आरोग्य

उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Trupti Paradkar  |  May 30, 2019
उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

उन्हाळा संपत आला आहे. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत उन्हाच्या काहिलीने जीव हैराण होणं स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगातून प्रंचड घाम निघू लागतो. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. कारण घामाद्वारे शरीरातील पाण्यासोबत आवश्यक क्षार आणि मिनरल्सदेखील कमी होतात. डिहायड्रेशनमुळे उष्माघात अथवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. डिहाड्रेशनचा पासून बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

डिडाड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी सोपे उपाय-

भरपूर पाणी प्या-

आपल्या शरीराला मुबलक पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी, क्षार आणि मिनरल्स बाहेर निघून जातात. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी जास्त होत असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसभरात मुबलक पाणी पिणं आवश्यक आहे. एका संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीला दिवसभरात आठ ग्लास पाण्याची गरज असते. मात्र तुमच्या वय, शरीराचा आकार, वजन, उंची आणि कामाचा प्रकार यावरून तुमच्या शरीराला लागण्याऱ्या पाण्याचे प्रमाण ठरवावे लागते. धोका टाळण्यासाठी उन्हाळ्यात दर अर्धा तासाने एक ते दोन घोट पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहील. याचबरोबर घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवण्यास विसरू नका.

तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा –

अती तेलकट, मसालेदार पदार्थ पचनास जड असतात. या पदार्थांमुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो. ज्यामुळे तुम्हाला पित्त आणि अपचनाचा त्रास होतो. ज्यामुळे तुमच्या शरीरातील तापमान बदलते. ज्यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होते.

पाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का (Benefits Of Drinking Water In Marathi)

अती व्यायाम आणि मेहनतीची कामे करू नका –

निरोगी जीवनशैली साठी व्यायाम आणि शारीरिक मेहनत गरजेची आहे. मात्र उन्हाळ्यात तुमच्या शरीरातून घाम बाहेर पडत असतो. त्यासोबत अती व्यायाम आणि अती मेहनतीची कामे केल्यास तुम्हाला डिहाड्रेशनला सामोरे जावं लागू शकतं. हा धोका टाळण्यासाठी सतत पाणी आणि पेय पिण्याची सवय लावा.

आरामदायक कपडे घाला –

उन्हाळ्यात नेहमी सैलसर आणि सुती कपडे वापरावे. ज्यामुळे शरीराला पुरेशी हवा मिळू शकते. मात्र उन्हाळ्यात जर घट्ट आणि तंग कपडे घातले तर शरीरातील हवा खेळती राहत नाही. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळत नाही आणि डिहायड्रेशन होऊ शकते.

धुम्रपान आणि मद्यपान टाळा –

मद्यपान आणि धुम्रपान केल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. कारण व्यसनांमुळे तुम्ही पुरेसे पाणी पित नाही. ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. डिहायड्रेशन आणि व्यसन यामुळे तुमच्या मुत्राशयावर ताण येऊ शकतो. ज्यामुळे किडनीचे विकार होण्याचा धोका वाढतो. यासाठी व्यसनांपासून दूर रहा.

मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

दुपारी घराबाहेर पडू नका –

उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर पडल्यामुळे तुम्हाला डिहाड्रेशनचा त्रास होऊ शकतो. कारण सुर्याच्या प्रखरतेमुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार नष्ट होतात. यासाठी अशावेळी घराबाहेर न पडणे हेच उत्तम. शिवाय जर काही कारणांसाठी दुपारी घराबाहेर जावं लागणार असेल तर छत्री, स्कार्फ, गॉगल आणि पाण्याची बाटली सोबत जरूर ठेवा.

उष्माघाताची लक्षणे आणि उपाय (Heat stroke symptoms and treatment in Marathi)

 

फोटोसौजन्य – इन्टाग्राम

Read More From आरोग्य