न झालेली जोडपी सतत वाद घालताना दिसतात. नवर-बायकोच्या छोट्या छोट्या भांडणांमध्ये लक्ष घालू नये असं म्हणतात. भांडणांमुळे प्रेम दृढ होतं वगैरे गोष्टी फक्त ऐकायला चांगल्या वाटतात. कारण सतत होणाऱ्या भांडणांमुळे तुमच्यामधील नात्यात कटूपणा येऊ लागतो. एकमेकांचा विश्वास कमी होतो. नकारात्मक वातावरण निर्माण होते  ते तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मुळीच चांगले नाही.

तुमच्या एक्सबाबत काळजी करणे –

भूतकाळात तुमचे एखादे प्रेमप्रकरण असेल तर आता लग्नानंतर ते पूर्णपणे विसरून जा. आता तुम्ही तुमचे जुने नातेसंबध पुन्हा पहिल्यासारखे नाही ठेऊ शकत. जर तुमच्या जोडीदारासमोर तुम्ही सतत तुमच्या एक्सबाबत चिंता-काळजी करत असाल तर ते तुमच्या वैवाहिक जीवनासाठी मुळीच हिताचे नाही. कारण तुमचे एक्स सोबत असलेले नाते अथवा चिंता-काळजी तुमच्या जोडीदाराला सहन होणार नाही. हे तुमच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण करण्याचे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करणे-

पार्टनरला तुमच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करणं तुमच्या नात्यासाठी चुकीचे ठरू शकते. कारण प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र अस्तित्व असते. तुमचा जोडीदार जसा आहे त्याला त्याच्या गुण-दोषासह स्वीकारा त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही ती त्यांना मोकळ्या मनाने नक्कीच सांगू शकता. मात्र त्यांनी ती तुमच्यासाठी बदलावे हा आग्रह धरू नका. शिवाय तुमच्या जोडीदाराचा आदर तुम्ही  करणे फार गरजेचे आहे.

खाजगी गोष्टी इतरांना सांगणे-

कधी कधी काही लोकांना खाजगी गोष्टी इतरांजवळ बोलण्याची सवय असते. जरी तुमचे नातेवाईक अथवा मित्र मंडळी तुमच्या अगदी जवळचे असले तरी तुमच्या खाजगी गोष्टी त्यांना मुळीच सांगू नका. कारण असे करणे तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडणार नाही.

सतत संशय घेणे-

जोडीदारावर सतत संशय घेतल्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम, सन्मान, विश्वास कमी होतो. काहीजण विनाकारण जोडीदारावर संशय घेतात. जर तुम्हाला त्यांच्यावर संशय असेल तर त्याबाबत नीट चौकशी करा आणि जर खरंच तसे काही असेल तर तुमच्या जोडीदाराशी थेट बोला.

रोमॅंटिक न वागणे-

प्रेमामुळे तुमचे नाते सदैव फुललेले राहते. मात्र काहीजणांना लग्नानंतर काही वर्षांनी अथवा मुले झाल्यावर रोमॅंटिक वागण्याची लाज वाटू लागते. लक्षात ठेवा तुमचे तुमच्या जोडीदारावर कितीही मनापासून प्रेम असलं तरी ते प्रेम दिसणं देखील तितकंच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचं प्रेम इतरांसमोर जाहीर करण्यास मुळीच संकोच बाळगू नका. असे करून तुम्ही  तुमच्या जोडीदाराला तुम्ही नेहमी खूष ठेऊ शकतो.

आम्ही तुम्हाला सुखी वैवाहिक जीवनासाठी काही महत्त्वाच्या टीप्स सांगितल्या आहेत. या चुका टाळून तुम्ही तुमचे जीवन नक्कीच सुखी करू शकता. कारण वैवाहिक जीवन सुखी करणं हे फक्त तुमच्याच हातात आहे.

 

Read More From नातीगोती