स्वयंपाक घरात आता निरनिराळ्या रंगाचे, आकाराचे, स्टाईलचे क्रॉकरी सेट असतात. पण तुम्हाला आठवत असेल लहानपणी घरी फार काचेची भांडी नसायची. एखादा खास कपांचा सेट अथवा डिनर सेट फक्त दिवाळी अथवा सणासुदीला बाहेर काढला जायचा. आई त्याची खूप काळजी घ्यायची आणि फक्त पाहुणेमंडळींनाच त्यातून चहा अथवा जेवण दिलं जायचं. तेव्हा वाटायचं आईने हा एकच क्रॉकरी सेट इतके वर्ष कसा बरं जपला असेल. तेव्हा लक्षात यायचं ती त्या वस्तूंची किती काळजी घ्यायची. आता काचेची वस्तू कधी ना कधी तरी फुटणारच. पण याचा अर्थ त्याची काळजी घ्यायची नाही असा नाही. तुमच्याकडे असलेला असाच एखादा खास सेट खूप दिवस टिकावा असं तुम्हाला वाटत असेल तर या टिप्स करा फॉलो.
क्रॉकरी सेटची अशी घ्या काळजी
क्रॉकरी सेट सांभाळून ठेवण्यासाठी त्यांचे निराळे कपाट असणे आणि त्याची वरचेवर स्वच्छता करणे गरजेचे आहे. जाणून घ्या आणखी काही टिप्स
काचेच्या भांड्यासाठी खास कपाट
किचन कॅबिनेटमध्ये तुमच्या क्रॉकरी सेटसाठी खास जागा असायलाच हवी. जरी तुमचं घर लहान असलं तरी तुम्ही यासाठी खास योजना घर सजवताना करायला हवी. यासाठी जर काचेची कपाट योजना केली तर तुमचे आकर्षक क्रॉकरी सेट तुमच्या घराच्य सजावटीत भर घालतील आणि जास्त दिवस टिकतील. याचाच अर्थ तुमच्या घरातील इतर मेटल, प्लास्टिकच्या भांड्यासोबत क्रॉकरीसेट कधीच ठेवू नका.
एकमेकांवर ठेवताना घ्या काळजी
जर तुम्ही कपाटात एकावर एक अशी क्रॉकरी रचून ठेवली असेल तर ती काढताना, स्वच्छ करताना अथवा पुन्हा ठेवताना योग्य काळजी घ्या. कारण थोडासा धक्का तुमच्या आकर्षक भांड्याना नष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. यासाठी कपाटात भांडी व्यवस्थित लावा. ज्यामुळे एखादे भांडे काढताना दुसऱ्या भांड्याला धक्का लागणार नाही. शक्य असल्यास दोन भांड्यांमध्ये टिश्यू पेपर ठेवा. ज्यामुळे ती घसरणार नाहीत.
काही भांडी ठेवण्याची पद्धत
क्रॉकरी सेट कधीच एकसारखे नसतात. प्रत्येकाचा आकार निरनिराळा असतो. टी पॉट तर नेहमी वेगळ्या शेपमध्येच असतात. शिवाय अशा भांड्यांना जागा देखील भरपूर लागते. यासाठी कोणते भांडे कुठे ठेवणार हे ठरवा. त्यानुसार ती जागा कधीच बदलू नका. ज्यामुळे तुमची क्रॉकरी जास्त काळ टिकेल.
न्यूजपेपरमध्ये कधीच गुंडाळू नका
क्रॉकरी सेट सुरक्षित राहण्यासाठी अनेकांना ते न्यूजपेपरमध्ये गुंडाळून ठेवण्याची सवय असते. मात्र असं करू नका कारण न्यूजपेपरमध्ये क्रॉकरीसेट सुरक्षित राहतात असं मुळीच नाही. शिवाय जर आद्रतेमुळे न्यूजपेपरची शाई तुमच्या पांढऱ्या शुभ्र क्रॉकरीसेटला लागली तर कालांतराने ती स्वच्छ करणं सोपं जात नाही. ज्यामुळे तुमच्या क्रॉकरीचा रंग बदलू शकतो. शिवाय असं केल्याने क्रॉकरीसेटमध्ये झुरळ, मुंगी लागण्याची शक्यता जास्त असते. प्रवास करताना क्रॉकरी सुरक्षित राहावी यासाठी तुम्ही टिश्यू पेपर अथवा ब्राऊन पेपर वापरू शकता.
जास्त उंचावर क्रॉकरी ठेवू नका
क्रॉकरीचे कॅबिनेट हे नेहमी हाताजवळ असावे. तुमच्या खांद्याच्या वरील भागाकडे ते असेल तर हात वर कढून भांडी काढताना अथवा टेबलवर चढून भांडी काढताना ती हातातून निसटण्यासाठी शक्यता असते. यासाठी शक्य असेल तर लिव्हिंग रूम अथवा किचनमध्ये सोयीचे कपाट त्यासाठी बनवून घ्या.