पदार्थ कितीही घरगुती असला तरी त्याच त्याच प्रकारे करुन खाल्ला तर त्याची चव कालांतराने लागणे बंद होते. पानात वाढल्या जाणाऱ्या भाज्या आणि आमटी सगळ्यात महत्वाच्या असतात. त्यांची चव उत्तम असेल तरच जेवण पूर्णब्रम्ह झाल्यासारखे वाटत. घरचे जेवण आवडत असेल पण त्यात काही तरी नवे करावे असे वाटत असेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करुन तुम्हाला मस्त अशा भाज्या आणि आमटी करता येऊ शकतात. चला जाणून घेऊया या सोप्या टिप्स ज्या करतील तुमच्या भाज्या आणि आमटी चविष्ट
फोडणी देताना
भाजी किंवा आमटीला फोडणी ही सगळ्यात जास्त महत्वाची असते. तुम्ही कशाची फोडणी देता त्यावर त्याची चव अवलंबून असते. फोडणीमध्ये लसूण आणि आल्याची फोडणी बसली की, तो पदार्थ छान चुरचुरीत होतो. लसणीची फोडणी दिल्यानंतर त्याचा एक छान अरोमा दरवळतो. डाळी किंवा भाजीला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही कधी लसणीची फोडणी देऊन बघा. याशिवाय तुम्हाला कडीपत्त्याची फोडणी दिली तरी देखील चालू शकते. काही जणांना लसूण चालत नाही अशावेळी फोडणी चुरचुरीत करायची असेल तर तुम्ही कडीपत्याची पाने देखील त्यामध्ये टाकू शकता.
मसाले घालताना
अनेकदा भाज्या/ आमटी करताना आपण मिरची किंवा मसाला घालतो. मिरची घातली तर त्याची एक चव ठरलेली असते. पण बाजारात इतके वेगळे मसाले मिळतात की त्यामुळे त्याची चव ही बदलत असते. भाज्या आणि आमटींचा विचार करुन त्यामध्ये कोणते मसाले घालायचे हे लक्षात ध्यायला हवे. मालवणी मसाला, कांदा-लसूण मसाला, आगरी मसाला, कोल्हापुरी मसाला या मसाल्यांना त्यांची एक चव असते. ज्यामुळे पदार्थांची चव बदलत असते. अशावेळी तुम्ही मसाले घालताना त्यामध्ये विविधता आणली की, तुमच्या पदार्थांची चवही बदलते.
दाण्याचा कूट
काही भाज्यांमध्ये दाण्याचा कूट चांगला लागतो. आमटी आणि भाज्यांमध्ये दाण्याचा कूट घातला की, त्याची चव चांगलीच वाढते. ज्या ठिकाणी शेंगदाण्याचे उत्पादन होते त्या ठिकाणी सगळ्या भाज्यांमध्ये दाण्याचा कूट घातला जातो. पण शेंगदाण्याचे उत्पादन होत नसेल पण तुम्हाला शेंगदाणे मिळणे शक्य असेल तर तुम्ही अगदी आवर्जून शेंगदाण्याचा कूट करुन आमटी, वाटप आणि भाज्यांमध्ये भुरभुरा त्याची चव वाढण्यास मदत मिळते.
ओलं खोबरं
ओल्या नारळामधील गोडवा हा भाज्यांमध्ये उतरला की, त्या भाज्यांची चव चांगलीच वाढण्यास मदत मिळते. पालेभाज्या आणि सुक्या भाज्यांमध्ये वरुन जर तुम्ही वरुन खोबरं भुरभुरलं तरी देखील त्याची चव खूपच चांगली लागते. शिवाय काही भाज्यांमध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचे वाटण टाकले तरी देखील त्यांची चव चांगलीच लागते. ओल्या नारळाचा रस हा देखील अधिक चविष्ट लागतो. त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जून ओल्या खोबऱ्याचा वापर करु शकता.
आता भाज्या आणि आमटीची चव वाढवण्यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा.